बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (16:36 IST)

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानावर शिवसेना-भाजपमध्ये काय प्रतिक्रिया?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी आता शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप, शाब्दिक चकमक सुरू झाली आहे.
 
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करून नारायण राणेंनी केलेल्या विधानावरुन नाशिक शहराचे शिवसेना शहराध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नाशिकमध्ये नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
 
नेमकं काय म्हणाले होते राणे?
नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सुरु आहे. रविवारी (22 ऑगस्ट) रायगडमधील महाड येथे या यात्रेदरम्यान त्यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात वादग्रस्त विधान केलं.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान मात्र त्यांचा गोंधळ उडाला. हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरकमहोत्सव? यावरून मुख्यमंत्री गोंधळलेले दिसले असं ते म्हणाले.
 
"बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि विचारून बोल. त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून, अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असतं", असं वादग्रस्त वक्तव्य केलं नारायण राणे यांनी केलं आहे.
 
"देशाच्या स्वातंत्र्य दिनाविषयी तुम्हाला माहिती नसावी? मला सांगा किती चीड येणारी गोष्ट आहे, असंही राणे म्हणाले. सरकार कोण चालवतंय ते कळत नाही, सरकारला ड्रायव्हरच नाही", अशी टीका देखील त्यांनी केलीय. राष्ट्रवादी मात्र सत्ता उपभोगते आहे, असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला आहे.
 
केंद्रीय मंत्र्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या विधानाचे पडसाद उमटले. शिवसेना नेते विनायक राऊत यांनी राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
 
'…तर घरात घुसून माज उतरवू'- संजय गायकवाड
'हे बेताल वक्तव्य नाही तर हे माज असलेलं वक्तव्य आहे. केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर महिन्याभरात केलेलं हे विधान म्हणजे त्यांना माज आल्याचं लक्षण आहे. माझा त्यांना इशारा आहे की तुम्ही यापुढे मुख्यमंत्र्यांबद्दल बेताल वक्तव्य केलं तर घरात घुसून तुमचा माज उतरवू. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे आणि त्याच स्टाइलमध्ये आम्ही त्यांना प्रत्युत्तर देऊ,' असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं आहे.
 
केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून, असं वक्तव्य करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे हे त्यांनी विसरु नये, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
 
'सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका'
नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंबद्दल वक्तव्यावर एकीकडे शिवसेना नेते प्रतिक्रिया देत आहेत, तर दुसरीकडे राणे यांचे पुत्र नितेश आणि नीलेश यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे.
 
नितेश राणे यांनी ट्वीट करत म्हटलं की, युवा सेनेच्या सदस्यांना आमच्या जुहू येथील घराबाहेर जमण्याचे आदेश दिल्याचं समजतं. मुंबई पोलिसांनी त्यांना थांबवावं अन्यथा काही घडलं तर आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. सिंहाच्या गुहेत शिरण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही वाट बघत आहोत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.
 
नीलेश यांनी ट्वीट करुन म्हटलं, "कुठेतरी बॅनर लावून आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल की आम्हाला फरक पडतो तर त्यांनी लक्षात घ्यावं आम्हाला काडीभर फरक पडत नाही. खऱ्या आईचं दूध प्यायला असाल तर समोर या आणि दोन हात करा, तुमची औकात दाखवून देऊ."
 
राणेंवरील कारवाई राजकीय सूडापोटी- राम कदम
नारायण राणे यांच्या विधानावर नितेश राणे आणि नीलेश राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असल्या तरी भाजपकडून अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही.
 
भाजप आमदार राम कदम यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना राणेंवरील कारवाई ही राजकीय आकसापोटी होत असल्याचं म्हटलं, पण अधिकृत भूमिका ही पक्षाचे वरिष्ठ नेते व्यक्त करतील अशीही सावध भूमिका त्यांनी घेतली.
 
राम कदम यांनी म्हटलं की, राज्यातील जनतेचा उद्रेक जनआशीर्वाद यात्रेतून दिसत आहे. त्यामुळे धास्तावलेल्या सरकारनं रडीचा डाव सुरू केला. नारायण राणेंवरील कारवाई ही पूर्णपणे राजकीय सूडापोटी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिपदाचा मान राखणं हे महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित होतं.
 
"नारायण राणे यांची शैली ही पहिल्यापासून आक्रमक आहे. राणे यांच्या विधानावर जर आक्षेप घ्यायचा असेल, तर दसरा मेळाव्यातील अनेक भाषणं काढून पाहा, त्यातही अनेक आक्षेपार्ह विधानं सापडतील. मग जो नियम इतरांना लावला जातो, तो मुख्यमंत्र्यांना लावला तर चालेल का? त्यामुळे नारायण राणेंच्या शैलीसाठी राजकीय सूडापोटी कारवाई करणं हा सरकारचा डरपोकपणा आहे," असं राम कदम यांनी म्हटलं.