अनिकेत विश्वासराव विरोधात स्नेहा चव्हाणने दाखल केली कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार, गुन्हा दाखल
कळत नकळत, फक्त लढ म्हणा फेम अभिनेता अनिकेत विश्वासराव याची पत्नी स्नेहा चव्हाण हिने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केल्यानंतर पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हा गुन्हा दाखल झाल्यानंतर बीबीसी मराठीने अनिकेत विश्वासरावशी संपर्क साधला असता त्याने हे कौटुंबिक हिंसाचाराबाबतचा आरोप फेटाळून लावला आहे.
उलट आपल्याकडूनच खंडणी उकळण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे त्याने म्हटले आहे.
"माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्या आई वडिलांनी माझ्याकडे 25 लाखांची मागणी केली होती. पैसे न दिल्याने हा त्रास दिला जातोय. माझ्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुद्दाम तक्रार देण्यात आली आहे.
"आम्ही फेब्रुवारीपासून एकत्र राहत नाही. माझ्याकडे जी पैशाची मागणी केली जात आहे, त्याबाबत मी दहिसर पोलीस स्टेशनमध्ये याआधी तक्रार देखील दाखल केली आहे," असे अनिकेतने म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, "अनिकेतची पत्नी स्नेहाने तक्रार दाखल करताना असे म्हटले आहे की तिचा गळा दाबून, जीवे मारण्याचे धमकी देऊन हाताने मारहाण झाली आहे. तसेच त्याच्यापेक्षा पत्नीचे नाव चित्रपटसृष्टीत मोठे होईल अशी असुरक्षितता अनिकेतला वाटत होती त्यामुळे तो अपमानास्पद वागणूक देत होता."
अनिकेतचे वडील चंद्रकांत विश्वासराव आणि आई आदिती विश्वासराव यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत त्रास देत असताना या दोघांनी बघ्याची भूमिका घेतली असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.