मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 23 डिसेंबर 2019 (16:49 IST)

Jamal Khashoggi: पत्रकार जमाल खाशोग्जी हत्याप्रकरणी सौदी अरेबिया कोर्टाने दिला 5 जणांना मृत्युदंड

पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाच्या एका कोर्टाने पाच लोकांना मृत्युदंड सुनावला आहे.
 
मोहम्मद बिन सलमान यांच्या सौदी सरकारचे प्रखर टीकाकार म्हणून ओळखले जाणारे खाशोग्जी यांची 2 ऑक्टोबर 2018 रोजी इंस्तबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या झाली होती. सुरुवातीला ते बपत्ता असल्याच्या बातम्या बाहेर आल्या होत्या आणि त्यांचा कसून शोध घेतला जाऊ लागला.
 
मात्र नंतर त्यांची हत्या झाल्याचा दाट संशय जिथे हा दूतावास आहे, त्या टर्कीच्या सरकारने व्यक्त केला होता. त्यानंतर झालेल्या तपासाअंती सौदीच्या काही एजंट्सनी त्यांची हत्या करून त्यांचा मृतदेह अॅसिडमध्ये टाकून संपवल्याचा खुलासा टर्कीच्या अधिकाऱ्यांनी केला होता.
 
त्यानंतर संशयाची सुई सलमान यांच्यावरही काही काळ राहिली होती. मात्र आपण त्यांची हत्या करण्याचे आदेश दिले नव्हते.
 
सौदीचे सरकारी वकिलांनी सांगितलं की त्यांची हत्या म्हणजे काही 'गुन्हगारांनी केलेलं ऑपरेशन' होतं. याप्रकरणी त्यांनी 11 लोकांविरुद्ध खटला भरला होता.
 
खाशोग्जी यांची कारकीर्द
जमाल खाशोग्जी यांचा जन्म मेडिना येथे 1958 मध्ये झाला. अमेरिकेतल्या इंडियाना युनिव्हर्सिटीतून ते MBA झाले.
त्यानंतर ते सौदी अरेबियात परतले आणि 1980 च्या सुमारास त्यांनी पत्रकारिता करायला सुरुवात केली. सौदी अरेबियात चालणाऱ्या संघर्षाचं त्यांनी स्थानिक वर्तमानपत्रातून वार्तांकन केलं.
ओसामा बिन लादेन यांच्याबद्दलच्या बातम्या करण्यासाठी ते प्रसिद्ध होते. त्यांनी 1980 ते 1990 या काळात त्यांनी अनेकदा ओसामा बिन लादेनची मुलाखत घेतली होती.
मध्य आशियातल्या महत्त्वांच्या घडामोडीचं त्यांनी वार्तांकन केलं होतं. कुवैतमध्ये सुरू झालेल्या संघर्षाचं रिपोर्टिंग त्यांनी केलं आणि 1990 मध्ये ते एका इंग्रजी वृत्तपत्राचे डेप्युटी एडिटर बनले.
2003मध्ये ते अल वतन या वर्तमानपत्राचे संपादक झाले. मात्र दोनच महिन्यात सौदीच्या प्रशासनाविरोधात टीका केल्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं.
त्यानंतर लंडनला गेले तिथून ते वॉशिंग्टनला गेले आणि सौदी अरेबियाचे माजी गुप्तचर विभागाचे प्रमुक प्रिन्स तुर्की बिन फैसल यांचे सल्लागार झाले.
2007 मध्ये ते अल-वतनला परतले.
2011 मध्ये अरब देशांत उठाव झाल्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दर्शवला.
2012मध्ये अल-अरब या येऊ घातलेल्या वृत्तवाहिनीचा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ही वाहिनी अल जजिरा या वाहिनीची प्रतिस्पर्धी ठरेल असं म्हटलं जात होतं.
2015 मध्ये बहरीनमध्ये ही वृत्तवाहिनी लाँच झाल्यानंतर 24 तासांच्या आतच प्रक्षेपण बंद झालं. कारण त्यांनी बहारीनच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित केल्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या रोषाला सामोरं जावं लागलं.
सौदी अरेबिया या विषयाचे तज्ज्ञ म्हणून खाशोज्गी यांना अनेक आंतरराष्ट्रीय वाहिन्यांमध्ये पॅनेलिस्ट म्हणून निमंत्रित केलं जात असे.
2017मध्ये सौदी अरेबिया सोडून ते अमेरिकेला गेले. वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रात त्यांनी सप्टेंबरमध्ये स्तंभलेखनास सुरुवात केली.