सिनेमाचा भारतीय प्रेक्षकांवर एवढा प्रभाव आहे की, आपल्या आवडत्या स्टार्सच्या अनेक गोष्टी कॉपी करण्याचा प्रयत्न करतात... मग ती त्यांची कपड्यांची स्टाईल असो की त्यांची हेअर स्टाईल. कलाकारांच्या हेअर स्टाईलवरून तसे ट्रेंडही सेट झाले होते. अभिनेत्री साधना यांच्या हेअर स्टाईलवरून प्रेरणा घेतलेल्या साधना कटपासून ते सलमान खानच्या 'तेरे नाम कटपर्यंत' अशी अनेक उदाहरणं आहेत. अभिनेत्री असो की अभिनेते त्यांच्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल पाहिल्यानंतर आपणही आपल्या केसांची स्टाईल अशापद्धतीने करून पाहावी, असं अनेकांना वाटतं. मात्र, या कलाकारांच्या एका लूकमागे प्रचंड मेहनत असते. अनेकदा ऑन एअर कलाकारांचे जे केस दिसतात, ते त्यांचे खरे केस नसतातही. हेअर एक्स्टेंशन किंवा विगची ती कमाल असते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या रणबीर कपूरच्या अॅनिमल सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. या सिनेमात रणबीरचे वेगवेगळे लूकही फॅन्सना आवडले. पण रणबीरचे या सिनेमातील केस पूर्णपणे खरे नव्हते. त्याचा मानेवर केस रुळत असलेला लूक तयार करण्यासाठी हेअर एक्स्टेन्शनची मदत घेण्यात आली होती. पद्मावतमधला रणवीर सिंहचा अल्लाउद्दीन खिलजीचा लूक तयार करण्यासाठीही खोटे केस आणि दाढी लावण्यात आली होती. तेरे नाम या सिनेमातील सलमान खानची हेअर स्टाईल तुम्हाला आठवतीये का? रब ने बना दी जोडीमधली शाहरूखचे तेल लावून चप्प बसवलेले जे केस होते, तोही विगच होता. केसांच्या स्टाईलने कलाकारांचा लूक बदलून टाकण्याची ही कामगिरी एक-दोन नाही तर तब्बल चाळीस वर्षांपासून दोन मराठमोळे भाऊ करत आहेत. सुरेंद्र साळवी आणि त्यांचे धाकटे भाऊ जीतू साळवी. जीतू यांना इंडस्ट्रीतले लोक बाला म्हणूनच बोलावतात. गेल्या चाळीस वर्षांपासून सुरेंद्र साळवी या व्यवसायात आहेत. या चाळीस वर्षांत त्यांनी अशोक कुमारांपासून शम्मी कपूर, देवानंद, राज कुमार, कमल हासन, रजनीकांत, अमिताभ बच्चनपासून अनेक कलाकारांसांठी खोटे केस बनवले आहेत.
मोठ्या भावाच्या पावलावर पाऊल टाकून धाकटा भाऊ व्यवसायात
सुरेंद्र यांच्या पावलावर पाऊल टाकत जीतू साळवी याच व्यवसायात आले आणि वीस वर्षांत त्यांनी अनेक अभिनेते, सुपरस्टार्ससाठी केसांचे वेगवेगळे लूक तयार केले आहेत. सुरेंद्र साळवी यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं की, “मी 1981 साली खोटे केस बनवण्याचं काम सुरू केलं. त्याआधी मी वेगळ्याच व्यवसायात होतो. 1981 ते 1995 मी माझ्या गुरूंच्याच हाताखाली काम केलं. त्या काळात मी 'कुली', 'मर्द', 'अल्लाह रखा', खुदा गवाहसारख्या चित्रपटांसाठी काम केलं.” 1995 साली त्यांनी स्वतःचं सुरेंद्र नॅचरल हेअर सेंटर सुरू केलं आणि तेव्हापासून आजपर्यंत ते सक्रीय आहेत. आतापर्यंत त्यांनी 600 हून अधिक चित्रपटांसाठी काम केलं आहे. दुसरीकडे त्यांचे धाकटे भाऊ जीतू साळवी ऊर्फ बाला सांगतात की, “मी या व्यवसायात जे काही शिकलो, ते माझ्या मोठ्या भावाकडून शिकलो आहे. शिक्षण संपल्यानंतर मी त्यांना मदत करायला लागलो. तेव्हापासून आतापर्यंत केवळ हिंदीच नाही तर इतर भाषांतल्या सिनेमांसाठीही काम केलं आहे. मी सलमान खान, रणबीर कपूर, रणवीर सिंह, संजय दत्त, शाहिद कपूर, अमिताभ बच्चन, यश, चिरंजिवी, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, कोंकणा सेन शर्मा सारख्या अनेक स्टार्ससाठी हेअर विग बनवले आहेत.”
हे नकली केस कसे तयार केले जातात?
