1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 8 जून 2021 (14:51 IST)

World Oceans Day : कोकणच्या समुद्रातलं 'आंग्रिया बँक' प्रवाळ बेट तुम्हाला माहिती आहे का?

जान्हवी मुळे
निळाशार समुद्र, प्रवाळांची नक्षी आणि निवांत पोहणारे रंगीबेरंगी मासे.. समुद्राखालच्या अशा जागांचा विचार केला तर नजरेसमोर ग्रेट बॅरियर रीफ किंवा आपल्या भारतातल्या अंदमान-लक्षद्वीपसारख्या जागा येतात.
 
पण आपल्या कोकणातही समुद्रकिनाऱ्याला काहीशी समांतर अशी एक जागा आहे. तिचं नाव आहे आंग्रिया बँक.
 
मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या नावावरून ओळखली जाणारी ही जागा म्हणजे समुद्रात दडलेला खजिनाच आहे.
 
वेगवेगळ्या प्रकारचे मासे आणि प्रवाळानं वेढलेली ही जागा म्हणजे पाण्याखालची एक जादुई दुनियाच आहे म्हणा ना...
आंग्रिया बँक नेमकी कशी आहे, कोकणातला समुद्र तिच्यामुळे कसा संपन्न बनला आहे आणि या जागेच्या संवर्धनासाठी काय प्रयत्न सुरू आहेत याचाच हा आढावा.
 
'आंग्रिया बँक'ची निर्मिती कशी झाली?
आंग्रिया बँक हे एक प्रकारचं प्रवाळ बेट (coral reef) असून, ते मालवणच्या किनाऱ्यापासून सुमारे 110 किलोमीटरवर, तर रत्नागिरीच्या किनाऱ्यापासून 105 किलोमीटरवर पाण्यात आहे.
 
हा एक खुल्या समुद्रातला पाण्याखालचा उंचवट्यासारखा पठारी भूभाग आहे. त्याचा आकार सुमारे 2011 चौरस किलोमीटर आहे.
आंग्रिया बँकवरचा भाग आसपासच्या समुद्रापेक्षा तुलनेनं उथळ आहे आणि तिथे समुद्राची खोली कमीत कमी 24 मीटर ते सरासरी 28 मीटर एवढी आहे. आंग्रिया बँकच्या दोन्ही बाजूंना समुद्राची खोली वाढत जाते आणि काही ठिकाणी ती अगदी चारशे मीटरपर्यंत खोल आहे.
 
हा प्रदेश काँटिनेंटल शेल्फ म्हणजे सागरमग्न खंडभूमीचाच भाग आहे. म्हणजेच एकेकाळी हिमयुगादरम्यान हा भाग पाण्याच्या वर होता. मग सुमारे 11,650 वर्षांपूर्वी शेवटचं हिमयुग संपलं, तेव्हा समुद्राची पातळी वाढल्यानं हा भाग पाण्याखाली गेला.
 
त्यानंतर हजारो वर्षांत इथे हळूहळू प्रवाळ आणि त्याच्या साथीनं सागरी जीवन बहरत गेलं आणि हे प्रवाळ बेट आकाराला आलं.
सध्या इथे सुमारे साडेसहाशे चौरस किलोमीटरवर प्रवाळांचा अधिवास आहे. म्हणजे आकारानं मुंबईपेक्षा थोडीशी मोठी जागा.
 
आंग्रिया बँक का आहे महत्त्वाची?
आंग्रिया बँक ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि जैवविविधतेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची आहे, असं सागरी जीववैज्ञानिक वर्धन पाटणकर सांगतात. पाटणकर यांनी आंग्रिया बॅंकच्या प्रवाळांवर संशोधन केलं आहे.
 
"मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अठराव्या शतकात या परिसराचा वापर केला होता. इथल्या उथळ पाण्यात त्या काळातली लढाऊ जहाजं आणि गलबतं आरामात नांगर टाकून उभी राहू शकायची. त्याचा वापर करून आंग्रे यांनी फ्रेन्च, पोर्तुगीज आणि ब्रिटिश अशा आक्रमकांपासून मराठा साम्राज्याचं संरक्षण केलं."
 
त्यामुळेच या भागाला कान्होजी आंग्रेंचं नाव देण्यात आलं आहे. म्हणजे अगदी त्यापूर्वीच्या काळापासून लोकांना या जागेविषयी माहिती आहे.
पण आंग्रिया बँक जैववविविधतेच्या दृष्टीनं किती संपन्न आहे, ते अलीकडच्या काळातील मोहिमांमधून आणखी स्पष्ट झालं आहे. मालवणमध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची IISDA ही स्कूबा डायव्हिंगचं प्रशिक्षण देणारी संस्था, राज्य सरकारचा कांदळवन विभाग, केरळमधली सीएमएलआरई ही अर्थविज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणारी संस्था अशा संस्थांच्या सागरी जीववैज्ञानिकांनी या परिसरात संशोधन केलं आहे.
वर्धन पाटणकर यांनी 2019 सालच्या शोधमोहिमेत वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन सोसायटी ऑफ इंडियाच्या टीमचं नेतृत्त्व केलं होतं. त्या टीमनं दहा दिवसांत 66 वेळा या भागात डायव्हिंग केलं होतं आणि सुमारे दीडशे प्रजातींची नोंद केली होती.
 
