रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 22 मे 2021 (16:07 IST)

कोरोना: कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत 420 डॉक्टरांनी प्राण गमावला, 'या' राज्यात सर्वाधिक मृत्यू

विनीत खरे
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत भारतात 420 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) नं ही माहिती आणि आकडेवारी दिली आहे.
 
दुसऱ्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचा देशाची राजधानी दिल्लीत झाला आहे. दिल्लीत दुसऱ्या लाटते 100, तर त्याखालोखाल बिहारमध्ये 96, तर उत्तर प्रदेशात 41 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.
 
एप्रिलमध्ये दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला होता. आता मे महिना संपत असताना कोरोना रुग्णवाढीत थोडी घट झाल्याचे चित्र आहे.
 
मृत्युमुखी पडलेल्य डॉक्टरांमध्ये IMA चे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांचाही समावेश आहे. गेल्या सोमवारी डॉ. अग्रवाल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते 65 वर्षांचे होते.
 
कोरोनाच्या पहिल्या लाटेत 747 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी IMA नं जरी केली आहे. पहिल्या लाटेत सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू तामिळनाडूत (91), तर त्या खालोखाल महाराष्ट्रात (81) झाले.
गेल्या महिन्यात म्हणजे एप्रिल 2021 मध्ये कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेनं हाहा:कार माजवला होता, तेव्हा बीबीसीनं भारतातील डॉक्टरांच्या समस्यांचा आढावा घेतला होता. तो आढावा इथं देत आहोत :
 
जुलै महिन्यात बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डायबेटिसचे डॉक्टर राहुल बक्षी कोव्हिड वॉर्डच्या राऊंडवर होते. तेव्हा त्यांना एका खोलीत पीपीई किट परिधान केलेला एक कर्मचारी टेबल फॅनसमोर बसल्याचं दिसलं. तो कदाचित त्याची कोव्हिड वॉर्डाची आठ तासांची ड्युटी आटोपून थोडी विश्रांती घेत असावा.
 
कोव्हिडच्या उपचारांसाठी दिल्या जाणाऱ्या स्टिरॉइड्सने रुग्णांमध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. त्यामुळे डॉ. बक्षी यांच्यासारख्या डायबेटिस विशेषज्ञाची भूमिका रुग्णांसाठी महत्त्वाची ठरते.
 
कोव्हिड वॉर्डच्या राऊंडवेळी सर्वसाधारणपणे डॉक्टर आपला फोन बरोबर ठेवत नाहीत. म्हणून डॉ. बक्षी यांनी नर्सिंग स्टेशनमध्ये काम करत असलेल्या एका ज्युनियर डॉक्टरचा फोन मागून घेतला आणि पंख्यासमोर विश्रांती घेणाऱ्या सहकाऱ्याचा फोटो टिपून घेतला.
पीपीई म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंटचा अर्थ होतो एन-95 मास्क, सर्जिकल मास्क, गॉगल, फेस शिल्ड, गाऊन, कॅप.
 
पीपीई किट परिधान केला की खाता येत नाही, पाणी पिऊ शकत नाही. नैसर्गिक विधींना जाऊ शकत नाही, कुणाची काही मदत घेऊ शकत नाहीत.
 
तुम्ही विचार करा, तुम्हाला काही महिने असा किट घालून काम करायला सांगितलं तर? तुमची अवस्था काय होईल?
 
पीपीई किट घालण्याची भीती
इन्स्टाग्राम अकाऊंटवर डॉ. बक्षी यांनी फोटोच्या खाली लिहिलं की, "पीपीई किट घातल्यानंतर अर्ध्या तासात घामाने भिजायला होतं. कारण तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत पॅक असता.
 
एका वॉर्डातून दुसऱ्या वॉर्डात जाणारे डॉक्टर, नर्स, वॉर्ड हेल्पर्स, लॅब असिस्टंट, रेडियॉलॉजी स्टाफ, सफाई कर्मचारी आणि अन्य लोकांसाठी समस्या आणखीही आहेत.
 
पीपीई किट घालून शंभर मीटर चाललं तर धाप लागते. दोन मजले चढून गेलं तर श्वास घेणं अवघड होतं".
डॉ. बक्षी लिहितात, "पीपीई किट घालून जेव्हा माणूस पंख्यासमोर बसतो तेव्हा पंख्याचा मोठा आवाज होतो. पण त्याची हवा आमच्यापर्यंत पोहोचत नाही. बाहेर जोरदार वारा वाहत असला तरी आम्हाला ते कळत नाही. अशा परिस्थितीत काम केल्याने मानसिक परिणामही होतो."
 
गेल्या वर्षभरापासून जास्त काळ लाखो डॉक्टर, मेडिकल स्टाफ आव्हानात्मक परिस्थितीत कोरोना संकटाशी दोन हात करत आहेत.
 
मुंबईत रेसिडेंट डॉक्टर असणाऱ्या भाग्यलक्ष्मी सांगतात, "कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेमुळे आयुष्यात पहिल्यांदा कितीतरी माणसांना नकार द्यावा लागत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडच्या शोधात रुग्णांचे नातेवाईक फिरत आहेत. मात्र अशा कठीण परिस्थितीतही आम्हाला नाही सांगावं लागतं, कारण सगळे बेड्स भरलेले आहेत. हे अतिशय निराश करणारं आहे."
 
