मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीबीसी मराठीला पहिली मुलाखत दिली. यात त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा फोकस लोकसभा निवडणूक नसून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघे म्हणजे देशावर आलेलं संकट आहे आणि ते घालवण्यासाठी मी सध्या प्रचार करत आहे, असं ते म्हणाले.
त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शिवसेना, शरद पवार, माध्यमं आणि अनेक विषयांवर सविस्तर आणि रोखठोक मतं मांडली. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यातले मुख्य मुद्दे प्रश्नोत्तर स्वरूपात देत आहोत.
1.तुम्ही सभांच्या सादरीकरणावर एवढी मेहनत घेत आहात, तर स्वतःचे उमेदवार का नाही उभे केले?
राज - मी आधीच सांगितलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. गेल्या पाच वर्षांत मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची वाटचाल पाहिली. ती भविष्यात देशासाठी धोकादायक आहे आणि ते लोकांना सांगणं मला कर्तव्य वाटतं.
मी लोकसभा लढवली काय आणि नाही लढवली काय, माझा फोकस विधानसभा आहे आणि मी विधानसभेला उमेदवार उभे करीनच.
2.तुमच्या सभांचा काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा होतोय, हे तुम्हाला मान्य आहे का?
राज - मला देणं-घेणं नाही. ही दोन माणसं नकोत, एवढंच मला म्हणायचं. काँग्रेस-राष्ट्रवादीला फायदा झाला तर होऊ देत.
3.मुख्यमंत्री फडणवीस आरोप करत आहेत की तुम्ही विरोधकांची सुपारी घेतली.
राज - मी चार वर्षांपासून हेच बोलतोय. मी आधी काँग्रेसविरोधात प्रचार करत होतो, तेव्हा यांना गुदगुल्या होत होत्या. तेव्हा भाजपने दिली होती का सुपारी?
आता इम्रान खान सांगतोय की मोदी पंतप्रधान झाले पाहिजेत. मग कुणी कुणाची सुपारी घेतली?
4.मुख्यमंत्र्यांनी हेही विचारलंय की या सभांचा खर्च कोण करतंय?
राज - मी करतोय. फडणवीसांना खर्चाबद्दल बोलण्याचा अधिकारच नाही. भाजप एवढा खर्च निवडणुकीत करतो. हे पैसे आले कुठून? सभेला खर्च असतो तरी किती? मला यांच्यासारखे सभेला भाड्याने माणसं नाही आणावी लागत.
5.तुमचा राग फक्त नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर आहे की संपूर्ण भाजपवर?
राज - फक्त मोदी आणि शहा. भारतीय जनता पक्षाचाही राग त्यांच्यावरतीच आहे.
6.फडणवीसांवर राग नाही?
राज - तो बसवलेला माणूस आहे. हे बोल सांगितलं की बोलणार. जे वरून सांगणार ते करणार. स्वतःच्या हिमतीवरती बसलेला माणूस आणि दुसऱ्याने कुणी बसवलेला माणूस यात फरक आहे.
देवेंद्र फडणवीस हे माझ्यावर टीका करत असतील किंवा करावी लागत असेल. त्यांनी माझ्या मूळ प्रश्नांची उत्तरं द्या. नोटबंदी आणि GSTचं काय झालं, हे पंतप्रधानांनी सांगावं. बेरोजगारी का वाढली, हे सांगावं. सुप्रीम कोर्टाचे जजेस बाहेर येऊन सांगतात की लोकशाही धोक्यात आहे. RBI, CBIमध्ये जे चाललंय ते आजवर कधी घडलं नाही. या स्वायत्त संस्थांमध्ये या दोघांची ढवळाढवळ सुरू आहे.
7. हेच पंतप्रधान मोदी आणि शाह आधी गुजरातमध्ये होते, तेव्हा तुम्ही त्यांची स्तुती केली होती. आता घूमजाव का?
राज : तेव्हा माझ्यासोबत तिथले IAS अधिकारी होते. जे वातावरण तिथे होतं, त्यावेळी वाटलं की हा माणूस काहीतरी करेल. त्या वेळी तिथे काय प्रकारचा कारभार होता, हे नीट बाहेर आलं नव्हतं.
नंतर तो माणूस पंतप्रधान झाल्यावर वेगळाच झाला. ज्या योजना त्यांनी सांगितल्या देशाला, त्या फसल्या. आता ते जवानांच्या नावाने मतं मागत आहे. परवा दिवशी त्यांनी स्वतःची जात काढली.
