शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (11:16 IST)

लाल महाल: शिवाजी महाराजांनी जेव्हा शाहिस्तेखानाची बोटं छाटली...

shivaji maharaj
स्नेहल माने
'शिवाजी महाराजांच्या अद्भूत साहसानंतर आदिलशहाची दैना तर उडालीच, पण दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील आपल्या सत्तेची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच पुण्यात तळ ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्यानं फर्मान सोडलं.'
 
लाल महाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या आठवणींचे स्मारक आणि प्रेरणास्थान आहे.
 
राजमाता जिजाऊंनी हा लाल महाल बांधून घेतला होता. याच महालात महाराजांचे बालपण गेले होते आणि पुढे शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.
 
त्यांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले तेव्हा त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी औंरंगजेबाने शाहिस्तेखानाला पाठवले पण बंदोबस्त करणे तर सोडाच शाहिस्तेखानाची बोटे महाराजांनी छाटून टाकली. एक वेळ जीव गेला असता तर बरं झाले असते अशी खानाची स्थिती झाली होती. तो इतिहास नेमका काय आहे हे आपण आज पाहू.
 
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याचा विडा उचलून शाहिस्तेखान दख्खन प्रांतात आला. शिवाजी राजेंना पकडून तुमच्यासमोर उभे करतो अशी फुशारकी तर त्याने मारली पण त्यालाच मानहानीकारक प्रसंगाला सामोरं जावं लागलं.
 
शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटं कशी छाटली हा प्रसंग पाहण्याआधी हे महत्त्वाचं आहे की त्यावेळची परिस्थिती कशी होती. नेमकी ही घटना घडण्यासाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत होत्या आणि मुळात औरंगजेबाचा मामा असलेला शाहिस्तेखान महाराजांवर चाल करून का आला हे पाहणे महत्त्वाचे आहे.
 
पुणे - शहाजी महाराजांची जहागीर आणि शिवाजी महाराजांच्या कार्याचा आरंभ
पुणे ही शहाजी महाराजांची जहागीर होती. पुणे-सुपे आणि कर्नाटक या दोन ठिकाणी शहाजी महाराजांची जहागीर होती आणि त्याचाच फायदा पुढे शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी झाला हा इतिहास सर्वश्रुत आहे. दक्षिणेतील सुलतानांच्या राजवटींना तोंड देण्यासाठी या शहरांचे महत्त्व होते.
 
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड (भाग 1) मधील डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित 'शिवकाल' (1630 ते 1707 इ.) या पुस्तकात असे म्हटले आहे की, "महाराष्ट्र राष्ट्राच्या राष्ट्रीयत्वाचा प्रारंभ सतराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच झाला. या शतकाच्या सुरुवातीस दक्षिणेत सुलतानांच्या राजवटी चालू होत्या.
 
"सतराव्या शतकाच्या सुरुवातीस लखुजी जाधवराव, निंबाळकर, घोरपडे, मालोजी व विठोजी भोसले वगैरे मराठा सरदारांनी आपल्या कर्तुत्वावर सुलतान राजवटीत मोठमोठाले हुद्दे मिळवले. मालोजीराजे यांनी सुलतानीत मोठा हुद्दा पत्करून मोठी कीर्ती संपादन केली. सर्वधर्मीय लोकांच्या सोयीसाठी प्रयत्न केले त्यामुळे भोसले घराण्याचे महत्त्व वाढले," असे शिवकालमध्ये लिहिले आहे.
 
"पुढे शहाजी महाराजांनी इस्लामी शाह्यांच्या कमकुवतपणाचा फायदा घेऊन आपली हुकुमत वाढवली. त्यांची स्वातंत्र्याकडे ओढ वाढू लागली. शहाजी महाराजांच्या नेतृत्वाला स्थानिक समाजाकडून पाठिंबा मिळू लागला. यावेळी शहाजीराजांनी महाराष्ट्रात पुणे सुपे आणि कर्नाटकात बंगलोर अशा दोन जहागिऱ्या ठेवण्यात खूपच दूरदृष्टी दाखवलेली होती.
 
"या दोन जहागिऱ्यांच्या साह्याने कर्नाटकात व महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचे प्रयत्न त्यांनी थोरले चिरंजीव संभाजीराजे आणि शिवराय यांच्याकरवी करण्याचे योजले आणि त्यात त्यांना यशही आले."
 
राजमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला
'शिवराय यावेळी जिजामातेसह पुण्याच्या जहागिरीवर होते. त्यांना आईसह बंगलोरला बोलवून घेतलं. तिथं शहाजी महाराजांनी आपल्या दोन्ही मुलांना सर्व प्रकारचे सैनिकी शिक्षण आणि राज्यकारभाराचा प्रशिक्षण देऊन त्यात तरबेज केलं. बंगळूर येथील दोन वर्षांच्या वास्तव्यानंतर शहाजीराजांनी शिवरायांची रवानगी पुण्यास केली.
 
