1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : गुरूवार, 16 जानेवारी 2020 (12:14 IST)

आलिया भट साकारत असलेल्या 'गंगुबाई काठियावाडी' नेमक्या कोण होत्या?

अमृता दुर्वे
संजय लीला भन्साळींनी आपल्या नवीन सिनेमाची घोषणा केलीय. आलिया भट्टची मुख्य भूमिका असणाऱ्या या सिनेमाचं नाव आहे 'गंगुबाई काठियावाडी'.
 
60च्या दशकामध्ये मुंबईतल्या कामाठीपुऱ्यामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या गंगुबाईच्या आयुष्यावर हा सिनेमा आहे. पत्रकार - लेखक एस. हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकातील गंगुबाईंच्या व्यक्तिचित्रणावर हा सिनेमा बेतलेला आहे.
 
कोण होत्या गंगुबाई?
गंगुबाईंचं खरं नाव - गंगा हरजीवनदास काठियावाडी. गुजरातमधल्या काठियावाडमध्ये त्यांचा जन्म झाला आणि तिथेच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या.
 
माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकाचे लेखक एस. हुसैन झैदी गंगुबाईंविषयी सांगतात.
 
"ही बाई एखादी हिंसक गँगस्टर नव्हती, ती कुंटणखाना चालवायची. तिला फसवून या धंद्यात आणण्यात आलं होतं. काठियावाडमधल्या एका चांगल्या घरातली ही मुलगी होती. या घराण्याला शिक्षणतज्ज्ञ, वकिलांची परंपरा होती. ही 'गंगा' रमणिकलाल नावाच्या एका अकाऊंटंटच्या प्रेमात पडली आणि कुटुंब त्याच्यासोबत लग्नाला तयार होणार नाही म्हणून मुंबईला पळून आली.
 
पण या माणसाने तिला फसवलं आणि कामाठीपुऱ्यात विकलं. कामाठीपुऱ्यात आल्यानंतर आपला परतीचा मार्ग बंद झाल्याचं तिच्या लक्षात आलं होतं. तिला कुटुंबातल्या कोणीही स्वीकारलं नसतं. म्हणून तिने एकप्रकारे परिस्थिती स्वीकारली आणि वेश्याव्यवसाय करू लागली. ती कोणी गँगस्टर नव्हती. ती अंडरवर्ल्डचा हिस्सा नव्हती. पण ती अशा एका व्यवसायात होती, ज्याकडे चांगल्या दृष्टीने पाहिलं जात नाही. मग कालांतराने ती कामाठीपुऱ्यातल्या कुटुंणखान्यांची प्रमुख झाली."
 
वेश्याव्यवसायात आल्यानंतर गंगाची 'गंगू' झाली. आणि वेश्याव्यवसाय करणारी गंगू कालानंतरने व्यवसाय चालवणारी 'मॅडम' झाली.
 
कामाठीपुऱ्यातल्या 'घरवाली निवडणुकांना' गंगुबाई उभ्या राहिल्या आणि जिंकल्याही. वेश्याव्यवसाय करणाऱ्या गंगूला आता गंगुबाई काठेवाली म्हटलं जाऊ लागलं. एकीकडे हा 'कोठेवाली' चा अपभ्रंश होता. तर दुसरीकडे कुटुंबाच्या 'काठियावाडी' या नावाशी जवळीक साधणारी ही शेवटची गोष्ट होती.
वेश्यांसाठी आईसारख्या
60 आणि 70च्या दशकांत गंगुबाईंचा कामाठीपुऱ्यात दरारा होता. वेश्यांना त्या आईसारख्या वाटायच्या. तर कुंटणखाने चालवणाऱ्या मॅडमवर त्यांचा दरारा असे.
 
सोनेरी किनार असलेली पांढरी साडी आणि सोनेरी बटणांचा ब्लाऊज आणि सोनेरी काड्यांचा चष्मा अशा वेशातल्या गंगुबाई कारमधून फिरत.
 
सोन्याचे दागिने घडवून ते वापरण्याचा त्यांना नाद होता. मुंबईत येऊन अभिनेत्री होण्याचं त्यांचं लहान असताना स्वप्न होतं. सिनेमाची त्यांची ही आवड नंतरही कायम होती. फसवून आणलेल्या अनेक तरूणींना परत जाण्यासाठी त्यांनी मदत केली.
 
पण त्यासोबतच वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना संरक्षण देणं, त्यांच्यावर अन्याय झाल्यास त्याविषयी आवाज उठवणं, त्यांना त्रास देणाऱ्याचा बंदोबस्त करणं यासाठीही त्या ओळखल्या जात.
 
शहरांमध्ये वेश्याव्यवसायाला जागा देणं गरजेचं आहे, असं त्यांचं ठाम मत होतं. आझाद मैदानामध्ये झालेल्या महिला सशक्तीकरण आणि महिला हक्कांसाठीच्या मोर्चामध्ये त्यांनी केलेलं भाषण अतिशय गाजलं होतं.
 
गंगुबाईच्या निधनानंतर कामाठीपुऱ्यातल्या अनेक कुंटणखान्यात त्यांचे फोटो लावण्यात आले, त्यांचे पुतळे बसवण्यात आले.
 