डॉक्टरांचे मृत्यू
अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना संकटाने आतापर्यंत देशात 1.87 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्राध्यापक डॉ. जे. ए. जयालाल यांच्या मते, आतापर्यंत 780 डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
कोरोनामुळे नर्स, वैदयकीय क्षेत्रात कार्यरत किती लोकांचा मृत्यू झाला आहे याची गणतीच नाही.
गेल्या तेरा महिन्यांपासून वैद्यकीय क्षेत्राशी निगडित मंडळींच्या घरच्या अडचणी, कामाचा वाढता दबाव, आजूबाजूला सातत्याने होणारे मृत्यू, भीती हे सगळं असूनही डॉक्टर मंडळी काम करत आहेत.
 
डॉ. भाग्यलक्ष्मी सांगतात, "आम्ही प्रदीर्घ काळ तणावपूर्ण वातावरणात काम करत आहोत. आम्ही हताश झालो आहोत."
 
डॉ. भाग्यलक्ष्मी यांना अनेकदा 10 तास पीपीई किट लागून काम करावं लागलं आहे.
 
निराशाजनक वातावरण
काश्मीरमधल्या बारामुल्ला इथे लहान मुलांचे डॉक्टर असलेले सुहैल नायक यांच्या मते अशा वातावरणात काम करणं खूप कठीण आहे. जेव्हा तुमच्यावर इतकं मानसिक दडपण असतं, सगळीकडे चहूबाजूला कोरोना आणि फक्त कोरोना आहे, लोक श्वास घेऊ शकत नाहीयेत अशी परिस्थिती आहे.
 
मुंबईत रेसिडेंट डॉक्टर म्हणून कार्यरत रोहित जोशी यांच्या मते सातत्याने अशा वातावरणात काम करणं निराशाजनक असतं. कधी कधी वाटतं इतकं काम करावं का? सोडून द्यावं.
 
वरिष्ठ डॉक्टर आणि कंसल्टंट्सच्या तुलनेत रेसिडेंट डॉक्टर 24 तास ऑन ड्युटी असतात.
 
अनेक दिवस दहा दहा तास पीपीई किट परिधान करून कोव्हिड रुग्णांच्या वॉर्डात काम करणं, इच्छा असूनही लोकांची मदत करू न शकणं, रात्री कोणत्याही वेळी ड्युटीसाठी बोलावणं येणं, झोप पूर्ण न होणं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरण, तब्येत ठीक नसताना काम करणं, आजूबाजूला होणारे मृत्यू, आक्रोश करणारे, धाय मोकलून रडणारे नातेवाईक-अशा वातावरणात काम करणं कोणालाही दमवून टाकू शकतं.
 
डॉ. रोहित जोशी सांगतात, "रुग्णांची संख्या प्रचंड आहे, डॉक्टरांची संख्या कमी आहे. आम्हाला वेगवान काम करावं लागतं. एका रुग्णाला पंधरा ते वीस मिनिटांच्या वर वेळ देता येऊ शकत नाही.
 
फक्त कोव्हिड रुग्णांची संख्या वाढतेय असं नाही. कोव्हिड निगेटिव्ह झालेल्या लोकांना नॉन-कोव्हिड वॉर्डात पाठवलं जातं. तिथेही रुग्णांची संख्या वाढते आहे".
 
हे सगळं कधीपर्यंत?
कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, हॉस्पिटल बेड्स, औषधं, इंजेक्शन्स या सगळ्याचा तुटवडा जाणवतो आहे. डॉक्टरांचा सवाल आहे की हे सगळं कधीपर्यंत चालणार?
 
बिहारमधल्या भागलपूर इथे आपल्या कुटुंबीयांपासून दूर काम करणाऱ्या एका महिला आरोग्यसेविकेने सांगितलं की हे असंच सुरू राहिलं तर आम्ही कुटुंबीयांपासून आणखी दूर राहू शकणार नाही.
 
नागरिकांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत लोकांसाठी थाळ्या आणि टाळ्या वाजवल्या. डॉक्टर आणि वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत मंडळी हेच आवाहन करत आहेत की मास्क परिधान करा, अंतर पाळा आणि सतत हात धुवा.
 
जम्मूत स्त्रीरोग विशेषज्ञ म्हणून कार्यरत अमनदीप कौर सांगतात, आम्ही आमचा जीव धोक्यात घालून काम करत होते. आता आम्ही आमच्या कुटुंबीयांचा जीवही पणाला लावला आहे.
 
जम्मूतल्या गांधीनगरमधील सरकारी रुग्णालयात कार्यरत अमनदीप यांच्या आईवडिलांचं वय साठच्या पुढे आहे. त्यांच्या आईला डायबेटिसचा त्रास आहे. त्यामुळे त्यांनी आईला भेटणं बंद केलं आहे.
 
ऑगस्ट महिन्यात कोव्हिडचा संसर्ग झालेल्या महिलेच्या सर्जरीवेळी अमनदीप यांनाही कोरोना झाला होता.
 