"इथली जैवविविधता अनन्यसाधारण आहे. आम्हाला इथे शार्क, मोरे ईल, कूपर फिश अशा अनेक प्रजाती आढळून आल्याच शिवाय प्रवाळांच्या वसाहतींचंही निरीक्षण करता आलं.
 
"अर्थात आतापर्यंत केवळ दहा टक्के भागांतच संशोधन करता आलं आहे आणखी बऱ्याच गोष्टींचा अभ्यास बाकी आहे."
 
माशांची जन्मभूमी
प्रवाळांचा अधिवास आणि खुल्या समुद्रातली काहीशी संरक्षित जागा असल्यानं इथे माशांचा वावर आहे. एक प्रकारे ही माशांची जन्मभूमीच बनली आहे.
 
आंग्रिया बँकच्या जैवविविधतेवरच कोकणातली मासेमारीही अवलंबून आहे, असं पाटणकर सांगतात.
"यांत्रिक मासेमारी करणारे ट्रॉलर्स इथे येऊ शकत नाहीत. त्यामुळे माशांना अधिकचं संरक्षण मिळालं आहे. मासे इथे प्रजननासाठी येतात आणि त्यामुळेच आंग्रिया बँक हे आपल्याला विपुल प्रमाणात मिळणाऱ्या मच्छीमागचं मोठं कारण आहे."
 
महाराष्ट्रात किनारी प्रदेशात हजारो लोकांचं पोट याच मासेमारीवर अवलंबून आहे आणि एका मोठ्या वर्गाला त्यातून आहारात अत्यावश्यक असलेली प्रथिनं मिळतात. त्यामुळे आंग्रिया बँकवरची जैवविविधता नष्ट झाली, तर त्याचा परिणाम या सगळ्यांवर होईल.
 
आंग्रिया बँकच्या संरक्षणातल्या अडचणी
जागतिक तापमानवाढीमुळे जगभरातल्या इतर प्रवाळ बेटांसारखंच आंग्रिया बँकवरही टांगती तलवार आहे आणि इथलं प्रवाळ वाचवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत असं पर्यावरणप्रेमींना वाटतं
 
पाटणकर सांगतात, "या प्रदेशात नौदलाचा वावर आहे. तसंच तेल आणि नैसर्गिक वायूसाठी उत्खननाचेही प्रस्ताव पुढे आले होते. या सगळ्यामुळे आंग्रिया बँकवरच्या प्रवाळांना धोका संभवतो. पण सध्याच्या स्थितीत या जागेला कायद्याचं संरक्षण नाही."
"पण आंग्रिया बँकचं सरक्षण गरजेचं आहे कारण ही महाराष्ट्रात शिल्लक राहिलेली एकमेव कोरल रीफ आहे आणि ती नष्ट होऊ देणं हे मोठं दुर्दैव ठरेल."
 
अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनानं या जागेला संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदिल दिला होता. केंद्र सरकारकडून संमती मिळाली, तर आंग्रिया बँकला अभयारण्याचा दर्जा मिळू शकतो.
 
तसं झालं तर हे एक मोठं पाऊल ठरेल. कारण आंग्रिया बँक ही भारताच्या अनन्य आर्थिक क्षेत्रात अर्थात Exclusive Economic Zone (EEZ) मध्ये येते.
 
समुद्रात बारा सागरी मैलांपर्यंतचा (22 किलोमीटर) परिसर ही त्या देशाची सागरी सीमा मानली जाते. तर किनाऱ्यापासून 200 नॉटिकल मैलांपर्यंतचा भाग हा त्या त्या देशाचं अनन्य आर्थिक क्षेत्र मानलं जातं, जिथल्या सागरी संपत्तीवर त्या त्या देशाचा अधिकार असतो आणि नैसर्गिक वायू किंवा तेलासाठी इथे उत्खनन करता येतं.
 
आंग्रिया बँक ही भारतात EEZ मध्ये असलेलं पहिलं सागरी अभयारण्य ठरू शकतं त्यानंतर या परिसरातील इतर जागांनाही कायदेशीर संरक्षण मिळवता येऊ शकतं.
आंग्रिया बँकचा पर्यटनाच्या दृष्टीनंही विकास करण्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र तसा विकास करताना इथे किती लोक जाणार यावर नियंत्रण ठेवावं लागेल, असंही पाटणकर नमूद करतात.
 
पण या जागेचं संवर्धन तुम्ही समुद्रात न जाताही करू शकता. त्यासाठी समुद्राचं प्रदूषण रोखण्यावर भर द्यायला हवा.
 
पाटणकर सांगतात, "आपल्याल अनेकदा समुद्राचा सहज विसर पडतो किंवा आपण सगळं काही समुद्रात सरळ ओतून देतो. पण तसं कऱण्यापूर्वी थांबून थोडा विचार केला, तरी फरक पडू शकतो.
 
"विशेषतः कोव्हिडच्या काळात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. पण त्या कचऱ्याची नीट विल्हेवाट लावली जाणंही महत्त्वाचं आहे. त्यामुळे मास्क वगैरे सरळ फेकून देताना त्याचा समुद्रातील जीवांवर काय परिणाम होईल याचा थोडा विचार करायला हवा."