बरोबर आपल्या तालमीत तयार झालेले मुत्सद्दी दिले. पुण्याची जहागीर दिली. तोफा, हत्ती, घोडे आणि जागोजागी गडकोटात साठवलेला सरंजाम दिला,' असा उल्लेख पुस्तकात आढळतो.
 
शिवाजी महाराजांसाठी हा लाल महाल राजमाता जिजाऊंनी बांधून घेतल्याचं इतिहास अभ्यासक सांगतात. त्यामुळे इतिहासात पुण्याचे आणि लाल महालाचे महत्त्व आहे.
 
स्वराज्यासाठी पुणे महत्वाचं का ठरलं यावर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सांगतात, "शहाजी राजांना जेव्हा पुणे प्रांताचा ताबा मिळाला तेव्हा तिथे कुटुंबाला राहण्यासाठी वाडे बांधण्यात आले. पण पुढे आदिलशहाच्या हुकुमावरून मुरार जगदेवाने हे वाडे जाळले. शहराचा कोट पाडून टाकला. लोकांनी वस्ती करू नये म्हणून पुण्यावरून अक्षरशः गाढवाचा नांगर फिरवला.
 
"पुढे शिवराय 12 वर्षांचे झाल्यावर बंगरुळहून पुण्यास परतले. तेव्हा त्यांचा मुक्काम शिवापूर येथे होता. अशावेळी पुणे राहण्यायोग्य बनवण्यासाठी जिजाऊंनी पुण्यात सोन्याचा नांगर फिरवला. कसब्यात जिजाऊंच्या देखरेखीखाली लाल महालाच बांधकाम झालं," सावंत सांगतात.
 
"स्वराज्यनिर्मितीसाठी जी काही खलबत झाली ती याच लाल महालात झाली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जडणघडण पुण्याच्या लाल महालात झालेली म्हणूनच पुणे हे स्वराज्यासाठी महत्वाचं होतं," असं ही इंद्रजित सावंत सांगतात.
 
शिवरायांनी आपल्या वडिलोपार्जित जहागिरीचे स्वतंत्र राज्य बनवलं.
 
पुण्याची जहागिरी हाती आल्यानंतर महाराजांनी स्वराज्य स्थापण्याच्या धाडसी उद्योग हाती घेतला. महाराजांनी 1647 मध्ये म्हणजेच अवघ्या एका वर्षात तोरणा, राजगड, पुरंदर आणि सिंहगड यांसारखे महत्वाचे किल्ले ताब्यात घेऊन आदिलशहासारख्या शत्रूंना आश्चर्यचकित केलं होतं.
 
महाराजांच हे धोरण आदिलशहाला भयप्रद वाटत होतं. पुढे जावळीच्या विजयामुळे तर महाराजांचा दरारा महाराष्ट्राच्या देश आणि कोकण या दोन्ही भागात निर्माण झाला.
 
थेट औरंगजेबालाच महाराजांनी दिले आव्हान
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या डॉ. प्र. न. देशपांडे लिखित, 'छत्रपती शिवाजी महाराज' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेबाचा संबंध कसा आला आणि शाहिस्तेखान पुण्यावर चाल का करून आला यासंबंधी माहिती मिळते.
 
पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, "9 सप्टेंबर 1656 रोजी संभाजी मोहिते यांचेकडून शिवाजी महाराजांनी वडिलोपार्जित सुपे परगणा ताब्यात घेतला. त्यामुळे आदिलशहाप्रमाणे मुघल सत्ताधीशाला ही शिवाजी महाराजांची दहशत वाटू लागली. याच दरम्यान विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिलशहा आजारी पडला. तेव्हा महाराजांनी कर्नाटकात आक्रमण सुरू केलं. 1659 पर्यंत महाराजांनी कर्नाटकावर लहान-मोठ्या स्वार्‍या केल्या.'
 
"या सुमारासच दिल्लीचा बादशहा शहाजहानचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. महाराजांचा आणि त्याचा प्रत्यक्ष संघर्ष झाला नाही. पण ज्यावेळी औरंगजेबाने बिदर आणि कल्याणी या आदिलशाही प्रदेशावर हल्ले केले, त्यावेळी जुन्नर या मुघलांच्या महत्त्वाच्या केंद्रावर हल्ला करून शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला चकित केलं.
 
