सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

'मोगुल'मधून अक्षयची माघार

संगीत क्षेत्रात अग्रस्थानी असलेल्या टी-सिरीज कंपनीचे सर्वेसर्वा दिवंगत गुलशन कुमार यांच्या आयुष्यावर आधारित एक बायोपिक चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. हा चित्रपट 2019मध्ये आमिर खान आणि टी-सिरीजद्वारा निर्मित प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात गुलशन कुमारांची भूमिका अक्षय कुमार साकारणार असल्याचे म्हटले जात होते. याबाबत गुलशन कुमार यांची मुलगी तुलसी कुमारने खुलासाही केला होता. पण अक्षयने या चित्रपटाला रामराम ठोकल्याचे गेल्या काही दिवसांपासून म्हटले जात होते. अक्षय आणि निर्मात्यांमध्ये चित्रपटाच्या कथेवरून वाद झाल्याने हा चित्रपट अक्षयने सोडल्याची चर्चा होती. पण या गोष्टीचा खुलासा आता अक्षयने स्वतःच केला आहे. अक्षयने एका मुलाखतीदरम्यान बोलत असताना आता या चित्रपटाचा मी भाग नसून, चित्रपट स्क्रिप्टवर एकमत न झाल्याने सोडल्याचे सांगितले. या चित्रपटातील अक्षयच्या लूकचे फोटोही काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर आले होते. अक्षयने अशात हा चित्रपट सोडून जाणे निर्मात्यांसाठी एक मोठा धक्का मानला जात आहे.