शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

रफी यांच्या नावाने पुरस्कार देण्यासाठी प्रयत्न करणार

उपमुख्यमंत्री छगन भुजबळ

PR
महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने पुरस्कार देण्याबरोबरच त्यांच्या सन्मानासाठी शक्य तेवढे प्रयत्न करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल येथे दिली. जीवनगाणी परिवारातर्फे मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित `फिर रफी` या संगीत मैफिली प्रसंगी उपमुख्यमंत्री बोलत होते. रफी यांची कन्या नसरीन आणि यास्मिन, जावाई मीराज, तसेच ऍड. उज्ज्वल निकम, परिवहन विभागाचे सचिव संगीतराव, प्रसिद्ध निवेदक अमीन सयानी आदी यावेळी उपस्थित होते.

या मैफिलीच्या निमित्ताने मोहम्मद रफी यांची गाणी पुन्हा ऐकण्याचा योग आला, असे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, प्रत्येक संगीतप्रेमी भारतीयांच्या घरात आणि परदेशांतील दुकानांतही रफी साहेबांच्या गाण्यांच्या कॅसेट्स आणि सीडी हमखास दिसतात. `अब तुम्हारे हवाले वतन साथीयों` सारख्या गाण्यांनी देशभक्तीचे चैतन्य जागविले. तर `तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा! इन्सान की औलाद है इन्सान बनेगा` सारख्या गाण्यांतून मानवतेची शिकवण दिली. त्यांनी हिंदूसह विविध धर्माच्या देवदेवतांची गाणी गाऊन सर्वधर्म समभाव वृद्धींगत करण्यात मोठे योगदान दिले. पार्श्र्व गायनात त्यांनी त्यांचा स्वत:चा वेगळा ठसा उमटविला. 30 ते 40 वर्षांपूर्वीची त्यांची सदाबहार गाणी आजही आपण तेवढ्याच तल्लीनतेने ऐकतो.

या मैफिलीने रफी साहेबांच्या आठवणी त्याज्या झाल्याचे त्यांचे जावाई मिराज यांनी सांगितले. तर ऍड. निकम म्हणाले की, या मैफिलीत खुद्द रफी साहेबच अवतरले आहेत की काय असे वाटत होते. त्यामुळे मी गाण्यांत फारच तल्लीन झालो होतो.

मोहम्मद रफी यांच्या आठवणींना उजाळा देताना अमीन सयानी म्हणाले की, रफी साहेबांच्या मनात आणि ह्रदयातही सुरेलपणा होते. त्यांच्या चेहज्यावर कधीही राग जाणवला नाही. त्यांचे हेच जगणे आवाजाच्या माध्यमातून गाण्यात उतरत होते.

`फिर रफी` या कार्यक्रमाची संकल्पना प्रसाद मोहाडीकर यांची असून श्रीकांत नारायण यांनी सरिता राजेश या सहगायिकेसह लोकप्रिय गाणी सादर केली. संदीप पंचवाटकर यांनी निवेदक म्हणून काम पाहिले. अजय मदन यांचे संगीत संयोजन होते. हाच कार्यक्रम मुंबई, ठाणे आणि वाशी येथे सादर केला जाणार आहे.