"महाराजांचं वाढतं वर्चस्व महागात पडेल हे लक्षात घेऊन औरंगजेबाने शिवाजी विरुद्ध सरदार पाठवले. तसेच विजापूरच्या आदिलशहाला शिवाजी महाराजांच्या हालचालींना पायबंद घालण्याचा इशारा दिला. पण तत्कालीन परिस्थितीत औरंगजेबालाच शिवाजी महाराजांबरोबर वरकरणी सलोखा ठेवावा लागला. कारण दिल्लीत शहाजहान बादशहा आजारी पडला होता आणि औरंगजेबाला दिल्लीचं सिंहासन खुणावत होतं. पुढे 5 जून 1659 ला औरंगजेबाने स्वतःला मुघल बादशाह म्हणून घोषित केलं," असा उल्लेख या चरित्रात आहे.
 
"शिवाजीने सोनोपंत वकीलास औरंगजेबाचे अभिनंदन करण्यास दिल्लीस पाठविले. औरंगजेबाने जुलै 1659 मध्ये शिवाजीला मानाची वस्त्रे पाठवली. अशाप्रकारे शिवाजी आणि औरंगजेब यांच्यात वरकरणी सलोखा निर्माण झाला. मात्र शिवाजीने आपले आक्रमणाचे धोरण कायम ठेवले," असा उल्लेख पुस्तकात आढळतो.
 
शिवाजी महाराज आणि औरंगजेबात थेट संघर्षास सुरुवात...
पुढे अफझलखानाचा वध केल्यानंतर आदिलशहाने शिवाजी महाराजांना नामोहरम करण्यासाठी सिद्दी जौहर या बलाढ्य सरदाराची नेमणूक केली. 1660 मध्ये सिद्दी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. पण शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले. ही सुटका महाराजांच्या अद्भूत साहस, अप्रतिम बुद्धिकौशल्य, विलक्षण पराक्रम, प्रचंड आत्मविश्वास यांचं प्रतीक होतं.
 
शिवाजी महाराजांच्या अद्भूत साहसानंतर आदिलशहाची दैना तर उडालीच, पण दिल्लीत असलेल्या औरंगजेबाला दक्षिणेतील आपल्या सत्तेची चिंता वाटू लागली. आणि म्हणूनच पुण्यात ठोकून बसलेल्या आपल्या मामाला म्हणजेच शाहिस्तेखानाला शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्याविषयी त्यानं फर्मान सोडलं.
 
रियासतकार सरदेसाई आपल्या 'मराठी रियासत' - खंड 1 पुस्तकात लिहितात, "औरंगजेबाने 5 जून 1659 ला आपला मामा शाहिस्तेखान याची दक्षिणेच्या सुभ्यावर नेमणूक केली होती. शाहिस्तेखान दिल्लीहून नव्या जागी औरंगाबादला निघाला होता. शाहिस्तेखान दक्षिणेच्या वाटेवर असताना औरंगजेबाने विचार केला की शाहिस्तेखानाला शिवाजीराजांचा बंदोबस्त करण्याचे काम द्यावे. खानाबरोबर त्यावेळी तोफखाना व एक लाख सैन्य होतं."
 
"बादशहाचं फर्मान ऐकून सर्व मुघल सरदार मराठ्यांवर स्वारी करायला तयार झाले. त्यांना आगेकूच करण्याचा हुकूम शाहिस्तेखानाने दिला. औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी होती. तिथे आल्यावर शाहिस्तेखानाने काही आपला मुलगा अबुलफत्तेखान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. पुढे खान अहमदनगर आल्यावर त्याला वाटेत घाटगे, जाधवराव, कोकाटे, गाढे आदि महाराजांना पाण्यात पाहणारे मराठा सरदार येऊन मिळाले," असा उल्लेख वा. सी. बेंद्रे आपल्या 'छत्रपती शिवाजी महाराज' या पुस्तकात करतात.
 
ते पुढे लिहितात, "शाहिस्तेखानाच्या मोगली फौजेस अहमदनगर वरून रसद मिळत होती. मराठे ती तोडत होते. या सगळ्याला तोंड देत खान सुपे, बारामती, इंदापूर, शिरवळ वगैरे परगण्यातील गावेच्या गावे पेटवून देऊन सासवडला दाखल झाला. त्यानंतर आपल्या सैन्यासह तो पुण्यात 9 मे 1660 रोजी पोहोचला."
 
शाहिस्तेखानाचा पुण्यात सुरू असलेला उपद्रव...
जदुनाथ सरकारांच्या, 'हिस्ट्री ऑफ औरंगजेब' भाग चौथा या पुस्तकात शाहिस्तेखानाने पुण्यात चालवलेल्या उपद्रवाचं वर्णन केलं आहे. पुस्तकात दिल्याप्रमाणे, "खानाने खुद्द लाल महालाचा कब्जा घेतला आणि तो तिथे मोठ्या दिमाखाने राहू लागला. लाल महालाचा आसमंत एक लाख मोगली फौजांनी व्यापून टाकला. लाल महालावर मोगलांचे हिरवे निशाण फडकू लागले. यावेळी शिवाजी राजे पन्हाळगडावर होते. राजमाता जिजाबाई राजगडावर होत्या. सबंध पुणे प्रांत मोगलांनी व्यापला होता."
 
