रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जून 2021 (16:09 IST)

व्हेल माशाच्या उलटीची (एम्बेग्रेसची) किंमत कोट्यवधींमध्ये का असते?

जयदीप वसंत
एखाद्या प्राण्याची उलटी सोन्याहून जास्त किंमतीची असू शकेल, एक कोटी रुपये प्रति किलो दराने ती विकली जाईल, असं कुणी सांगितल्यास तुम्ही विश्वास ठेवाल का?
 
पण होय, हे खरं आहे. पण त्यासाठी ही उलटी स्पर्म व्हेलची असावी लागेल.
 
अहमदाबाद पोलिसांनी नुकतेच स्पर्म व्हेलच्या उलटी (एम्बेग्रेस) बाळगणाऱ्या तीन जणांना अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सुमारे सात कोटी रुपये इतकी आहे.
 
या तीन आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. याच्या तपासातून गुजरातमधील समुद्री प्राण्यांची आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीबाबत बरीच माहिती मिळेल, अशी पोलिसांना अपेक्षा आहे.
 
गुजरातमध्ये हे प्रकरण समोर येण्यापूर्वी मुंबई आणि चेन्नईमध्ये एम्बेग्रेस मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आलं होतं. तिथूनच गुजरातमधील तस्करीचीही माहिती पोलिसांच्या हाती लागली होती.
चीनमध्ये एम्बेग्रेसचा वापर लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांमध्ये केला जातो. तर आखाती देशांमध्ये याचा उपयोग सर्वोत्कृष्ट दर्जाचं अत्तर (परफ्यूम) बनवण्यासाठी केला जातो.
 
स्पर्म व्हेल आणि एम्बेग्रेस
स्पर्म व्हेल एखाद्या कॅटलफिश, ऑक्टोपस किंवा इतर समुद्री प्राण्याचं भक्षण करतो, त्यावेळी त्याच्या चयापचय यंत्रणेतून एक विशिष्ट प्रकारचं द्रव व्हेलच्या पोटात तयार होऊ लागतं.
व्हेलने गिळलेल्या प्राण्याचं टोकदार शरीर किंवा त्याच्या दातांमुळे शरीराच्या आतील भागात जखम किंवा इतर नुकसान होऊ नये यासाठी व्हेलच्या शरीरात हे द्रव तयार होतं.
 
यानंतर बाकी राहिलेले अवशेष व्हेल आपल्या उलटीच्या माध्यमातून बाहेर सोडून देतो. काही संशोधकांच्या मते, स्पर्म व्हेलच्या विष्ठेतूनही एम्बेग्रेस बाहेर पडतं. त्यामुळेच या विष्ठेत व्हेलच्या भक्ष्याचे टोकदार दातही आढळून येतात.
 
व्हेलच्या शरीरातून बाहेर पडल्यानंतर ही उलटी समुद्राच्या पाण्यात तरंगत राहते. सूर्यकिरण आणि समुद्रातील क्षार यांच्यामुळे रासायनिक प्रक्रिया होऊन या उलटीचं एम्बेग्रेसमध्ये रुपांतर होतं.
एम्बेग्रेस काळा, पांढरा किंवा फिकट रंगाचा तेलकट पदार्थ असतो. याचा आकार साधारणपणे गोलाकार किंवा अंडाकार असू शकतो.
 
हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. त्याचा वापर करण्यासाठी अल्कोहोल किंवा ईथरची गरज असते.
 
हे व्हेलचं वीर्य किंवा स्पर्म आहे, असंही म्हटलं जातं. त्यामुळेच अशा प्रकारची उलटी करणाऱ्या व्हेलला स्पर्म व्हेल संबोधलं जातं.
 
