शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 सप्टेंबर 2020 (14:47 IST)

कोरोना व्हायरस: भारतात लॉकडॉऊन अपयशी ठरलं का ?

दीपाली जगताप
भारतात गेल्या पाच दिवसांपासून दररोज कोरोनाचे 75 हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. सध्या इतर कोणत्याही देशात एवढ्या मोठ्या संख्येने कोरोनाची लागण झालेले रूग्ण नाहीत. दैनंदिन रुग्ण वाढीची संख्या भारतात सर्वाधिक आहे.
 
कोरोना विषाणूचा सर्वाधिक संसर्ग अमेरिका आणि नंतर ब्रिझीलमध्ये झालेला दिसून येतो. कोरोना संसर्गाच्या एकूण रुग्णांच्या बाबतीत भारताचा तिसरा क्रमांक लागतो. पण दर 24 तासांत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत भारत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.
 
भारतात कोरोनाचे रुग्ण ज्या वेगाने वाढत आहेत, ते पाहता संसर्गाच्या बाबतीतही येत्या काही दिवसांत भारत पहिल्या स्थानावर पोहोचण्याची दाट शक्यता आहे.
 
लॉकडॉऊनचे नियम शिथिल केल्यानंतर कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. केंद्र सरकारने 1 जूनपासून लॉकडॉऊन शिथिल करण्यास सुरूवात केली. ज्याला अनलॉक-1 असे संबोधण्यात आले.
 
अनलॉक-1 नंतर आर्थिक व्यवहार होऊ लागले. पण त्यासोबतच कोरोनाच्या रुग्णसंख्येतही वाढ झाली. त्यामुळे लॉकडॉऊनमुळे कोरोना विषाणूच्या संसर्गावर मिळवलेले नियंत्रण अनलॉक-1 मुळे आटोक्याबाहेर गेले का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला.
 
25 मार्च रोजी लागू झालेले लॉकडॉऊन 21 दिवसांनंतर शिथिल करण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोकांचे जीव वाचवणे किंवा सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था टिकवणे अशी दोन आव्हानं होती.
 
केंद्र सरकारने लॉकडॉऊन वाढवण्याचा निर्णय घेतला. लॉकडॉऊनचा कालावधी 14 एप्रिलवरुन 3 मेपर्यंत करण्यात आला. पुढेही मुदत वाढत गेली आणि अखेर 1 जूनपासून अनलॉक सुरू झाले.
 
अनलॉकचे तीन टप्पे पार केल्यानंतर भारतात अनलॉक-4 सुरू झाले आहे. पण कोरोना रुग्णांची रेकॉर्डब्रेक संख्या समोर येते आहे.
 
भारतात लॉकडॉऊन अयशस्वी झाला आहे का?
 
पब्लिक हेल्थ फॉऊंडेशन ऑफ इंडियाचे डॉ. गिरीधर आर बाबू यांच्यानुसार लॉकडॉऊन अयशस्वी ठरला असे म्हणता येणार नाही.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितले, "कोरोना संसर्गाचा वेग कमी व्हावा आणि आवश्यक पूर्व तयारी करता यावी हा लॉकडॉऊनचा उद्देश्य होता. ही दोन्ही उद्दिष्टे आता पूर्ण झाली आहेत. लॉकडॉऊनमुळे कोरोनाचा विषाणू नष्ट होईल असे नव्हते. लस येणार नाही तोपर्यंत कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळणार."
 
काही प्रमाणात स्थानिक प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे लॉकडॉऊन अयशस्वी ठरला असं डॉ. गिरिधर यांना वाटते. मुंबई आणि दिल्लीत लॉकडॉऊन काळातही रुग्णसंख्या वाढत होती.
 
पण जेएनयू येथील सेंटर ऑफ सोशल मेडिसिन अॅण्ड कम्युनिटी हेल्थचे अध्यक्ष डॉ. संघमित्रा आचार्य यांना लॉकडॉऊन यशस्वी झाला असे वाटत नाही. लॉकडॉऊन पूर्णपणे अयशस्वी ठरला असं त्या सांगतात.
 
बीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, "सुरुवातीला कडक लॉकडॉऊनची आवश्यकता नव्हती. टप्याटप्प्याने लॉकडॉऊन करणं गरजेचे होते. केवळ हॉटस्पॉट परिसरात कडक निर्बंध लावणे अपेक्षित होते. पूर्ण देशात एकाच वेळी लॉकडॉऊन लागू करण्यात आल्याची ही पहिलीच घटना होती.
 
