राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोनाचा संसर्ग अद्याप थांबलेला जरी नसला, तरी देखील कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मंगळवारी दिवसभरात राज्यात ४ हजार ५१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनावर मात केलेल्यांची संख्या १८ लाख ९४ हजार ८३९ वर पोहचली आहे. तर, राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (रिकव्हरी रेट) ९४.९८ टक्क्यांवर आहे.
याशिवाय, राज्यात मंगळवारी २ हजार २९४ नवे कोरोनाबाधित आढळले. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता १९ लाख ९४ हजार ९७७ वर पोहचली आहे. याशिवाय, ५० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, आतापर्यंत राज्यात ५० हजार ५२३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यात ४८ हजार ४०६ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत राज्यभरात १,३८,९५,२७७ नमुन्यांची तपासणी झाली. यापैकी १९ लाख ९४ हजार ९७७ (१४.३६टक्के) नमूने पॉझिटव्ह आढळले आहेत. सध्या राज्यात २ लाख १८ हजार ५८ जण गृहविलगीकरणात आहेत. तर, १हजार ९९६ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.