-ऋजुता लुकतुके
21 जानेवारीला दलाल स्ट्रिटवर फुगे आकाशात सोडले जात होते. केक कापले जात होते. आणि मिठाई वाटली जात होती. कारण, बाँबे स्टॉक एक्सचेंजच्या संवेदनशील निर्देशांकाने काल चक्क 50 हजारांचा आकडा पार केला. हा नवा उच्चांक तर आहेच. शिवाय कोव्हिडमुळे जगभरात असलेल्या मंदीच्या पार्श्वभूमीवर हे यश आणखीच उठून दिसत होतं. त्यामुळे सेलिब्रेशनही जोरदार होतं.
2020 मध्ये कोव्हिडच्या विळख्यात जग सापडलं तेव्हा याच शेअर बाजारात निर्देशांकाचा स्तर एप्रिल महिन्यात अगदी 25.600 पर्यंत खाली गेला होता. आणि पुढच्या दहाच महिन्यात पुन्हा सेन्सेक्सने 100 टक्क्यांची उसळी मारली आहे.
पण, यावेळच्या शेअर बाजार उसळीला कोव्हिडमुळे अर्थव्यवस्थेला लागलेल्या ग्रहणाची किनार आहे. मागच्या दोन तिमाहींमध्ये देशाची अर्थव्यवस्था निगेटिव्ह ग्रोथमध्ये जाऊनही नवीन वर्षी शेअर बाजार चढतोय.
अर्थव्यवस्था खाली पण, शेअर बाजार वर हे कसं काय? शेअर बाजारातली ही वाढ टिकणारी आहे का? गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायचं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तज्ज्ञांकडून मिळवण्याचा प्रयत्न करूया...
भारतीय शेअर बाजारातील तेजीची कारणं
कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, रोजगार गेला असं म्हणावं तर भारतीय शेअर बाजारांनी 2020 या वर्षामध्ये लोकांना सरासरी 15 टक्के परतावा दिला असं अधिकृत आकडा सांगतो.
अशावेळी शेअर बाजार वर जाण्याची कारणं नेमकी कुठली होती?
मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या उद्रेकामुळे मंदीत गेलेल्या शेअर बाजाराला जूनपासून उभारी मिळाली जेव्हा कोरोना लशीच्या मानवी चाचण्यांच्या बातम्या सुरू झाल्या. कोरोनाची लस ही शेअर बाजाराला बूस्टर डोस देणारी ठरली.
ऑक्टोबर 2020 पासून देशात परकीय गुंतवणूकदार संस्थांनी सातत्याने गुंतवणूक सुरू केली. नोव्हेंबरमध्ये तर परदेशातून 65,200 कोटी रुपये भारतीय बाजारात आले. अगदी जानेवारी 2021 मध्येही ही गुंतवणूक सुरू आहे.
मार्च 2020 मध्ये शेअर बाजार पडलेला होता. अशावेळी अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर कमी भावात उपलब्ध होते. ही संधी साधून देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही शेअर बाजाराकडे आपला मोर्चा वळवला. 2020 मध्ये देशात डिमॅट आणि ट्रेडिंग अकाऊंटची संख्या 100 टक्क्यांनी वाढली. फक्त सप्टेंबरमध्ये 1.2 दशलक्ष लोकांनी अकाऊंट सुरू केली. एकूण नवीन अकाऊंट होती 47.6 दशलक्ष.
पण, सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं, जगभरात लोकांकडे आलेली रोखता किंवा लिक्विडिटी. कोरोना उद्रेकाचा सामना करण्यासाठी जगभरातल्या सरकारांनी कर्जांवरचे व्याजदर कमी केले. याला 'अल्ट्रा लो रेट्स' असं म्हणतात. या परिस्थितीत लोकांच्या हातात पैसा राहतो. तो अतिरिक्त पैसा लोकांनी शेअर बाजारात आणि म्युच्युअल फंडात गुंतवलाय, असं स्पष्ट दिसतंय.