"यापूर्वी साथीच्या आरोग्य संकटात असे कधीही झाले नव्हते. आता जेव्हा संसर्ग वाढतोय तेव्हा अनलॉक करण्याव्यतिरिक्त कोणताही पर्याय नाही. लोकांचा जीव वाचवायचा आहे असे सुरुवातीला सांगितले गेले. त्यानंतर लोकांच्या उपजीविकेचा विचार करायचा आहे असे सांगण्यात आले."
 
या मताशी डॉ. गिरीधर आर बाबू सहमत नाहीत. ते सांगतात, "बोलण्यासाठी हे सोपे आहे पण भारतात ज्यावेळी लॉकडॉऊन लागू केला गेला तेव्हा अमेरिका आणि ब्राझीलमध्ये लॉकडॉऊन नव्हता. या दोन्ही देशांशी तुलना केली तर भरतात मृत्यू झालेल्यांची संख्या कमी आहे. मृत्यूदरही कमी आहे."
 
ते पुढे म्हणतात, "वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे पाहिले तर ज्या देशांमध्ये देशव्यापी लॉकडॉऊन लागू झाले अशा देशांमध्ये मृत्यू आणि रुग्णांची संख्या कमी आहे. अनेक देशांच्या बाबतीत हे आढळून येते."
 
कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर झालेले मृत्यू आणि त्याच्या आकडेवारीबाबत डॉ. संघमित्रा आचार्य यांचे मत वेगळे आहे.
 
त्या सांगतात, " सुरुवातीला सरकारने कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आकडेवारी पाहून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. कोरोनाचा संसर्ग अधिक असून मृत्यूदर कमी आहे हा अनुभव सुरुवातीपासून येत आहे. तीन टक्क्यांपेक्षा अधिक मृत्यूदर कधीही वाढला नाही. आता संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या मोठी दाखवण्यात येते आणि मृत्यू दर कमी असून रिकव्हरी दर अधिक असल्याचे सांगितले जाते. खरं तर ही परिस्थिती पहिल्यापासून अशीच आहे."
 
हा ट्रेंड पहिल्यापासून असाच सांगितला गेला असता तर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले नसते असं त्या सांगतात. यामुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडले नसते.
 
त्या पुढे म्हणतात, "सरकारने कशा पद्धतीने आपले प्रधान्य बदलले हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कोरोनाच्या संसर्गाची भीती निर्माण केल्यानंतर जेव्हा कोलमडलेली अर्थव्यवस्था उभारण्याची वेळ आली तेव्हा सरकार मृत्यूदर कमी असल्याचे सांगत आहे. सुरुवातीपासूनच सरकारने याबाबत बोलायला हवे होते. शिवाय, अर्थव्यवस्थेला उभारी मिळतेय असंही नाही."
 
केंद्र सरकारच्या सांख्यिकी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एप्रिल ते जून या कालावधीत विकास दरात 23.9 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली आहे.
 
कोरोना आरोग्य संकट आणि लॉकडॉऊनमुळे पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर 18 टक्क्यांनी कमी होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.
 
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंदाजानुसार हा दर 16.5 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, पण ताजी आकडेवारी धक्कादायक आहे.
भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात
भारतात कोरोना विषाणूचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 2 सप्टेंबरपर्यंत 8 लाख 25 हजार 739 इतकी रुग्णसंख्या आहे. तर दरदिवशी साधारण 15 - 16 हजार इतकी रुग्णांची वाढ होत आहे. तर महाराष्ट्रात मृत्यूदर हा 3.08 टक्के इतका आहे.
 
महाराष्ट्रातही नुकतीच अनलॉक 4 बाबत नियमावली जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक असली तरी लोकांचे बरे होण्याचे प्रमाण आणि मृत्यू दर कमी आहे असे राज्य सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे.
 
राज्यांतर्गत प्रवास आता सुरू झाला आहे. एसटी आणि रेल्वेतून राज्यांतर्गत प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. काही निर्बंधांसहित दुकानं आणि बाजारपेठा उघडण्यात आल्या आहेत.
 
पण महाराष्ट्र सरकार लॉकडॉऊनमध्ये राज्याचा कारभार यशस्वीरीत्या चालवत नसल्याचा आरोप विरोधी पक्षाकडून करण्यात येत आहे.
लॉकडॉऊनच्या काळात राज्य सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला. यासाठी मनसकडून लोकांचा सर्वेही करण्यात आला.
 
सामान्य जनतेसमोर आर्थिक संकट असून लॉकडॉऊन पूर्णपणे उघडा अशी मागणीही विविध पक्षांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांकडून लॉकडॉऊन उघडण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, "कोरोनाची भीती दाखवून सरकारने लॉकडॉऊन लागू केले आहे. सरकार जनतेची फसवणूक करत आहे."
 
तर मुख्यमंत्री घरातून कामकाज करत असून मंत्रालयातही येत नाहीत असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.