हे द्रव ध्वनीलहरींनुसार कार्य करतं. त्याच्या मदतीने व्हेल समुद्रात खाली-वर जाण्यासाठी आपल्या शरीरावर नियंत्रण मिळवतो.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सुरुवातीला एम्बेग्रेसचा गंध चांगला नसतो. पण हवेशी संपर्कात येताच याचा सुवास वाढू लागतो. त्याला एक प्रकारचा गोड सुवास मिळतो. एम्बेग्रेस परफ्यूमचा सुगंध हवेत उडण्यापासून रोखण्याचं काम करतो.
 
एम्बेग्रेस हा एक अत्यंत दुर्मिळ पदार्थ आहे. त्यामुळेच याची किंमतही खूप जास्त आहे. याला समुद्रातील सोनं किंवा तरंगणारं सोनं असंही संबोधलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत दीड कोटी प्रति किलोपर्यंत असू शकते.
 
जामनगर मरीन नॅशनल पार्कचे मुख्य संगोपन अधिकारी डी. टी. वासवदा सांगतात, "वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार स्पर्म व्हेल हा एक संरक्षित जीव आहे. याची शिकार किंवा विक्री करणं गुन्हा आहे. त्याच्या कायदेशीर व्यापारासाठी परवाना गरजेचा असतो. नुकतंच पकडण्यात आलेलं एम्बेग्रेस कुठून आलं, याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र अरेबियन देशांमध्ये त्याची खूप मागणी असते. तिथले नागरीक याची महागडी किंमत देण्यासाठी तयार असतात.
 
हाडं, तेल आणि एम्बेग्रेस यांच्यासाठी स्पर्म व्हेलची मोठ्या प्रमाणात शिकार होते. त्यामुळेच 1970 पासून युरोप, अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांमध्ये व्हेलच्या शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे.
गुजरातला 1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. एखाद्या राज्याला लाभलेला हा सर्वांत लांबलचक समुद्रकिनारा आहे.
 
त्यामुळेच गुजरातेत समुद्री प्राणी आणि त्यांच्या अवयवांचा अवैध व्यवसाय करणारे तस्कर सक्रिय असल्याचं दिसून येतं.
 
गुजरातसह, ओडिशा आणि केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरही एम्बेग्रेस सापडतं.
 
भारताच्या वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार 1986 पासूनच स्पर्म व्हेल संरक्षित जीव आहे. त्यामुळे स्पर्म व्हेल आणि त्याच्या अवयवांचा व्यापार बेकायदेशीर आहे.
 
लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या औषधांमध्ये वापर
भारतासह जगभरातील कित्येक देशांमध्ये एम्बेग्रेसचा वापर परफ्यूम आणि औषधांमध्ये केला जातो.
 
जगभरातील कित्येक देशांचा प्रवास करणाऱ्या इब्न बतुता आणि मार्को पोलो यांनीही आपल्या प्रवासवर्णनांमध्ये एम्बेग्रेसचा उल्लेख केल्याचं आढळून येतं.
आयुर्वेदासह यूनानी औषधांमध्येही एम्बेग्रेसचा वापर करण्यात येतो.
 
लखनऊ येथील इंटिग्रल युनिव्हर्सिटीमध्ये औषध विज्ञान विभागातील सहायक प्राध्यापक बदरुद्दीन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "यूनानी औषधांमध्ये एम्बेग्रेसचा वापर कित्येक वर्षांपासून केला जातो. अनेक औषधी वनस्पतींचा वापर एम्बेग्रेससोबत करून त्याचा वापर मानसिक, शारीरिक व्याधी दूर करण्यासाठी, लैंगिक आजारांवरील उपचारांसाठी केला जातो.
 
ते सांगतात, "एम्बेग्रेस साखरेच्या पाकात घोळून इतर वनस्पतींसोबत मिसळून एक औषध बनवण्यात येतं. त्याला 'माजून मुमसिक मुक्कावी' नावाने ओळखलं जातं. लैंगिक क्षमता घटल्यास या औषधाचं चाटण रुग्णाला दिलं जातं. त्यामुळे रुग्णाची लैंगिक क्षमता वाढण्यास मदत होते.
त्याशिवाय, हब्बे निशात औषधातही एम्बेग्रेसचा वापर होतो. हे औषध मान्यता प्राप्त फार्मसींसह ऑनलाईनही उपलब्ध आहे.
 
