1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 10 मे 2021 (14:34 IST)

कोरोना : भारतातलं वाढतं संकट संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा का आहे?

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतावर अभूतपूर्व संकट ओढावलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतात एका दिवसात चार लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळत आहेत.
 
या साथीमुळे गेल्या सात दिवसांपासून रोज सरासरी 3700 हून जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजाराच्या या विषाणूमुळे देशात आजवर 21 लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे, तर 38 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
मात्र, संसर्गाची लागण आणि मृत्यू याची सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अनेक पैलू आहेत.
 
एक म्हणजे डेटा अचूकपणे नोंदवला गेला नाही आणि सरकारने वास्तवाकडे डोळेझाक करत जी आकडेवारी देण्यात आली तिचा सहर्ष स्वीकार केला. दुसरं म्हणजे कोरोना विषाणूचा नवा व्हेरियंट अपेक्षेपेक्षा जास्त घातक निघाला.
 
तिसरं म्हणजे देशात निवडणुकीचं वातावरण होतं, कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं आणि हे सगळं कोव्हिड प्रोटोकॉलला तिलांजली देऊन करण्यात आलं. त्यामुळे देशासमोर आज एक मोठं मानवी संकट उभं ठाकलं आहे.
 
भारताची लोकसंख्या 140 कोटींच्या घरात आहे. याचाच अर्थ जगातली प्रत्येक सहावी व्यक्ती भारतीय आहे. लेखात पुढे आपण अशा काही बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करू ज्यामुळे जागतिक अर्थव्यवस्था भारताच्या संकटापासून अलिप्त राहू शकत नाही.
 
1. भारतातने वाया घालवलेलं एक वर्ष
भारत जगातली पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. जगाच्या आर्थिक विकासात भारताचं योगदान मोठं आहे. देशाचा आर्थिक विकास 4 ते 8 टक्क्यांच्या दरम्यान असतो. भारत जगासाठी एक मोठी बाजारपेठ आहे.
 
2020 सालच्या सुरुवातीला जागतिक नाणेनिधीने (IMF) भारताविषयी एक निरीक्षण नोंदवलं होतं. त्यावरून जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं किती महत्त्व आहे, हे स्पष्ट होतं. भारताकडून अपेक्षित योगदान झालं नाही आणि म्हणूनच 2018-2019 साली वैश्विक आर्थिक विकास काहीसा मंदावलेला दिसला, असं जागतिक नाणेनिधीने म्हटलं होतं.
 
जागतिक नाणेनिधीने भारताच्या 2020 सालासाठी विकासदराचा अंदाज कमी करत यावर्षी तो 5.8 टक्क्यांचा आसपास राहील, असा अंदाज वर्तवला होता. खरंतर आयएमएफला भारताकडून यापेक्षा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती.
आता असं दिसतंय की 2020 सालासाठी जागतिक विकास दर घसरून 4 टक्क्यांवर आला. भारताच्या विकास दरातही जवळपास 10 टक्क्यांची घट झाली.
 
2021 साली भारत आणि पर्यायाने जगाची अर्थव्यवस्था पुन्हा आपल्या पायावर उभी होईल, अशी आशा वाटत होती. मात्र, सध्या ही आशाही मावळताना दिसतेय.
 
उदाहरणार्थ 'नोमुरा' या गुंतवणूकविषयक संस्थेच्या चीफ इकॉनॉमिस्ट सोनल वर्मा यांनी भारताचं सकल राष्ट्रीय उत्पादन या तिमाहीत 1.5 टक्क्याने कमी होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.
 
ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थादेखील भारताप्रमाणेच संकाटाचा सामना करत आहेत. त्यामुळे जगाच्या विकासावरही त्याचा परिणाम होईल, असा अंदाज आहे.
 
2. आंतरराष्ट्रीय निर्बंध
भारतात ज्या प्रमाणावर ही साथ पसरली आहे त्यावरून आंतरराष्ट्रीय निर्बंध यापुढे आणखी दीर्घकाळ लागू राहतील, अशी शक्यता आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांच्या शब्दात सांगायचं तर, "कोरोना विषाणू आंतरराष्ट्रीय सीमा, नागरिकत्व, वय, लिंग किंवा धर्माच्या आधारावर भेदाभेद करत नाही."
 
मात्र, भारतासारख्या विशाल देशाला जगापासून खरंच आयसोलेट करता येऊ शकतं का, असा सवाल तज्ज्ञ उपस्थित करतात.
नुकतेच नवी दिल्लीहून हॉन्गकॉन्गला रवाना झालेल्या फ्लाईटमधले 52 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले. कोरोनाचा भारतीय व्हेरियंट याआधीच ब्रिटनला पोहोचला आहे. मात्र, भारतात खासकरून पंजाबमध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेसाठी ब्रिटनमधला व्हेरियंट जबाबदार असल्याचं सांगण्यात आलं.
 