शेअर बाजार विश्लेषक निखिलेश सोमण यांनीही बाजारातल्या रोखतेकडेच बोट दाखवलं आहे. त्यांच्यामते आताच्या तेजीची दोन कारणं आहेत.
''वर्स्ट इज बिहाईंड,' असा शेअर बाजारातला सध्याचा मूड दिसतो आहे. वाईट काळ सरून गेला आहे. शिवाय शेअर बाजार नेहमी पुढची दिशा बघत असतो. लॉकडाऊन नंतर हळूहळू अर्थव्यवस्था उघडली. आणि उद्योगधंदे सुरू झाले. देशातली करवसुलीही मधल्या काळात वाढली आहे. त्यामुळे सगळं पूर्वपदाला येतं आहे, याचं हे सूचक उदाहरण आहे.'' निखिलेश सोमण यांनी पहिलं कारण सांगितलं.
दुसरं महत्त्वाचं कारण लोकांकडे खेळता पैसा हे आहे. ''आताची जगभरातील रॅली ही रोखतेमुळेच आहे. कोव्हिड काळात सगळ्या सरकारांनी मदतीसाठी पॅकेज जाहीर केली. एकट्या अमेरिकेचं पॅकेज तीन ट्रिलियन डॉलरचं होतं. जगभरातले व्याजदर कमी झाले. त्यातून भारतात परकीय गुंतवणूकदारांचा पैसा येऊ लागला. आताची शेअर बाजाराची उसळी हा त्याचा परिपाक आहे. देशी म्युच्युअल फंड संस्था विक्री करत आहेत. पण, ती खरेदी करणारे परकीय गुंतवणूकदार आहेत असं चित्र आहे,'' सोमण यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.
पण, शेअर बाजारात असं तेजीचं वातावरण असताना जगभरातल्या अर्थव्यवस्था अजून खालावलेल्या का?
शेअर बाजार तेजीत, अर्थव्यवस्था मंदीत असं का?
फक्त भारतच नाही तर जगभरातले बाजार मागच्या दहा महिन्यात तेजीत आहेत. अमेरिकेतला सत्ता बदलही शेअर बाजाराला मानवलेला दिसतोय. त्याचवेळी जगभरात अर्थव्यवस्था मात्र मंदावलेली आहे. एप्रिल ते जून 2020 या तिमाहीत भारताचा विकासदर उणे 23.9 (-23.9%) तर जुलै ते सप्टेंबर 2020 मध्ये तो उणे 7.5 (-7.5%) होता. सलग दोन तिमाहीतल्या या घसरणीमुळे भारत अधिकृतपणे मंदीत ढकलला गेला. संपूर्ण 2020 वर्षांत भारताची अर्थव्यवस्था 9 ते 10 टक्क्यांनी कमी झाली असा सर्वसाधारण अंदाज आहे.
शेअर बाजाराच्या निर्देशांकाला संवेदनशील म्हटलं जातं. कारण, तो देशाच्या अर्थव्यवस्थेचा आरसा मानला जातो. मग यावेळी शेअर बाजार आणि अर्थव्यवस्था यात दरी निर्माण झाली आहे का?
अर्थतज्ज्ञ शिवानी दाणी यांच्यामते अर्थव्यवस्थेत आलेली मंदी ही कोरोनाच्या जागतिक संकटातून आलेली होती. आणि सगळ्याच देशांना ती सहन करावी लागली. आता भारतीय बाजारांमध्ये आलेल्या गुंतवणुकीकडे त्या सकारात्मक नजरेनं बघतात.