करीम लाला आणि गंगुबाई
कामाठीपुरा परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे गंगुबाईंचा दरारा वाढला. कुंटणखान्यामध्ये आलेल्या एका पठाणाने गंगुबाईंशी गैरवर्तन केलं. त्यांच्यावर जबरदस्ती करत त्यांना शारीरिक इजा तर केली, पैसेही दिले नाहीत. हे पुन्हा पुन्हा घडलं.
 
एकदा तर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने या पठाणाविषयी माहिती काढली. शौकत खान नावाचा हा पठाण करीम लाला गँगचा असल्याचं त्यांना समजलं.
 
अब्दुल करीम खान यांना अंडरवर्ल्डमध्ये करीम लाला म्हणून ओळखलं जाई. या करीम लालांना गंगुबाईंनी गाठलं आणि आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला. गंगुबाईंचं संरक्षण करण्याचं वचन करीम लालांनी दिलं.
 
पुढच्यावेळी शौकत खान पठाण कोठ्यावर आल्यानंतर करीम लालांनी त्याला चोप दिला. गंगुबाई आपली मानलेली बहीण असल्याचं करीम लालांनी जाहिर केलं आणि या परिसरातला गंगुबाईंचा दरारा वाढला.
नेहरूंची भेट
1960च्या दशकामध्ये कामाठीपुरा परिसरामध्ये सेंट अँथनीज गर्ल्स हायस्कूल ही शाळा उभी राहिली. तरुण मुलांच्या मनावर या वेश्यांमुळे विपरीत परिणाम होईल, असं सांगत या रेड-लाईट एरियचा काही भाग रिकामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येऊ लागली.
 
यामुळे शतकभर जुन्या कामाठीपुऱ्यातल्या अनेक महिलांच्या पोटापाण्यावर गदा येणार होती. आपल्या सगळ्या ओळखी पणाला लावत गंगुबाईंनी हा मुद्दा लावून धरला.
 
आपल्या राजकीय ओळखींच्या मदतीने त्यांनी थेट तेव्हाचे पंतप्रधान असणाऱ्या जवाहरलाल नेहरूंच्या भेटीची वेळ मिळवली. या भेटीची अधिकृत नोंद कुठेही नसली तरी एस. हुसैन झैदींच्या पुस्तकात याविषयीचा किस्सा आहे.
 
'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकात झैदी लिहीतात,
 
"या बैठकीमध्ये गंगुबाईंनी नेहरूंना आपल्या हजरजबाबीपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने चकित केलं. त्यांना स्वतःसाठी चांगली नोकरी वा नवरा मिळवणं शक्य असताना त्या या व्यवसायात का आल्या, असं नेहरूंनी त्यांना बैठकीदरम्यान विचारलं.
 
निडर स्वभावाच्या गंगुबाईंनी तिथल्या तिथे नेहरूंनाच लग्नाचा प्रस्ताव दिल्याचं सांगितलं जातं. श्रीमती नेहरू करून घेण्याची त्यांची तयारी असल्यास धंदा कायमचा सोडून द्यायची आपली तयारी असल्याचं त्यांनी नेहरूंना सांगितलं.
 
यामुळे काहीसा धक्का बसलेल्या नेहरूंनी गंगुबाईंना अशा वक्तव्यासाठी समज दिली. यावर गंगुबाई शांतपणे उत्तरल्या, 'चिडू नका प्रधानमंत्रीजी. मला फक्त माझा मुद्दा दाखवून द्यायचा होता. सल्ला देणं नेहमीच सोपं असतं. पण तसं करणं कठीण असतं.' यावर नेहरू शांत राहिले.
 
बैठकीच्या शेवटी नेहरूंनी गंगुबाईंच्या मागण्यांचा विचार करण्याचं वचन दिलं. खुद्द पंतप्रधानांनीच हस्तक्षेप केल्याने कामाठीपुऱ्यातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत बारगळला. "
 
संजय लीला भन्साळी आता गंगुबाई काठेवालींच्या आयुष्यावर 'गंगुबाई काठियावाडी' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. यामध्ये आलिया भट्ट गंगुबाईंची भूमिका साकारेल.
 
या सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला. याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना एस. हुसैन झैदींनी सांगितलं,
 
"भन्साळींना ही कथा खूपच आवडली. या महिलेची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर यायला हवी, असं त्यांना वाटलं. एखादी व्यक्तिरेखा खरी वाटावी इतकी हुबेहूब पडद्यावर उभी करण्याची हातोटी भन्साळींकडे आहे.
 
लोकांनी गंगुबाईंबद्दल माझ्या पुस्तकात वाचलं असेल. पण आता हीच व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर लोकांना या महिलेची एक वेगळी बाजूही पहायला मिळेल. आलियाचं अभिनय कौशल्य आपण सगळेच जाणतो. ती ज्याप्रकारे एखादी भूमिका निभावते, ती पात्र जिवंत करते, मला वाटतं भन्साळी आणि आलिया हे दोघंही या कथेला न्याय देतील."
 
आलिया भट्टची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा 11 सप्टेंबर 2020 ला रीलिज होईल.