शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 1 ऑगस्ट 2019 (10:25 IST)

पाकिस्तानातली बंद असलेली हिंदू मंदिरं कधी उघडणार?

भूमिका राय
पाकिस्तानातल्या सियालकोटमध्ये असलेलं हिंदूंचं एक मंदिर नुकतच उघडण्यात आलं. भारतीय मीडियामध्ये या बातमीची बरीच चर्चा झाली. शवाला तेजा सिंह मंदिर असं या मंदिराचं नाव आहे.
 
भारतीय मीडियाच्या रिपोर्ट्सनुसार हे मंदिर सोमवारी उघडण्यात आलं. मात्र, पाकिस्तानातल्या पत्रकारांचं म्हणणं आहे की हे मंदिर यावर्षी मे महिन्यातच भाविकांसाठी खुलं करण्यात आलं होतं.
 
दिवंगत लेखक आणि इतिहासकार राशिद नियाज यांच्या 'History of Siyalkot' या पुस्तकानुसार हे मंदिर 1000 वर्षं जुनं आहे, असं लिहिण्यात आलं आहे.
 
1992 साली बाबरी मशीद पाडल्यानंतर पाकिस्तानातल्या या मंदिरावरही हल्ला झाला होता. त्यात मंदिराची हानीही झाली होती. पाकिस्तानात हिंदू समाज सर्वांत मोठा अल्पसंख्याक समाज आहे.
 
अधिकृत आकडेवारीनुसार पाकिस्तानात 75 लाख हिंदू आहेत. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर तब्बल 72 वर्षांनी हे मंदिर उघडण्यात आलं आहे.
 
भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेळी आणि बाबरी मशीद विध्वंसानंतर पाकिस्तानात मंदिरं आणि हिंदूंच्या इतर धार्मिक स्थळांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात आलं होतं. याच कारणामुळे शवाला तेजा सिंह मंदिर भाविकांसाठी खुलं होणं, महत्त्वाचं मानलं जातंय.
 
बीबीसीने सियालकोटमधले 'जियो न्यूजचे पत्रकार ओमर एजाज' आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या तहरिक-ए-इंसाफ पक्षाचे खासदार डॉ. रमेश कुमार वाकवाणी यांच्याशी याविषयी चर्चा केली.
 
पाकिस्तानी पत्रकार ओमर एजाज यांचा दृष्टीकोन
भारतीय मीडियामध्ये आलेल्या बातम्यांच्या उलट हे मंदिर यावर्षी मे महिन्यातच खुलं करण्यात आलं होतं आणि मंदिरात नियमित पूजाही सुरू आहे. सियालकोटमध्ये जवळपास 150 हिंदू कुटुंब राहतात. त्यांच्या विनंतीवरूनच मंदिर उघडण्यात आलं.
 
इथे राहणाऱ्या हिंदूंनी मंदिर उघडावं, असं निवेदन दिलं होतं. अर्ज मिळाल्यानंतर मंदिर तात्काळ उघडण्यात आलं आणि पूजा-अर्चनेची व्यवस्था करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन मंदिर उघडलं.
 
मंदिर उघडल्यानंतर आधी साफ-सफाई करण्यात आली. मंदिराच्या पुनर्निमाणासाठी लवकरच निधी जाहीर करण्यात येईल, अशाही बातम्या आहेत.
भारत-पाकिस्तान फाळणीपासूनच हे मंदिर बंद होतं. आता 72 वर्षांनंतर मंदिर पुन्हा उघडण्यात आलं आहे. एक पाकिस्तानी पत्रकार या नात्याने मी सांगू इच्छितो की आम्ही हिंदूंचे सण-उत्सव सर्वांचं रिपोर्टिंग करतो. हिंदूंना शक्य तेवढी सुरक्षा पुरवण्याचा प्रयत्न असतो, हे देखील मी बघितलं आहे.
 
मंदिर कोणत्या देवाचं आहे, याची मला खात्रीशीर माहिती नाही. मात्र, मंदिरात अनेक मूर्ती आहेत. मंदिराच्या भिंतींवरही काही देवी-देवतांची चित्र आहेत.
 
मंदिर उघडल्यामुळे हिंदूंमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मुस्लीम बहुल भाग असूनही त्यांच्या एका अर्जावर प्रशासनाने मंदिर उघडलं, याचा त्यांना विशेष आनंद आहे.
खासदार डॉ. रमेश वांकवानी यांचा दृष्टीकोन
पाकिस्तानात अनेक मंदिरं आणि गुरुद्वारा अजूनही बंद आहेत. फाळणीच्या वेळी अनेक हिंदू पाकिस्तानातून भारतात गेले. त्यामुळे इथं मंदिर आणि गुरुद्वारांचा सांभाळ करायला कुणी उरलंच नाही. त्यामुळे काही मंदिरांमध्ये कमर्शिअल कॉम्प्लेक्स तयार करण्यात आलं तर काहींमध्ये प्लाझा.
 
पाकिस्तानात 'ईव्हायक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाची' स्थापना झाली. त्यानंतर जवळपास 1130 मंदिरं आणि 517 गुरुद्वारांची कस्टडी या बोर्डाकडे देण्यात आली.
 
या 1130 मंदिरांपैकी आज केवळ 30 मंदिरं खुली करण्यात आली आहे. 1100 मंदिरं अजूनही बंद आहेत. तर 517 गुरुद्वारांपैकी फक्त 17 खुल्या करण्यात आल्या आहेत.
 
72 वर्षांपासून बंद असलेलं मंदिर एका अर्जावर उघडलं, हे चांगलंच आहे. मात्र, अजूनही खूप काम शिल्लक आहे.
 
माझा नेहमीच प्रयत्न असतो की पंडित जवाहरलाल नेहरू आणि लियाकत अली खान यांच्यात झालेल्या करारानुसार 'ईव्हायक्यूई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचा' अध्यक्ष हिंदू व्यक्ती असायला हवी. भारतात मशीद आणि इस्लामिक संस्थांचा प्रमुख मुस्लीम असतो, अगदी त्याप्रमाणे. मात्र, आजवर एकही हिंदू या बोर्डाचा अध्यक्ष झालेला नाही.
 
हिंदू अध्यक्ष असल्यावर सर्वच्या सर्व 1130 मंदिरं आणि 517 गुरुद्वारा उघडतील, असं मला वाटतं. मात्र, अध्यक्ष हिंदू नसेल तर याकामी खूपच वेळ लागेल. एक मंदिर उघडायला वर्षभर लागलं तर विचार करा 1130 मंदिरं खुली करण्यासाठी किती वर्ष लागतील?