शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आर.डी. बर्मन यांच्या संगीतानं अजरामर झालेली १५ गाणी

पंचमदा असं प्रेमानं ओळखल्या जाणाऱ्या आर. डी. बर्मन यांचा आज जन्मदिवस आहे. संगीत समीक्षक पवन झा यांनी पंचमदांनी संगीत दिलेल्या 15 अविस्मरणीय गाण्यांबद्दल लिहिले आहे.
 
1. घर आजा घिर आई बदरिया सावरिया (चित्रपटः छोटे नवाब)
हे गाणं लता मंगेशकर यांनी गायलं आहे. हा एक मुजरा आहे. यामध्ये पंचमदांनी क्लासिकल आणि सेमीक्लासिकल बेसचा वापर केला आहे. गाण्यामध्ये मेलडीला अधिक महत्त्व दिलं आहे. हे गाणं शैलेंद्र यांनी लिहिलं आहे.
 
2. मार डालेगा दर्दे जिगर (चित्रपट: पति पत्नी)
हे गाणं आशा भोसले यांनी गायलं आहे. या गाण्यात ब्राझिलियन बोसानोवा बीट्सचा वापर करण्यात आला होता. आशा भोसलेसुद्धा या गाण्याला आव्हानात्मक मानायच्या. हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं आहे.
 
3. दइया ये मैं कहां आ फंसी (चित्रपट: कारवां)
या गाण्यामध्ये पंचमदा यांनी हलक्याफुलक्या वातावरणाची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांनी ऑर्केस्ट्राचा चांगला वापर केलाय. हास्याचे वातावरण निर्माण करताना त्यांनी आपला मूळ शैली सोडली नाही हे विशेष. कल्पनाशक्तीचा असा वापर खरंच कौतुकास्पद आहे.
 
4. चुनरी संभाल गोरी (चित्रपट: बहारों के सपने)
भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचं श्रेय पंचमदांना दिलं जातं. मात्र त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही उत्तमप्रकारे सामावून घेतलं आहे. या गाण्यामध्ये पूर्वांचल आणि बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केलाय. मन्ना डे आणि लता मंगेशकर यांच्या आवाजामुळं त्याला वेगळी उंची मिळाली आहे. हे गाणं मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलं आहे.
 
5. पल दो पल का साथ हमारा (चित्रपट: द बर्निंग ट्रेन)
ही एक उत्तम कव्वाली आहे. मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी ते चांगलं गायलं आहे. त्याचं चित्रिकरणही भारी आहे.
 
6. अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी (चित्रपट: किताब)
या गाण्यात आर. डी. बर्मन यांनी क्लास रुमचं वातावरण तयार केलं आहे. गुलजार यांनी लिहिलेल्या या गाण्यात आवाज तयार करण्यासाठी डेस्कचा वापर केला आहे. पद्मिनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे यांनी हे गाणं गायलं आहे. त्यावेळेस या दोघी अगदी लहान होत्या.
 
7. कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना (चित्रपट: अमर प्रेम)
या गाण्यानं समाजातल्या पारंपरिक नियमांना आव्हान दिलं आहे. या गाण्यात एक तत्वज्ञान आणि विशिष्ट दृष्टीकोनही आहे. आनंद बक्षींच्या शब्दांना पंचम यांनी सुंदर संगीत साज चढवला आहे. किशोर कुमार यांच्या आवाजामुळं ते आणखी एका वेगळ्या उंचीवर गेलं आहे.
 
8. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है (चित्रपट: इजाजत)
गुलजार यांच्या गाण्याचे शब्द बऱ्याचदा मुक्त पद्धतीचे असतात. त्यांना संगीत देणं थोडं कठीण असायचं, परंतु पंचमदांनी याला सुंदर चाल लावली आहे. आशा भोसले यांचा आवाजही हृदयाला स्पर्श करतो.
 
9. एक ही ख़्वाब कई बार देखा है (चित्रपट: किनारा)
हे गाणंही गुलजार यांनी लिहिलं आहे. हे गाणं संगीतबद्ध करणं कठिण होतं. परंतु आर. डी. बर्मन यांनी त्याला समर्पक संगीत दिलं आहे. या गाण्यात फक्त गिटारचा वापर करण्यात आलाय.
 
10. तेरे बिना ज़िंदगी से कोई शिकवा तो नहीं (चित्रपट: आंधी)
खरंतर आर. डी. बर्मन यांनी अगणित रोमँटिक गाणी केली आहेत. त्यातील एकाची निवड करणं अवघड आहे. पण हे गाणं माझं सर्वात आवडतं गाणं आहे. या गीतात गुलजार यांनी नात्यामधले ताणे-बाणे व्यक्त केले आहेत. तसेच संवादांचा वापरही एकदम खुबीने केला आहे. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी ते गायलं आहे.
 
11. चांद मेरा दिल (चित्रपट: हम किसी से कम नहीं)
या एकाच गाण्यात 5-6 लहान लहान गाणी आहे. चांद मेरा दिल, दिल क्या महफिल, तुम क्या जानो मोहब्बत क्या है अशी गाणी त्यात आहेत. हे गाणं ऐकताना पाय थिरकतातच.
 
12. दम मारो दम (चित्रपट: हरे रामा कृष्णा)
आर डी बर्मन यांनी या गाण्यात तरुण वर्गाला चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व दिलं आहे. 70 च्या दशकातला खुलेपणा या गाण्यात वापरला आहे. त्या काळात तरुण वर्गामध्ये होत असलेले बदल गाण्यात चित्रित करण्यात आले आहेत. गाण्यात क्रांती दाखवली आहे. मात्र पंचमदांच्या संगीतात गोंधळ नाही. हे गाणं आनंद बक्षी यांनी लिहिलं आहे.
 
13. क़तरा-क़तरा (चित्रपट: इजाजत)
हे गाणं गुलजार यांनी लिहिलं आहे. हे गाणं पंचमदांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्सवरती वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केलं आहे. दोन्ही ट्रॅक इतक्या बेमालूमरित्या एकमेकांमध्ये मिसळले आहेत की संपूर्ण गीत एक स्वतंत्र वाटतं.
 
14 ज़िंदगी के सफर में गुज़र जाते हैं जो मुक़ाम (चित्रपट: आपकी कसम)
या गाण्यात नॉस्टॅल्जिया तयार केला आहे. आनंद बक्षी यांच्या गीताला पंचमदांनी उत्तम संगीतसाज चढवला आहे. किशोर कुमारनी ते गायलं आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट गीतांमध्ये या गाण्याचं नाव घेतलं जातं.
 
15. रैना बीती जाए रे (चित्रपट: अमर प्रेम)
लता मंगेशकर यांनी हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीचं संगीत आपण देऊ शकतो हे पंचमदांनी या गाण्यातून सिद्ध केलं.
 
हे गाणं मदन मोहन यांनी ऐकलं तेव्हा त्यांना हे गाणं एसडी बर्मन यांनी केलं असावं असं वाटलं होतं. त्यांनी एसडीना फोन करून मी तुमचं गाणं ऐकलं, एकदम चांगलं आहे असं सांगितलं. त्यावर एसडीनी ते गाणं मी नाही तर पंचमदांनी केल्याचं सांगितलं. मदन मोहन यांना ते गाण एसडींचं असल्यासारखं वाटणं एक मोठी पावती होती.