''आंतरराष्ट्रीय बाजारात रोखता म्हणजे पैसा आहे हे खरंच. पण, म्हणून सगळ्याच देशांमध्ये अशी गुंतवणूक होतेय का? ब्राझीलची अर्थव्यवस्थाही डबघाईला आली आहे. पण, तिथे ना शेअर बाजारात, ना स्थानिक उद्योगांमध्ये परकीय गुंतवणूक झाली. उलट भारतातील शेअर बाजार किंवा उद्योग क्षेत्रं इमर्जिंग म्हणजे विकसनशील असलं तरी भारताबद्दल परदेशात विश्वास वाटतो आहे, हे चांगलं चित्र आहे. ''
आपला मुद्दा आणखी स्पष्ट करताना दाणी म्हणतात, 'टेस्ला सारखी कंपनी भारतात पाय रोवायचा प्रयत्न करत आहे. परदेशी कंपन्या विचारपूर्वक आपली गुंतवणूक करतात. ती कमी मुदतीसाठी किंवा लगेच काढून घेण्यासाठी नसते. अशावेळी जर टेस्ला, अॅमेझॉन, किया सारख्या परकीय कंपन्या भारतात येत असतील तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे चांगलं चिन्ह आहे. येणारा काळ आश्वासक आहे.''
आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा चीनवरचा कमी झालेला विश्वास हे त्यासाठी एक मोठं कारण दाणी यांना वाटतं.
सामान्य गुंतवणूकदारांनी काय करायचं?
बाजारात तेजी असताना सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं हा स्वाभाविक प्रश्न असतो. कुठलीही वाढ सातत्यपूर्ण असेल तर शाश्वत किंवा टिकाऊ असेल असा विश्वास बसतो. सध्या शेअर बाजारात आलेली उसळी ही मागच्या दहा महिन्यातही आहे. त्यामुळे पुढे काय होणार, ही वाढ अशीच राहील की, निर्देशांकात आलेला फुगवटा क्षणात कमी होईल अशीही एक भीती तुम्हाला वाटणं रास्त आहे. मग अशावेळी तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी काय करावं?
अजून नवीन गुंतवणूक शक्य आहे, की शेअर बाजारातून पैसे काढून घेण्याची ही वेळ आहे?
यावर तज्ज्ञांमध्ये दुमत असू शकतं. पण, निखिलेश सोमण, शिवानी दाणी आणि गुंतवणूक तज्ज्ञ बिजल गांधी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना एक गोष्ट निक्षून सांगितली आहे. ती म्हणजे अल्पकाळातल्या नफ्यासाठी शेअर बाजारात आलात तर जोखीम ठरलेली आहे. तुमचा परतावा कमी-जास्त होऊ शकतो. पण, 10-12 वर्षांचं उद्दिष्ट ठेवून बाजारात आलात तर तुम्हाला नियमित परतावा मिळू शकतो.
निखिलेश सोमण यांच्या मते शेअर बाजारासाठी पुढची दिशा एक फेब्रुवारीला येणारा अर्थसंकल्प दाखवेल. तोपर्यंत, निर्देशांकाची वाटचाल आस्तेकदम सुरूच असेल. 2024 च्या निवडणुकांपर्यंत सेन्सेक्स 55,000 ते 60,000 ची पातळीही गाठू शकेल असा विश्वास त्यांना वाटतो.
तर शिवानी दाणी यांच्या मते शेअर बाजारातील चढ-उतारांना न घाबरता चांगल्या शेअरमध्ये एसआयपीच्या माध्यमातून केलेली नियमित गुंतवणूकही चांगला परतावा देऊ शकते. त्यामुळे अभ्यास करून चांगले शेअर निवडलेत तर नवीन गुंतवणूक करायलाही त्यांच्या मते हरकत नाही.
बिजल गांधी यांच्या मते शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक इतक्यात थांबणार नाही. पण, नजीकच्या काळात तात्पुरता एखादा स्लो डाऊन येऊ शकतो. अर्थसंकल्पाच्या महिन्यातही शेअर बाजारात चढ-उतार होऊ शकतात. पण, दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार असाल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही.