रविवार, 12 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By वेबदुनिया|

निर्वाण म्हणजे काय?

बौद्ध धर्मात निर्वाण या शब्दाचा अर्थ आहे विझून जाणे. तृष्णेचे विझून जाणे. वासनांचे शांत होणे. तृष्णा आणि वासनाच दुःखाला कारणीभूत असतात. दुःखातून सुटका होणे म्हणजे निर्वाण प्राप्त करणे. 

भगवान बुद्धांनी म्हटले आहे, की भिक्षुंनो, जग अनादी आहे. अविद्या व तृष्णा यांनी बाधित होऊन लोक भटकत बसतात. आदी-अंताचा त्यांना थांग लागत ना ही. भवचक्रात अडकून जन्म-मरणाच्या फेर्‍यात घिरट्या घालत बसतात.

या जगात सातत्याने जन्म घेऊन प्रियजनांच्या वियोगाने वा अप्रिय लोकांच्या संयोगाने अश्रूपात करावा लागतो. दीर्घकालीन दुःख आणि तीव्र दुःख हेच काय ते पदरी पडते. म्हणूनच यातून सुटका करण्यासाठी आता हे सर्व सोडून देत वैराग्य प्राप्त करा आणि मुक्तीची वाट धरा.

जिघच्छा परमा रोगा, संखारा परमा दुखा।
एव ञत्वा यथाभूतं निब्बानं परम सुखं॥

बुद्ध म्हणतात, की सर्व रोगांचे मूळ शेवटी जिघृक्षा आहे. ग्रहण करण्याची इच्छा, तृष्णा. सर्व दुःखाचे मूळ आहे संस्कार. हेच जाणून घेत तृष्णा व संस्काराचा नाश करूनच निर्वाण प्राप्त करता येईल.

सचे नेरेसि अत्तानं कंसो उपहतो यथा।
एस पत्ती सि निब्बानं, सारम्भो तेन विज्जति॥

बुद्ध म्हणतात, की तुटलेल्या काशाच्या भांड्यांसारखे स्वतःला नीरव , निश्चल व कर्महीन केलेत तर निर्वाणावस्था साध्य केलीत असे समजा. कारण कर्मच सुटल्याने जन्म-मरणाचा फेराही सुटला.