8. तुम्ही जे मुद्दे मांडत आहात, ते मांडण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी यशस्वी ठरले, असं तुम्हाला वाटतं का? आणि जर नाही, तर तुम्ही त्यांच्याविषयी काही का बोलत नाही?
राज - ते अजिबात यशस्वी ठरले नाहीत. पण आता ते सत्तेत आहेत का? प्रश्न सत्तेत असलेल्यांना विचारतात.
9.तुमच्या सभांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होतोय आणि तुम्ही त्यांच्यावर टीका करत नाही. तुमचं त्यांच्यासोबत काय नातं आहे?
राज - काही नातं नाही. माझा त्यांच्याशी काय संबंध? मी जाहीर सभेत सांगितलं की मी अजित पवारांशी बोललो. त्यांना विचारलं की कोणत्या आधारावर तुम्ही मनसेबद्दल बोलत आहात?
10.ज्या काँग्रेसने तुम्हाला नाही म्हटलं, त्यांना तुम्ही का फायदा होऊ देत आहात?
राज - ही दोन माणसं नको. ज्यांचा फायदा व्हायचा, त्यांना होऊ द्या. माझ्या क्लिप्स बाहेरही फिरत आहेत. त्या राज्यांमध्ये इतर पक्षांना फायदा होईल.
11. राहुल गांधी चांगले पंतप्रधान होतील असं तुम्हाला वाटतं का?
राज - त्यांनाही संधी का मिळू नये? आपण हा एक (मोदींचा) प्रयोग करून पाहिला. आता दुसरा प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे?
12.तुम्ही शिवसेनेचा उल्लेख करणंही का टाळता?
राज - शिवसेनेतली लोकं लाचारीत घरंगळत गेलेली आहेत. त्यांच्याबद्दल काय बोलायचं? ते मोदी लाटेत निवडून आले होते. सत्तेसाठी आणि पैशासाठी लाचार आहेत हे दोघे. मी आधीच म्हटलं होतं की हे युती करणार. नसती केली युती तर शिवसेना फुटली असती. ते थोडी एकमेकांवर प्रेम करतात. कधी एकदा एकमेकांचा गळा घोटतो, अशी त्यांची परिस्थिती आहे.
13.तुम्ही प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे कसे बघतात?
राज - मला फक्त मोदी आणि शाह यांच्याबद्दल बोलायचंय.
14.मनसेच्या पडझडीच्या काळातून तुम्ही काय शिकलात?
राज - परभवाच्या काळात तुम्ही कसं राहायचं असतं, हे मी लहानपणासापून पाहात आलोय. पेशन्स सगळ्यांत महत्त्वाचा असतो. प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असतो. हा परभावाचा काळ मोदी लाटेच्या काळातला होता. याच काळात काँग्रेसही 44 पर्यंत खाली आलं.
15.राज ठाकरेंच्या भाषणांमुळे तरुण प्रभावित होतात. पण पक्ष संघटना बांधण्यात मनसे कमी पडलं, असं तुम्हाला वाटतं का?
राज - जनसंघ-भाजपला इतक्या वर्षांनंतर बहुमत मिळालं. तरीही भाजपला बाहेरून उमेदवार आणावे लागतात. मला तर फक्त 13 वर्षं झालीयेत. शिवसेनेच्या पराभवाचा काळ आठवा की.
तुम्ही फक्त 2014च्या नंतरचा परिणाम बघताय. पराभव कुणाला चुकलाय? संघटना उभी करायला वेळ लागतो. आमचा पक्ष मुंबई, पुणे, नाशिक आणि महाराष्ट्रात आहे की. पदाधिकारी आहेत. काम करत आहेत.
16.मनसेची उत्तर भारतीयांबद्दल आता काय भूमिका आहे?
राज - माझा मराठीचा मुद्दा आजही कायम आहे. उत्तर भारतीयांनी मराठी शिकली पाहिजे. माझ्या मराठी मुलांना प्राधान्य मिळायला पाहिजे. हे प्रत्येक राज्याबद्दलचं मत आहे. बिहारमध्ये बिहारी मुलांना प्राधान्य मिळावं.
17. विधानसभेसाठी मनसेची भूमिका काय असेल? स्वतंत्रपणे लढणार की युती करणार?
राज - आत्ता मी लोकसभेचा विचार करतोय. विधानसभेबद्दल विधानसभेच्या वेळी बोलू.