शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By

शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी का ठेवले?

मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. शिवरायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा मतभेदांचा मुद्दा असला तरी महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 (शुक्रवार, 19 फेब्रुवारी 1630) ही शिवरायांची जन्मतारीख 2001 साली स्वीकारली. 
 
इतर संभाव्य तारखांमध्ये 6 एप्रिल 1627 (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. महाराष्ट्र शासनाने शिवाजी महाराजांच्या जन्माच्या स्मरणार्थ 19 फेब्रुवारी हा दिवस शिवाजी जयंती म्हणून सूचीबद्ध केला आहे.
 
शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती होते. शिवाजींच्या आई साहेब जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या.
 
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा जातीतील आणि भोसले कुळातील होते. त्यांचे आजोबा मालोजी (1552 -1597) अहमदनगर सल्तनतचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना "राजा" ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदापूरचे देशमुखी हक्क देण्यात आले. तसेच त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील देण्यात आला.
 
शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आल्याचे असे सांगतिले जाते. एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव 'शिवाजी' असे ठेवण्यात आले.