बाला सांगतात, “ हे केस आंध्र प्रदेशमधील तिरुपती मंदिरातून येतात. तिरुपती मंदिरात जे केस अर्पण केले जातात, ते केस आम्ही वितरकांकडून खरेदी करतो. हे केस किलोंच्या हिशोबाने मिळतात. केस चांगल्या प्रतीचे असतील तर आम्हाला एक ते दीड लाख रुपयांपर्यंत मिळतात आणि एक किलो केसांपासून 20 ते 25 विग बनतात.” “मिशी आणि छोट्या दाढीसाठी आम्ही कोणत्याही स्थानिक सलूनमधून केस खरेदी करतो. एक किलो केस 15 ते 20 हजार रुपयांना मिळतात. चांगल्या क्वालिटीचे खोटे केस बनवण्यासाठी आम्हाला जवळपास 8 ते 10 दिवस लागतात. साधारण दर्जाचे खोटे केस बनवण्यासाठी दोन-तीन दिवस लागतात,” असं बाला सांगतात.
केसांचं काम खूप बारकाईनं आणि सावधगिरीनं केलं जातं. त्यासाठी एक लांबलचक प्रक्रिया पार पाडावी लागते.
स्केच आणि डोक्याचं माप घेण्यापासून सुरूवात
एखाद्या सिनेमात खोटे केस बनवण्याची प्रक्रिया नेमकी कशी असते, हे बाला यांनी सविस्तरपणे सांगितलं. "सर्वांत आधी आमच्याकडे प्रॉडक्शन टीमचा फोन येतो. त्यानंतर आम्हाला सेटवर बोलावलं जातं. तिथे आम्हाला कोणत्या प्रकारचे केस, दाढी-मिशा आवश्यक आहेत, हे सांगितलं जातं. त्यानंतर आमचं खरं काम सुरू होतं," असं बाला सांगतात. ते सांगतात की, “आम्ही कलाकारांना भेटून त्यांचे चेहरे आणि डोक्याचं माप घेऊ शकतो. त्यानंतर त्या हिशोबाने एक स्केच तयार करतो. ते स्केच प्रॉडक्शन टीमला दाखवतो. त्यांना तो लूक आवडला की, आम्ही तो आमच्या कारागिरांना दाखवतो. त्यानंतर कारागिर त्या हिशोबाने केसांचा विग, दाढी आणि मिशा तयार करतात. फायनल प्रॉडक्ट बनविण्याआधी आम्ही 4 ते 6 खोट्या केसांचे सेट बनवनू ठेवतो. कलाकारांना जो पसंत येईल तो मग फायनल केला जातो.” या सगळ्यामध्ये आठ ते दहा दिवसांचा वेळ जातो, असं ते सांगतात. कलाकारांना विग लावल्यानंतर त्यांचे खरे केस घट्ट बांधले जातात आणि मग त्यावरून विग लावला जातो. हे काम इतक्या बारकाव्याने केलं जातं की, विगच्या खाली खरे केस आहेत हे लक्षातही येत नाही.
केसांची गुणवत्ता कशी राखली जाते?
खोट्या-दाढी मिशांबद्दल सांगताना बाला म्हणतात की, “दाढी-मिशा लावण्यासाठी चेहऱ्यावर ग्लू लावला जातो. दुसरीकडे हेअर एक्स्टेन्शन किंवा विग लावताना त्यात छोट्या-छोट्या क्लिप लावल्या जातात. त्या खऱ्या केसांमध्ये अडकवल्या जातात. त्यानंतर हे केस खऱ्यासारखेच वाटतात.” केसांची गुणवत्ता राखण्यासाठी केस डिटर्जंट पावडरने धुतले जातात. त्यानंतर पुन्हा हे केस शाम्पू आणि कंडिशनरने स्वच्छ केले जातात. मग केस वाळवले जातात. स्टार्सच्या चेहऱ्याचं आणि डोक्याचं जे माप घेतलेलं असतं, त्यानुसार एक साचा तयार केला जातो. हा साचा दिसताना मानवी डोक्याप्रमाणेच दिसतो. त्यावर एक जाळीदार कापडाची टोपी घातली जाते. टोपी घातल्यानंतर कारागिर एक-एक केस लावायला लागतात. कापड जसं शिवलं जातं, तसे हे केस सुईने एकमेकांमध्ये विणले जातात. हे काम हातानेच केलं जातं, त्यात मशिनचा वापर होत नाही. केस तयार झाले की पात्राच्या हेअर स्टाईलप्रमाणे ते कापले जातात आणि मग हे केस वापरण्यासाठी तयार होतात, असं बाला सांगतात.