भारतातून हा आजार इतर देशात पसरू नये, यासाठी सक्तीचं क्वारंटाईन आणि प्रवासावर कठोर निर्बंध घालण्याची गरज आहे. विमान वाहतूक, विमानतळ आणि या क्षेत्राशी संबंधित व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या लोकांसाठी ही वाईट बातमी आहे आणि म्हणूनच जागतिक आर्थिक विकासावर याचा मोठा विपरित परिणाम होणार आहे.
 
3. फार्मा कंपन्यांच्या अडचणी
आकारमानाचा विचार केला तर भारतातील फार्मा उद्योगचा जगात तिसरा क्रमांक लागतो. आर्थिकदृष्ट्या भारतीय फार्मा उद्योगाचा अकरावा क्रमांक लागतो. जगात जेवढी औषध निर्यात होतात त्यात भारताचा वाटा 3.5% आहे.
 
जगात निर्यात होणाऱ्या जेनरिक औषधांमध्ये भारताचा वाटा 20% आहे. भारतातून निर्यात होणाऱ्या औषधांबाबत कुठल्याही प्रकारचा संशय निर्माण झाल्यास जगभरातील आरोग्य सेवांना त्याचे परिणाम भोगावे लागतील.
 
आजघडीला जगातील 70% लसीचं उत्पादन भारतात होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या 'कोव्हॅक्स' कार्यक्रमांतर्गत भारतातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाला 64 गरीब राष्ट्रांसाठी अॅस्ट्राझेनकाच्या लसीच्या उत्पादनाचा अधिकार देण्यात आला आहे.
त्यासोबतच सिरम इन्स्टिट्युटला ब्रिटनसाठी 50 लाख डोस उत्पादन करायचं आहे. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेनंतर देशातून होणारी लस निर्यात थांबवण्यात आली आहे किंवा ती रद्द करण्यात आली आहे.
 
जागतिक साथीच्या नव्या लाटेचा सामना करणाऱ्या देशांसाठी ही वाईट बातमी आहे. यामुळे त्या देशांमध्ये आयुष्य पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. दुसरीकडे भारताने लस निर्यात केली नाही तर त्याचे साईड इफेक्ट होतील.
 
जगातील वेगवेगळ्या भागात वारंवार लॉकडाऊन लागेल. सोशल डिस्टंसिंगचे प्रोटोकॉल वाढतील. परिणामी जगभरातील देशांतले आर्थिक व्यवहार मंदावतील.
 
4. कोणत्या सेवांना फटका बसेल?
भारत पश्चिम युरोप आणि अमेरिकेत अनेक कामांसाठी 'सपोर्ट स्टाफ' पुरवतो. विशेषतः आर्थिक आणि आरोग्य क्षेत्रात. भारतात आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे या सेवा अबाधितपणे सुरू ठेवता येणार नाही.
 
उदाहरणार्थ- ही परिस्थिती बघता अमेरिकेची व्यावसायिक संघटना असलेल्या यूएस चेंबर ऑफ कॉमर्सने भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेच्या पायात बेड्या घालू शकते, अशी चिंता व्यक्त केली आहे.
 
दुसरं उदाहरण ब्रिटनचं आहे. ब्रेक्झिटनंतर ब्रिटनसाठी भारताबरोबर व्यापारी संबंध अत्यंत महत्त्वाचे बनलेत. 2021 साली ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दोन वेळा भारत दौरा आखला होता, मात्र परिस्थितीमुळे दोन्ही वेळा दौरे रद्द करावे लागले. यावरूनच व्यापारिकदृष्ट्या ब्रिटनसाठी भारत किती महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं.
या सर्व अडचणी बघता भारताला मदत करण्यासाठी लवकरात लवकर पावलं उचलणं, जगासाठी महत्त्वाचं आणि गरजेचं आहे.
 
अशी मदत करण्यास सुरुवातीला विलंब झाला खरा. आता मात्र जगभरातून भारतासाठी मदत पाठवली जात आहे. ब्रिटनने व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजन कॉन्संट्रेटर पाठवले आहेत. अमेरिकेने औषधं आणि लसीसाठीचा कच्चा माल, रॅपिड टेस्ट किट आणि व्हेंटिलेटर्स पाठवले आहेत.
 
जर्मनीनेही वैद्यकीय मदत आणि ऑक्सिजन पाठवले आहेत. मात्र, भारतासाठी जे काही पाठवलं जात आहे ते भारताची गरज बघता समुद्रातल्या एका थेंबाएवढं आहे. असं असलं तरी या मदतीमुळे जगाला भारताची काळजी आहे, हे दिसतं.
 
कोरोना संकट हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरलं असलं तरी याचा जगावर होणारा परिणाम लक्षात न येणं त्याकडे दुर्लक्ष करण्यासारखंच आहे.
 
जगातले मोठे देश भारताला मदत करण्यात अपयशी ठरले तर लवकरच भारताचं संकट जागतिक संकट बनू शकतं आणि असं केवळ आरोग्य क्षेत्रात नाही तर अर्थव्यवस्थेच्या आघाडीवरही संकटाचे काळे ढग जमा होऊ लागले आहेत.