"पुणे मुक्कामी असताना शाहिस्तेखानाने पुणे-नाशिक मार्गावर असलेल्या मराठ्यांच्या ताब्यातील चाकण किल्ल्यावर हल्ला करण्याचे ठरवले. या किल्ल्याचे रक्षण मराठा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा करीत होते. शाहिस्तेखान सुद्धा जातीने या लढाईला निघाला पण फिरंगोजी नरसाळा यांनी मुघलांचा हल्ला परत लावण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली.
 
"दोन महिने लढून हा किल्ला मोगलांना मिळाला पण झालेली प्राणहानी पाहून शाहिस्तेखानाने मराठ्यांचे किल्ले सर करत बसणे आपल्याला परवडणार नाही याबद्दल खात्री केली. आणि हा नाद सोडत पुण्यास येऊन त्याने महाराजांच्या लाल महाल मध्ये तळ ठोकला," असे हिस्ट्री ऑफ औरंगजेबमध्ये लिहिले आहे.
 
आणि शाहिस्तेखानाची खोड मोडली..
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेल्या "महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड (भाग 1) मधील डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित शिवकाल (1630 ते 1707 इ.) या पुस्तकात शाहिस्तेखानाची बोटं छाटण्याचं सविस्तर वर्णन दिलं आहे.
 
शाहिस्तेखान लाल महालात राहून फितुरी माजवत होता. त्याची फौज आसपासच्या परिसरातील प्रजेला त्रास देऊन लूटमार करीत होती. यावर शिवाजी राजे रायगडावर विचार करत होते की या शाहिस्तेखानाला स्वराज्यातून बाहेर कसा हुसकवायचा.
 
'काही जण मराठ्यांचा हल्ल्यात बळी पडले काहीजण शिताफीने निसटले. बघता बघता वाडा रिकामा झाला. पुण्यात असलेल्या मुघल सैन्याला नेमकं काय झालं समजलंच नाही. शिवाजीने हल्ला केला आहे हे समजल्यावर 'गनीम कोठे आहे?' अशा आरोळ्या ठोकत सर्वजण पळू लागले. या प्रसंगाचा फायदा घेऊन शिवाजी महाराज आणि त्यांचे लोक 'गनीम कोठे आहे?' असे ओरडत गर्दीमध्ये मिसळून गेले.' हा प्रसंग सभासदाने आपल्या बखरीत नमूद करून ठेवला आहे.
 
महाराज जितक्या त्वरेने आले होते तितक्याच त्वरेने आणि गुप्तपणे आपल्या फौजेच्या टोळ्या करीत सिंहगडावर गेले. महाराजांचा पाठलाग करीत खानाचे सैन्य पहिल्यांदा कात्रज घाटाकडे गेलं. कारण त्यांना त्या बाजूला मशाली पेटलेल्या दिसल्या. पण उजाडल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, जाणून-बुजून सैन्याला चकवण्यासाठी बैलांच्या शिंगाला मशाली बांधून पेटवून त्यांना कात्रज घाटाकडे पिटाळलं होतं. दुसऱ्या दिवशी खानाचे लोक पाठलाग करीत सिंहगडापर्यंत गेले, पण वरून तोफांचा मारा झाल्यावर मुघल सैन्य पळालं.
 
पुढे खान पुणे सोडून औरंगाबादेत गेला. शाहिस्तेखानावरील हल्ल्याची बातमी दिल्लीला पोचली आणि सर्व मुघल सरदार भयचकित झाले, त्यांच्या मनात राजांबद्दल दहशत निर्माण झाली.
 
आपल्या मामाच्या दुर्दशेची बातमी काश्मिरात बसलेल्या औरंगजेबाला मिळाली आणि त्याचा तडफडाट झाला. त्याने खानाची बदली बंगाल सुभ्यावर केली. शेवटी महाराजांनी शाहिस्तेखानाची खोड जिरवण्याची आखलेली युक्ती सोळा आणे यशस्वी ठरली होती.
 
(संदर्भ - महाराष्ट्राचा इतिहास-मराठा कालखंड (भाग 1) मधील डॉ. वि. गो. खोबरेकर लिखित 'शिवकाल'; 'छत्रपती शिवाजी महाराज - ले. डॉ. प्र. न. देशपांडे, प्रकाशक- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ; मराठी रियासत - भाग -1 - स. गो. सरदेसाई; 'छत्रपती शिवाजी महाराज - वा. सी. बेंद्रे, हिस्ट्री ऑफ औरंगजेब - जदुनाथ सरकार)
Published By -Smita Joshi