स्वित्झरर्लंड: स्वर्गीय अनुभूती
स्वित्झरर्लंड युरोपमधील सर्वांत सुंदर देश... येथील घड्याळे आणि चॉकलेट विश्वविख्यात आहेत. येथील हवा खूपच थंड असते. बर्फाच्छादित डोंगर, चारही बाजूंनी व्यापलेली हिरवळ, रंगीबेरंगी फुलांच्या बागा, मधुर आवाजात गाणारे पक्षी, स्वच्छ-सुंदर रस्ते आणि निसर्गसौंदर्याने बहरून गेलेली पर्यटनस्थळे, यामुळे 'स्वित्झरलंड'पर्यटनाचे प्रमुख केंद्र बनले आहे. येथील 'राईन फॉल'हे पाहण्याजोगे पर्यटनस्थळ आहे. रेल्वेने विंटरथर जाऊन तेथून दुसरी रेल्वे पकडून 'राईन फॉल' येथे जाता येते. या प्रवासातही निसर्गसौंदर्य पाहताना खूपच मजा येते. सुंदर, छोटी-छीटी आणि विशेष म्हणजे स्वच्छ गावे, सगळीकडे हिरवळ आणि त्यामध्ये चरणा-या गाई हे दृश्य पाहताना मन प्रसन्न होऊन जाते. घाटमाथ्यातून गाडी धावू लागली की 'राईन फॉल'आल्याची जाणीव होऊ लागते. रेल्वेतून उतरताच समोर निसर्गसौंदर्याने बहरून गेलेला नजरा दिसतो. धबधब्यांचे जोरदार आवाज, अंगावर उडणारे पाण्याचे तुषार अनुभवत घाटात खाली उतरण्यासाठी पायवाट आहे. घनदाट जंगलातून हा रस्ता गेला आहे. काही अंतर चालल्यावर समोर युरोपातील सर्वांत मोठ्या 'राईन फॉल'दृश्य दिसते आणि आपण थक्क होऊन जातो. पाण्याचे तुषार, त्यावर कोवळे उन्ह पडताच निर्माण होणारे इंद्रधनुष्य, पाहतच बसावेसे वाटते.
पुढे पाहा ज्यूरिख....
येथून रेल्वेने ज्यूरिखला जाता येते. येथील स्विस भोजनाचा स्वाद काही औरच आहे. याठिकाणी मोठे शॉपिंग मार्केट आहे. विशेष करून ज्यूसेस, फ्रूट्स आणि ब्रेडस मिळतात. एक दिवसाच्या मुक्कामानंतर लूजर्नला जाता येते. येथे जाणा-या रेल्वे कमालीच्या फास्ट असतात. स्वच्छ, आरामदायी असण्याबरोबरच बाहेरील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असल्याने कितीही मोठा प्रवास असला तरी थकवा जाणवत नाही. लूजर्नमध्ये राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. याठिकाणी प्रसिद्ध लेक लूजर्न आणि चॅपल ब्रिज पाहण्यासारखे आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी सेंट पीटर चॅपल यांच्या नावाने हा ब्रिज चौदाव्या शतकात बांधण्यात आला आहे. हा पुल पूर्णपणे लाकडाचा आहे, हे विशेष. दोन्ही बाजूस रंगीबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आली आहे. वरून पॅक असणा-या या पुलाच्या आतील भागात लूजर्न शहराचा इतिहास सांगणारी चित्रे आहेत. पुढे पाहा माउंट पीलेटस...