डी. टी. वासवदा सांगतात, एम्बेग्रेस लैंगिक क्षमता वाढवतो, असं सांगितलं जात असलं हे अद्याप शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं नाही.
 
डॉ. बदरुद्दीन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मज्जासंस्थेवर एम्बेग्रेसचा होणारा परिणाम या विषयावर एक संशोधन केलं आहे. त्याचा अहवाल लवकरच प्रकाशित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
अहमदाबादमधील एम्बेग्रेस कुठून आलं?
अहमदाबादच्या झोन-7 चे पोलीस उपायुक्त प्रेमसुख देलू यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही लोक एम्बेग्रेस घेऊन अहमदाबादमध्ये येणार असल्याची गुप्तवार्ता पोलिसांना मिळाली होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ पावलं उचलली. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात आरोपी अलगद अडकले.
याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विभागाने केलेल्या परीक्षणात हा पदार्थ एम्बेग्रेस असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे वन्यजीव संरक्षण कायदा 1972 नुसार सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. याशिवाय तिन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे चौथ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आल्याचं देलू यांनी सांगितलं.
 
या सर्वांचे इतर अनेक सहकारी गुजरातेत सक्रिय आहेत. शुक्रवारी (4 जून) हे प्रकरण वनविभागाकडे हस्तांतरीत करण्यात आलं. आता वनविभाग आणि पोलीस मिळून हे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम करणार आहेत.
 
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचं वजन साडेपाच किलोंच्या जवळपास होतं. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत सात कोटींच्या आसपास असू शकते.
हा पदार्थ एम्बेग्रेसच होता, याचा अहवाल फॉरेन्सिक विभाग देणार आहे. हा अहवाल या प्रकरणातील पुरावा म्हणून वापरण्यात येणार आहे.
 
या प्रकरणात दहापेक्षा जास्त जण सहभागी असल्याचा संशय पोलिसांना आहे.
 
सौराष्ट्रात समुद्री जीवांच्या संरक्षणाशी संबंधित तज्ज्ञांच्या मते व्हेलने उलटी केल्यानंतर त्याच्या शरीरातून बाहेर पडलेला एम्बेग्रेस समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यास अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो.
 
त्यांच्या मते, एम्बेग्रेस शेकडो-हजारो किलोमीटरचा प्रवास करून किनाऱ्याकडे येतो. समुद्रातील वादळी वारे त्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचवतात.
 
एम्बेग्रेस जितकं जुनं तितकं त्याची किंमत जास्त असते.
 
कुत्रे एम्बेग्रेसचा वास ओळखतात आणि त्याकडे आकर्षित होतात. गुजरातच्या किनारी भागात राहणारे व्यक्ती यासाठी विशेष प्रशिक्षित कुत्रे सांभाळतात.
 
किनारी भागात एम्बेग्रेस सापडल्यानंतर ते अहमदाबाद किंवा मुंबईकडे पाठवण्यात येतं. त्यानंतर दलालांच्या माध्यमातून ते आखाती देशांमध्ये पाठवण्यात येतं. तिथून ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जातं.
 
कधी-कधी मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांनाही एम्बेग्रेस मिळतं.
 
लोकांना एम्बेग्रेस नेमकं कसं असतं, हे माहीत नसल्याने कधी-कधी त्याच्या नावे फसवणूकही केली जाते. एम्बेग्रेसच्या नावाखाली काहीजण पॅराफिन वॅक्स किंवा तेलकट पदार्थ विकतात.
 
हा व्यापार बेकायदेशीर असल्यामुळे त्याची तक्रारही कुठे दाखल होत नाही.