शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2019 (10:07 IST)

US Open: फेडररला टक्कर देणारा सुमीत नागल कोण आहे?

भारताच्या सुमीत नागलने युएस ओपन टेनिस स्पर्धेत रॉजर फेडररविरुद्ध पहिला सेट जिंकण्याची किमया केली.
 
ग्रँड स्लॅम स्पर्धा हा टेनिस विश्वाचा मानबिंदू. सोमवारपासून (26 ऑगस्ट) सुरू झालेल्या युएस ओपन स्पर्धेत सुमीत नागलने पात्रता फेरीचा टप्पा पार करत मुख्य फेरीत आगेकूच केली.
 
यंदाच्या दशकभरात ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळणारा सुमीत केवळ पाचवा भारतीय टेनिसपटू आहे.
ग्रँड स्लॅम स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा सहभाग वाढावा यासाठी 2008 मध्ये एक उपक्रम सुरू करण्यात आला होता. यासाठी देशभरातून 14 युवा टेनिसपटूंची निवड करण्यात आली. याच उपक्रमादरम्यान महेश भूपतीने सुमीतचा खेळ पाहिला. त्यावेळी कॅनडाचे कोच बॉबी महलही उपस्थित होते.
 
दोन वर्षातच तो उपक्रम बंद पडला. मात्र महेश भूपतीने सुमीतच्या प्रशिक्षणाची जबाबदारी घेतली. 2011 पर्यंत सुमीत महेशच्या मार्गदर्शनाखाली खेळत होता. त्यानंतर तो कॅनडाला रवाना झाला. कॅनडात तीन वर्ष प्रशिक्षण घेतल्यानंतर सुमीतने जर्मनी गाठलं. मारिआनो डेल्फिनो यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळतो.
 
2015 मध्ये विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर नोव्हाक जोकोव्हिचने इतिहास घडवला होता. विम्बल्डनच्या त्याच ऐतिहासिक प्रांगणात भारताच्या सुमीत नागलने ल्यू होआंग नामच्या साथीने ज्युनियर गटात मुलांच्या दुहेरीचं जेतेपद पटकावलं होतं.
 
सीनियर पातळीवर दबदबा राखणारे नोव्हाक जोकोव्हिच, राफेल नदाल, सेरेना विल्यम्स या सगळ्यांनी एकेकाळी ज्युनियर गटात चमकदार कामगिरी केली होती.
 
ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये वर्षानुवर्षे भारताचं प्रतिनिधित्व लिएंडर पेस, महेश भूपती, सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांच्यापुरतं मर्यादित होतं. यंदा सुमीत नागल तसंच प्रज्ञेश गुणेश्वरन यांच्या निमित्ताने भारतीय तिरंगा युएस ओपनमध्ये फडकतो आहे.
 
सुमीतचा जन्म हरिणायातील झज्जरचा. दिल्लीतल्या नांगलोई परिसरात त्याचं बालपण गेलं. मध्यमवर्गीय वातावरणात वाढलेल्या सुमीतच्या टेनिसला कुटुंबीयांनी प्रोत्साहन दिलं. त्याची गुणवत्ता प्रशिक्षकांनी हेरली आणि त्याला प्रगत प्रशिक्षणाचा सल्ला दिला. टेनिससाठी आवश्यक सोयीसुविधा झज्जरमध्ये नव्हत्या तसंच टेनिससाठी लागणारा पैसाही सुमीतच्या कुटुंबाकडे नव्हता.
 
याच काळात महेश भूपतीने युवा खेळाडूंसाठी अकादमी सुरू केली होती. महेशने सुमीतचा खेळ पाहिला. सुमीतच्या टेनिस प्रशिक्षणाची, शिक्षण, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सहभाग, प्रवास या सगळ्याची जबाबदारी महेश भूपतीने घेतली.
 
महेशने दाखवलेला विश्वास सुमीतने सार्थ ठरवत वाटचाल केली. महेशच्या पुढाकारानेच सुमीतने काही काळ जर्मनीतील श्युलर वास्क अकादमीतही प्रशिक्षण घेतलं.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या सातत्यपूर्ण स्पर्धेमुळे सुमीतला अनेक स्पर्धांमध्ये प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. सुमीतने चुका टाळून, नव्या गोष्टी शिकत खेळात आवश्यक बदल केला. 2009 मध्ये युकी भांब्रीने ज्युनियर गटात विम्बल्डन एकेरीचे जेतेपद पटकावलं होतं. त्यानंतर सहा वर्षांनी सुमीतने त्या कामगिरीची पुनरावृत्ती केली.
 
2017 बेंगळुरू ओपन स्पर्धेत वाईल्ड कार्ड एंट्री मिळालेल्या सुमीतने जेतेपदाची कमाई केली. त्याच वर्षी सुमीतने भारतीय डेव्हिस चषक संघात पदार्पण केलं.
 
टेनिसच्या निमित्ताने सुमीत सातत्याने घरापासून दूर असतो. अनेक महिने घरच्यांची भेट होत नाही. कढी चावल हा त्याचा आवडता पदार्थ आहे.
 
'तीनवेळा मी ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पात्रता फेरीत खेळलो मात्र अपयशी ठरलो. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या मुख्य फेरीत खेळण्याची संधी मिळणं अनोखं आहे. प्रत्येक टेनिसपटूचे ते स्वप्न असतं. रॉजर फेडररसारख्या दिग्गज खेळाडूविरुद्ध ग्रँड स्लॅम स्पर्धेत खेळायला मिळणं ही सुवर्णसंधी आहे. तो माझा आदर्श आहे. खेळणं किंवा जिंकणं तो मुद्दा नाही. त्याच्याविरुद्ध खेळायला मिळणं हाच मोठा सन्मान आहे', असं सुमीतने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.
 
सुमीतला टॅटूंची आवड असून, त्याच्या हातावर असंख्य टॅटू पाहायला मिळतात.
 
सुमीत सध्या जर्मनीतल्या नेन्सेल अकादमीत प्रशिक्षण घेतो. कोच शासा नेन्सेल, फिटनेस डिरेक्टर मिलोस गॅलेकिक यांच्या मार्गदर्शनाखाली तो खेळतो.
 
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने सुमीतला शुभेच्छा दिल्या होत्या.