शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (12:43 IST)

किरण गोसावी 2019 पासून फरार होता, दुसऱ्या नावानं फिरत होता- पुणे पोलिसांची माहिती

क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये एनसीबीचे साक्षीदार असलेले किरण गोसावी यांना अटक झाली आहे. पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक केली आहे.
 
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी किरण गोसावीला ताब्यात घेण्यात आलं असून अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सांगितलं.
 
किरण गोसावी 2019 पासून फरार होते. आमच्या वेगवेगळ्या टीम्स ठिकठिकाणी गेल्या. आज (28 ऑक्टोबर) सकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं, अशी माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.
 
"2018 मधलं हे प्रकरण आहे. एका व्यक्तीला नोकरीसाठी मलेशियाला पाठवण्यात आलं आणि त्यात त्याची फसवणूक करण्यात आली होती. फसवणुकीचे इतरही अनेक बळी असू शकतात. आमच्या अखत्यारितलं कोणी समोर आलं तर तो गुन्हाही दाखल करून घेतला जाईल," असंही गुप्ता यांनी म्हटलं.
 
अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं की, आम्ही 10 दिवसांपासून त्यांच्या मागावर होतो. लखनऊ, हैदराबाद तेलंगणा, जळगाव अशा अनेक ठिकाणी तो होता. आम्ही या गुन्ह्यांचा तपास करू. इतर एजन्सीना ताबा हवा असेल, तर ते रिमांड घेतील.
 
किरण गोसावी वेगवेगळ्या शहरांत फिरताना सचिन पाटील नावाने फिरत होता त्याने स्वतःच ही माहिती दिली. या नावाने तो हॉटेलमध्ये रहायचा. आपण एका NGO चे संचालक असल्याचं सांगायचा. त्याचा इम्पोर्ट - एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं आणि लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम करत असल्याचं त्याने सांगितलंय, असं पुणे पोलिसांनी सांगितलं.
 
माझं NCB शी बोलणं झालेलं नसल्याचंही अमिताभ गुप्तांनी म्हटलं.
 
कुठल्या प्रकरणी अटक?
पुण्यात किरण गोसावींच्या विरोधात काही गुन्हे दाखल होते. 2018 मध्ये चिन्मय देशमुख यांनी गोसावींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.
 
गोसावी यांनी चिन्मयला मलेशियाला नोकरी देण्याचं आमिष दाखवलं होतं. पण मलेशियाला गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं चिन्मय यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी याबाबत तक्रार केली होती.
 
गोसावी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आरोप फेटाळले होते. "माझ्यावर दाखल झालेली केस संपली आहे. हे गुन्हे टेक्निकल स्वरूपाचे आहेत. हे गुन्हे माझ्या कामाशी संबंधित आहेत."
 
"पुण्याच्या प्रकरणातील व्यक्तीला मी मलेशियाला पाठवलं होतं. पण काही वैद्यकीय कारणांमुळे ते परत आले. त्यांनी वैद्यकीय गोष्टी माझ्यापासून लपवल्या, असं त्यांनी सांगितलं होतं. उलट मलेशियात त्यांच्यावर केस होणार होती. त्यातून मीच त्यांना वाचवलं," असं गोसावी म्हणाले होते.
 
'माझ्या जीवाला धोका'
जीवाला धोका असल्याच्या कारणामुळं महाराष्ट्राबाहेर असल्याचं किरण गोसावी यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. आर्यन खान प्रकरणात समोर आलेल्या फोटोंनंतर किरण गोसावी चर्चेत आले होते.
 
किरण गोसावी यांनी बीबीसीबरोबर बोलताना पोलिसांना शरण यायला तयार असल्याचं सांगितलं होतं. "मी सरेंडर होण्यासाठी तयार आहे. सहा ऑक्टोबरला मी सरेंडर करणार होतो. पण त्यादिवशी मला फोन आला की, सरेंडर झाल्यानंतरही काय हाल होतील ते आम्ही पाहू. मग मी विश्वास कोणावर ठेऊ?" असं गोसावी म्हणाले होते.
 
गोसावी यांचे सुरक्षा रक्षक असलेले प्रभाकर साईल यांनी किरण गोसावी यांच्यावर एनसीबीच्या छाप्याशी संबंधित काही गंभीर आरोप केले होते.
 
किरण गोसावी कोण आहेत?
किरण गोसावी हे स्वतः प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असल्याचं सांगतात. पुण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीमध्ये किरण गोसावी केपीजी ड्रिम्स सोल्युशन्स नावाची फर्म मुंबईतील घाटकोपर भागात चालवत असल्याचं सांगण्यात आले आहे.
 
गोसावी यांच्या विरोधात याशिवायदेखील इतर काही गुन्हे दाखल आहेत.
 
2015 मध्ये देखील ठाण्यातील कापुरबावडी पोलीस स्टेशनमध्येही गोसावींच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे. अंधेरीमध्ये देखील 2007 साली गोसावींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.