मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: सोमवार, 9 सप्टेंबर 2019 (11:07 IST)

जिओ फायबरमुळे भारतातलं ब्रॉडबॅंड अतिशय स्वस्त होणार का?

जिओने भारतामध्ये हायस्पीड ब्रॉडबॅंड सेवा लाँच केली आहे. यामुळे भारतामध्ये झपाट्याने उदयाला येणाऱ्या इंटरनेट आणि स्ट्रीमिंग उद्योगामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.
 
'जिओ फायबर'च्या वार्षिक योजनेमध्ये मोफत टीव्ही, सेट-टॉप बॉक्स आणि प्रिमियम स्ट्रिमिंग सेवा देण्यात येत आहेत.
 
100 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडसाठी रिलायन्स दरमहा 700 रुपये ते 10000 रुपये आकारेल.
 
या योजनेमुळे संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा स्वस्त इंटरनेट आणि मोफत देण्यात येणाऱ्या सेवांविषयीचं प्राईस वॉर सुरू होण्याची शक्यता आहे.
 
रिलायन्सने 2016 मध्ये जेव्हा जिओ मोबाईल सेवेमार्फत मोफत कॉल आणि डेटा द्यायला सुरुवात केली होती. यानंतर मोबाईल नेटवर्कवरील इंटरनेटच्या किंमती कमी व्हायला सुरुवात झाली आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठीचं किंमत युद्ध सुरू झालं.
 
सिनेमा थिएटर्सशी स्पर्धा
जिओ फायबरचे दर जगभरातल्या दरांपेक्षा दहा पटीने कमी असतील असं रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी 12 ऑगस्टला कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये शेअरधारकांसमोर जाहीर केलं होतं.
 
ही सेवा घेणाऱ्यांनी लँडलाईनवरून मोफत आऊटगोईंग कॉलपासून मोफत एलईडी टीव्हीपर्यंतच्या योजनांचा फायदा मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
प्रिमियम ग्राहकांना घरबसल्या 'रिलीजच्याच दिवशी सिनेमा घरच्या टीव्हीवर पाहता येईल'असंही त्यांनी म्हटलं होतं. जिओने या सेवेला 'फर्स्ट डे फर्स्ट शो' असं नाव दिलंय.
 
म्हणजे रिलायन्स एकाच सेवेद्वारे प्रतिस्पर्धी टेलिकॉम कंपन्या, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि अगदी सिनेमा थिएटर्ससोबतही स्पर्धा करणार आहे.
 
इंटरनेटच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी भारत एक आहे. याचा मोठा परिणाम व्हिडिओ ऑन डिमांडच्या बाजारपेठेवर होण्याचीही शक्यता आहे.
 
कन्सलट्न्सी फर्म प्राइस वॉटरहाऊसच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारतीय मीडिया इंडस्ट्रीच्या विकासातला सुमारे 46% हिस्सा टीव्ही, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स आणि फिल्म उद्योगाचा आहे.
 
रिलायन्स जिओ या वर्षाच्या सुरुवातीला देशातली सर्वात मोठी टेलिकॉम ऑपरेटर कंपनी झाली. 30 जूनला संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये रिलायन्स जिओला 891 कोटींचा नफा झाला.
 
टेक्नॉलॉजी लेखक प्रशांतो रॉय यांचं मत
रिलायन्सच्या कोणत्याही सेवेबाबत जे घडतं, त्याचप्रमाणेच लाँच होण्याआधी जिओ फायबरही 5 सप्टेंबरला बातम्यांमध्ये झळकलं.
 
मुकेश अंबानींनी ऑगस्टमध्ये केलेल्या घोषणांनी टेलिकॉम सेक्टरमध्ये खळबळ उडवली. अनेक प्रतिस्पर्धी कंपन्यांनी स्पर्धेत उतरण्यासाठी घाईघाईने ऑफर्स आणल्या.
 
जिओचा सगळ्यांत मोठा प्रतिस्पर्धी असणाऱ्या एअरटेलने जिओ फायबर लाँच होण्याआधी Xstream नावाची एक डिजिटल एन्टरटेंमेंट सेवा सुरू केली.
 
अपेक्षेप्रमाणेच अंबानींनी आकर्षक योजना आणि सेवांची घोषणा केलेली आहे. यासाठी ग्राहकांना दीर्घ कालावधीची फ्री ट्रायल ऑफर देण्यात येईल, हेही अपेक्षितच होतं.
 
या ट्रायल कालावधी दरम्यान 'जिओ फायबर प्रिव्ह्यू ऑफर'खाली विविध जिओ ऍप्ससोबतच 100 mbpsचं जिओ कनेक्शन मोफत मिळणार आहे.
 
100GB डेटा यामध्ये मिळेल. युजरचा हा डेटा संपल्यास त्यांना 40GB चा ऑनलाईन टॉप-अप देण्यात येईल. 24 वेळा असा टॉप अप देण्यात येईल. म्हणजे एकंदरीत 1000 जीबीपेक्षा जास्त डेटा मोफत मिळेल.
 
ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांकडून राऊटरसाठी 2500 रुपये घेण्यात येतील पण ते रिफंडेबल असतील.
 
प्रिमियम प्लान तर अधिक आकर्षक आहे. ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांना HD किंवा LED टीव्ही आणि 4K(अल्ट्रा हाय डेफिनेशन) सेट-टॉप बॉक्स मिळेल. याच्या मदतीने ग्रुप व्हिडिओ कॉलही करता येईल.
 
आतापर्यंत तब्बल 1.5 कोटी ग्राहकांनी जिओच्या या सेवांसाठी नोंदणी केली आहे.
 
देशभरातील 1600 शहरांमधील दोन कोटी कुटुंबं आणि दीड कोटी उद्योगांपर्यंत जिओ फायबर पोहोचवण्याचं रिलायन्सचं उद्दिष्टं आहे.
 
सप्टेंबर 2016मध्ये जिओने मोबाईल सेवा सुरू केली होती. मोफत सेवांनीच याची सुरुवात करण्यात आली होती आणि तेव्हा फक्त सहा महिन्यांमध्ये 10 कोटी ग्राहक जोडण्यात आले होते.
 
इतर टेलिकॉम ऑपरेटर कंपन्यांच्या तुलनेमध्ये रिलायन्सचे 34 कोटी ग्राहक एकूण 30 टक्के अधिक खर्च करतात.
 
यामुळे भारतामधल्या मोबाईल डेटाच्या किंमती झपाट्याने घसरल्या. जिओ टेलिकॉमची सुरुवात झाली तेव्हा भारतामध्ये 10 ऑपरेटर्स होते. आज फक्त 4 टेलिकॉम ऑपरेटर्स उरले आहेत.
 
म्हणूनच पुन्हा एकदा असंच घडण्याची शक्यता एअरटेल आणि बीएसएनएलसारख्या ब्रॉडबॅंड कंपन्यांना वाटतेय.