किरण गोसावी पुन्हा ‘पसार’, पुणे पोलिसांच्या हातातून थोडक्यात निसटला?
क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात वादग्रस्त असलेल्या किरण गोसावीने पुणे पोलिसांना उत्तर प्रदेशामध्ये गुंगारा दिला दिला असल्याची सध्या पोलिस वर्तुळामध्ये चर्चा आहे. एकिकडे आर्यन खान अटक प्रकरणावर सुनावणी सुरु असताना या प्रकरणातील पंच पसार झाला आहे. मागील काही दिवसांपासून फरार असलेला किरण गोसावी उत्तर प्रदेशातील लखनऊ इथं लपून बसला होता. त्याने स्वत: पोलीसंना शरण येणार असं जाहीर केलं होतं. मात्र पुणे पोलीस लखनौला पोहचण्यापुर्वीच तो तिथूनही पळून गेला असं समजतंय मात्र त्यास अद्याप पोलिसांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही.
किरण गोसावी पुण्यातील एका गुन्ह्यात फरार आहे. दरम्यान, मुंबई क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणामुळे तो चर्चेत आला.त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. परंतु तो पोलिसांना गुंगारा देत होता. मोठ्या मुश्किलीने त्याचा ठावठिकाणा लागला होता.
किरण गोसावी हा उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये लपून बसल्याचे समोर आल्यानंतर सोमवारी रात्री तो पोलिसांना शरण येणार होता.तो मंडियांव पोलीस आयुक्तालयात हजर होणार होता.मात्र सोमवारी रात्री उशीरापर्यंत तो शरण आला नाही. पुणे पोलिसांचं पथक पोहोचण्याआधीच गोसावी लखनऊमधून पळून गेल्याचं कळतंय.गोसावी हा उत्तर प्रदेशात असून तो त्याचे लोकेशन सातत्याने बदलतोय. आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान त्याचं शेवटचं लोकेशन हे फत्तेपूर असल्याची पोलिसांची माहिती आहे.