शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (10:06 IST)

फेसबुकचे नाव आता Meta, 'मेटाव्हर्स' (Metaverse) काय आहे?

फेसबुक कंपनीने आपले नाव बदलून मेटा (Meta) झाल्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या वार्षिक डेव्हलपर कॉन्फरन्समध्ये ही घोषणा करण्यात आली.
 
'या नवीन नावामुळे कंपनी ज्या सेवा पुरवत आहे आणि ज्या क्षेत्रात कायम करत आहेत, त्याबद्दलची कल्पना अधिक स्पष्ट होईल,' असा विचार या वेळी मांडण्यात आला.
 
फेसबुकने आपल्या कंपनीचं नाव बदलणार असल्याची घोषणा केली आहे, पण त्याचवेळी हे देखील स्पष्ट केलं आहे की फेसबुकच्या मालकीच्या स्वतंत्र प्लॅटफॉर्मची नावे कायम राहतील.
 
म्हणजेच फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप ही नावं कायम राहतील. हे प्लॅटफॉर्म ज्या एका छत्राखाली येतील त्या कंपनीचं नाव मेटा असेल असं फेसबुकने स्पष्ट केलं आहे.
 
कंपनीने मेटाव्हर्सची संकल्पना काय असेल आणि ती प्रत्यक्षात कशी आणली जाईल याची योजना देखील जाहीर केली आहे.
 
मेटाव्हर्स हे एक पूर्णतः ऑनलाईन विश्व असेल ज्या ठिकाणी व्हर्च्युअल वातावरणात आपल्याला ऑनलाईन गेम्स खेळता येऊ शकतील, काम करता येऊ शकेल त्याच बरोबर संभाषण देखील साधता येईल.
 
फेसबुकचे संस्थापक मार्क झकरबर्ग काय म्हणाले?
फेसबुक एका नव्या अध्यायाला सुरुवात करत आहे, असं मार्क झकरबर्ग यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
 
इंटरनेट क्षेत्रासाठी आणि आमच्या कंपनीसाठी हा एक नवा अध्याय असेल, असं ते म्हणाले. फेसबुकचा उद्देश हा सर्वांना जवळ आणणे हा आहे. त्यानुसारच या क्षेत्रात पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटलं.
 
फेसबुकने नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे सध्या फेसबुकची ओळख एक सोशल मीडिया कंपनी अशी आहे. पण त्याच वेळी आम्ही आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक वापरले गेलेलं तंत्रज्ञान आणि उत्पादन विकसित केलं आहे, असं झकरबर्ग म्हणाले.
 
आमच्या उद्देश सेवा पुरवून पैसे कमवणे नाही. चांगल्या सेवा प्रदान करता याव्यात यासाठी आम्ही पैसा कमावतो असं झकरबर्ग म्हणाले.
 
आपल्या पत्रात त्यांनी फेसबुकचे भविष्य काय असेल याची मांडणी केली आहे. या सेवा प्रदान करताना लोकांच्या सुरक्षिततेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी देखील प्राधान्याने घेतली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
 
पाहणाऱ्या एखाद्याला कदाचित ही VR म्हणजेच व्हर्च्युअल रिएलिटी (Virtual Reality) ची सुधारित आवृत्ती वाटू शकेल. पण मेटाव्हर्स हे इंटरेनेटचं भविष्य असेल, असं काहींनी वाटतंय.
 
मेटाव्हर्स म्हणजे व्हर्च्युअल रिएलिटीद्वारे उभं करण्यात आलेलं असं एक जग जिथे तुमचा एक डिजिटल अवतार असेल आणि कम्प्युटरने निर्माण केलेल्या या जगाचा इतर युजर्ससोबत तुम्ही अनुभव घेऊ शकाल.
 
थोडक्यात सांगायचं झालं तर 1980च्या दशकातल्या बोजड हँडसेट्सची जागा जशी आजच्या आधुनिक स्मार्टफोन्सनी घेतली तसंच काहीसं VR आणि मेटाव्हर्सबद्दल म्हणता येईल.
 
म्हणजे कॉम्प्युटरऐवजी एखादा हेडसेटवापरून तुम्ही या मेटाव्हर्सचा अनुभव घेऊ शकता. हा हेडसेट तुम्हाला सगळ्या प्रकारचे डिजीटल अनुभव असणाऱ्या एका व्हर्च्युअल वर्ल्ड म्हणजे आभासी जगताशी जोडेल.
 
सध्या व्हर्च्युएल रिएलिटी म्हणजेच VR चा वापर हा जास्त गेमिंगसाठी केला जातो. पण मेटाव्हर्स मात्र काम, टाईमपास, कॉन्सर्ट्स, सिनेमा किंवा नुसती मजामस्ती करायलाही वापरता येईल.
 
या मेटाव्हर्सची अजून नेमकी अशी एक व्याख्या नाही. पण यामध्ये तुमचं प्रतिनिधित्वं करणारा तुमचा एक 3D अवतार असेल, असं बहुतेकांना वाटतंय.
 
यापू्वीच्या ब्रँडमध्ये आम्ही आज जे काही करत आहोत, त्या सर्वांचा समावेश होणं शक्य नव्हतं. तसंच भविष्यातही त्या एका ब्रँडमध्ये सर्व करणं शक्य झालं नसतं, त्यामुळं नाव बदलल्याचं मार्क झकरबर्ग यांनी म्हटलं आहे.
 
"भविष्यात आम्च्याकडे मेटाव्हर्स कंपनी म्हणून पाहिलं जाईल अशी मला आशा आहे. आम्ही जे काही निर्माण करत आहोत, त्या आधारे काम आणि आमचं अस्तित्व अधिक मजबूत करायचं असल्याचंही, झकरबर्ग यांनी व्हर्च्युअल कॉन्फरन्समध्ये सांगितलं.
 
"आम्ही आता या व्यवसायांकडे दोन वेगळ्या विभागांच्या दृष्टीनं पाहत आहोत. एक म्हणजे आमचे अॅप्स आणि दुसरं म्हणजे भविष्यातील प्लॅटफॉर्मसाठीचं काम."
 
"याचाच एक भाग म्हणून, आम्ही कोण आहोत? काय करतो? आणि आम्हाला नेमकं काय निर्माण करायचं आहे, हे सांगण्यासाठी आम्ही हा नवीन ब्रँड स्वीकारला आहे," असंही त्यांनी म्हटलं.
 
कंपनीनं कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्क येथील मुख्यालयामध्ये नव्या चिन्हाचं (साईन) अनावणरणही केलं. कंपनीच्या थम्स अपच्या लोगो ऐवजी आता निळ्या आकाराचं हे चिन्हं कंपनीची नवी ओळख असेल.
 
आमच्या यूझर्सना आमच्या इतर सेवा वापण्यासाठी फेसबूकचा वापर करण्याची आता गरज नाही, हे नवीन नावाद्वारे दर्शवत असल्याचं झकरबर्ग यांनी सांगितलं.
 
कंपनीचं नवं 'मेटा' हे नाव ग्रीकमधील असून त्याचा अर्थ 'पलिकडे किंवा च्या पलिकडे' (beyond) असा आहे.
 
फेसबूकमधील एका माजी कर्मचाऱ्यानं लीक केलेल्या काही डॉक्युमेंटच्या आधारे एकापाठोपाठ समोर आलेल्या काही नकरात्मक बातम्यामुळं हे पाऊल उचलण्यात आलं आहे.