हेअर विग आणि हेअर एक्सटेन्शनमध्ये फरक
हेअर विग आणि हेअर एक्सटेन्शनमध्ये नेमका काय फरक आहे हे सांगताना बाला साळवी सांगतात की, जेव्हा केस पूर्ण डोकं झाकण्यासाठी असतात, तेव्हा विग वापरला जातो. पण जेव्हा तुमचे केस लांब दाखवण्यासाठी खऱ्या केसांसोबत खोट्या केसांचा पॅच जोडला जातो, तेव्हा त्याला हेअर एक्सटेन्शन म्हणतात. पद्मावतमध्ये रणवीर सिंह आणि शाहिद कपूरच्या केसांना एक्सटेन्शन लावण्यात आलं होतं. आरआरआर, संजू सारख्या सिनेमांमध्येही एक्सटेन्शन वापरण्यात आलं होतं. अभिनेत्रींचे केस लांब दाखवण्यासाठीही हेअर एक्सटेन्शन वापरलं जातं. विग केवळ अभिनेते नाही तर अभिनेत्रींसाठीही बनवले जातात. पीकेमध्ये अनुष्का शर्मा, बर्फीमध्ये प्रियंका चोप्रा यांच्यासाठी पण आम्ही विग बनवले होते, असंही बाला सांगतात.
हॉलिवूडच्या तुलनेत कमी मोबदला
हॉलिवूडवाले एका विगसाठी 2.5 लाख रुपये घेतात. हॉलिवूडमधील हेअर मेकिंगबद्दल सांगताना बाला म्हणतात की, हॉलिवूडमध्ये एक विग बनविण्यासाठी किमान तीन महिने लागतात. आम्ही इथे दहा दिवसांत तयार करतो. दाढी बनवण्यासाठी तिथे पंधरा दिवस लागतात, आम्ही एक ते दोन दिवसांत करतो. आम्ही केसांच्या मागणीच्या हिशोबानेच दर आकारतो. हॉलिवुडवाले एका विगचे 2.5 लाख मोबदला घेतात. आमचं कामही तसंच असतं, पण तेवढा मोबदला मिळत नाही. सिनेमा, टेलिव्हिजन शो आणि ओटीटी प्लॅटफॉर्मखेरीज साळवी बंधू सामाजिक जबाबदारी म्हणूनही केस बनवतात. कॅन्सर किंवा अन्य आजारांशी लढा देत असलेले लोकही साळवींशी संपर्क साधतात. अनेकदा ते असे विग मोफतही बनवतात. कधीकधी एलोपेसियासारखा आजार असलेल्या व्यक्तींना 7 ते 10 हजार रुपयांमध्येही चांगले विग बनवून देतात. आजकाल हेअर एक्स्टेन्शच्याही ऑर्डर येतात. तेही कमी पैशांमध्ये बनवून देतो, असं साळवींनी सांगितली.
मेहनत आमची, पण नाव मेकअप आर्टिस्टचं
इतक्या वर्षांपासून या व्यवसायात असलेल्या सुरेंद्र आणि बाला यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे इंडस्ट्रीतले लोक आम्हाला ओळखतात, आमचं काम त्यांना माहितीये. पण सर्वसामान्य प्रेक्षकांना मात्र आमच्याबद्दल काही माहिती नसतं. ते म्हणतात की, आम्ही लोक कलाकारांचे लूक तयार करण्यासाठी इतकी मेहनत करतो, पण आम्हाला कधीही कोणताही पुरस्कार मिळत नाही. इंडस्ट्रीमधले लोक हेअर विग बनवणाऱ्यांना मेकअप डिपार्टमेंटचा भाग मानत नाहीत. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यांमध्ये सगळे अवॉर्ड्स मेकअप आर्टिस्टच घेऊन जातात. त्यामुळे आमचं नाव आणि काम दोन्ही समोर येत नाहीत. आम्ही दोघे भाऊ हेअर विग आर्टिस्ट हे करिअर म्हणून पुढे आणायचा प्रयत्न करत आहोत. हॉलिवूडमध्ये ही कला लोकप्रिय आहे, पण आपल्याकडे तितकी जागरुकता नाहीये. केसांशी संबंधित काही पण असलं की लोक त्याला हेअर स्टाईलच मानतात. पण त्यापेक्षाही जास्त गोष्टी असतात, हे त्यांच्या गावीच नसतं. आमच्याकडे हे शिकायला कोणी येणार असेल, तर आम्ही मोफत शिकवायलाही तयार आहोत. परदेशात यासाठी 2.5 लाख ते 3 लाखांपर्यंत फी आकारतात, असं साळवी सांगतात.
माझा सिनेमातला लुक यांच्यामुळेच
बाला आणि सुरेंद्र यांच्या कामाचा उल्लेख करत ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर सांगतात की, “मी माझ्या सर्व सिनेमांमध्ये, मग ते भारतीय असो की आंतरराष्ट्रीय, माझ्या भूमिकेनुसार बालाच माझे केस बनवतात. मला तुम्ही ज्या वेगवेगळ्या लूकमध्या पाहता, ते यांनीच तयार केलेले आहेत. सिनेमात माझा जो काही लूक असतो तो यांच्यामुळेच.” “ते केवळ माझ्यासाठीच नाही, तर अनेक कलाकारांसाठी काम करतात,” असंही अनुपम खेर यांनी सांगितलं.
Published By- Dhanashri Naik