डॉ. अमनदीप सांगतात, "ऑगस्ट महिन्यात दहा कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांचं सिझेरियन शस्त्रक्रिया केली. त्यांची मुलं निगेटिव्ह होती. तेव्हा मला विश्वास वाटला की देव आमच्याबरोबर आहे".
 
कोव्हिड पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करणारं जम्मूतलं ते एकमेव रुग्णालय होतं.
 
प्रत्येक शस्त्रक्रियेनंतर त्या आंघोळ करत आणि मग पुढच्या कामाला लागत.
पूँछ, राजौरी, किश्तवाड, डोडा इथून लोक त्यांच्या रुग्णालयात येत. अमनदीप रोज दोन ते तीन सर्जरी करत असत.
 
लॉकडाऊन काळात गाडी चालवत त्या सर्जरी करण्यासाठी रुग्णालयात जात असत. त्यावेळचं वातावरण, कामाचा दबाव, कामानंतर सगळ्यांपासून अंतर राखणं या सगळ्याचा त्यांच्या छोट्या मुलावरही परिणाम झाला. अमनदीप यांना त्याच्या शिक्षकांशी चर्चा करावी लागली.
 
पीपीई किट घालून सर्जरी करताना त्यांना चक्करही आली आहे. अशावेळी त्या थोडा वेळ बसून राहत आणि मग पुन्हा कामाला लागत असे असं त्यांनी सांगितलं.
 
पीपीई घालूनही धोका टळत नाही
पीपीई किट घातल्यानंतर घामाची आंघोळ होते. शरीरातून मीठ आणि पाणी बाहेर पडतं. अशा परिस्थितीत तुम्ही मास्क काढू शकत नाही.
 
पीपीई किट घातलं म्हणजे धोका नाही असं नाही. अमनदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना झाला आहे.
 
कोव्हिड वॉर्डात डॉक्टर आणि त्यांचे सहकारी प्रचंड व्हायरल लोड असणाऱ्या वातावरणात काम करत असतात.
खोकला आणि शिंक याच्या माध्यमातून व्हायरस एअर ड्रॉपलेट्समध्ये जमा होतो आणि पीपीई किटवरही जाऊन बसतो.
 
मास्कच्या बाह्य भागावर कोरोना विषाणू असू शकतो.
 
पीपीई किट काढण्याची एक पद्धत असते. गाऊन, गॉगल यांना विशिष्ट क्रमाने काढावं लागतं. कारण पीपीई किट काढताना एअरोसोल्स आणि पार्टिकल्स त्याच खोलीत राहतात.
 
डॉ. अमनदीप यांचे पती डॉ. संदीप डोगरा यांच्या मते कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट घालूनही डॉक्टरांना कोरोना झाला कारण, वॉर्डमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काही होणार नाही. तुम्ही खोलीत मास्क काढायला नको. ही गोष्ट तेव्हा माहिती नव्हती. आता हळूहळू लक्षात येऊ लागली आहे.
 
कुटुंबीयांची चिंता
ज्या भीषण वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरतो आहे ते लक्षात घेऊन डॉक्टरांना ही भीती आहे की आपल्या कुटुंबीयांना याचा त्रास होऊ नये.
 
मोतीहारीचे सर्जन डॉ. आशुतोष शरण सांगतात, "ओपीडीतून आल्यानंतर गाऊन, ग्लोव्ह्ज सगळं काढून टाकतात. स्वत:ला सॅनिटाईज करतो. घरी गेल्यावर गरम पाण्याने आंघोळ करतो. नंतरच घरच्यांना भेटतो".
डॉ. शरण यांचं स्वत:चं नर्सिंग होम आहे. त्यांना लस मिळाली आहे. मात्र आपले नात-नातू, स्टाफ यांना कोरोना होऊ नये फार काळजी घेतात.
 
65 वर्षीय शरण यांचा दिवस सकाळी नऊला सुरू होतो तो संपायला रात्रीचे दहा वाजतात.
 
गेल्या 13-14 महिन्यात केवळ एकदा नातीच्या वाढदिवसासाठी ते सिलीगुडीला गेले होते. हे शक्य होऊ शकलं कारण डिसेंबर, जानेवारीत कोरोना रुग्णांचं प्रमाण कमी झालं होतं.
 
मुंबईच्या डॉ. जोशी यांना असं वाटतं की, "अनेक लोकांना डॉक्टरांना कोणत्या परिस्थितीत काम करावं लागत आहे याची कल्पना नाही. त्यांच्या मते, डॉक्टरांनी रेमडिसीवर इंजेक्शन लिहून दिलं म्हणजे पैशाचा विषय आहे. किंवा हा कोव्हिड हॉस्पिटलचा पैसे उकळण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा मी अशा गोष्टी ऐकतो तेव्हा मी काहीच बोलत नाही. मी लोकांना बदलू शकत नाही. पण आमचा हुरूप वाढवणारे लोकही खूप आहेत. त्यांच्यामुळेच आम्हाला धैर्य आणि काम करण्यासाठी बळ मिळतं".