1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (15:14 IST)

कोरोनाचा आंध्र प्रदेश व्हेरियंट 1 हजार पटींनी अधिक संसर्गजन्य आहे?

कोरोनाच्या युके व्हेरियंट, आफ्रिका व्हेरियंट, ब्राझील व्हेरियंट यांच्यानंतर देशात आता आंध्र प्रदेश व्हेरियंटची चर्चा सुरू झाली आहे.
 
कोरोनाचा हा नवा व्हेरियंट आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये निर्माण झाला. त्यानंतर विशाखापट्टणम येथे तो अत्यंत वेगाने पसरत चालल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आंध्र प्रदेश व्हेरियंट या शब्दाने दहशत माजवल्याचं दिसून येत आहे.
 
राजकीय क्षेत्रातही याने खळबळ माजली आहे. या चर्चांना सुरुवात होताच दिल्ली सरकारने आंध्र प्रदेश आणि तेलंगणातून येणाऱ्या लोकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. पण आंध्र प्रदेशचा हा व्हायरस इतका धोकादायक आहे का? तज्ज्ञांचं याबाबत काय मत आहे?
 
व्हेरियंट म्हणजे काय?
कोणत्याही विषाणूने मानवी शरिरात प्रवेश केल्यानंतर तो आपली संख्या वाढवण्यास सुरू करतो. त्याला 'रेप्लिकेट' करणे असं संबोधलं जातं. एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करताना तो आपली संख्या वाढवतच असतो. या प्रक्रियेत व्हायरस स्वतःच्या स्वरुपात थोडाफार बदलही करतो. यालाच 'म्युटेशन' असं म्हणतात.
2 ते 3 महिन्यांच्या अंतराने हे म्युटेशन व्हेरियंटमध्ये रुपांतरित होऊ शकतात. विषाणूने म्युटेट करताच त्याची लागण झाल्यानंतर जाणवणाऱ्या लक्षणांमध्येही बदल होऊ शकतो. आजारपणाची लक्षणं, विषाणूच्या संसर्गाचा वेग तसंच लागण झाल्यानंतर दिसून येणारे परिणाम या सर्वच गोष्टींत हे बदल दिसू शकतात.
 
उदाहरणार्थ, कोरोना व्हायरस निर्माण झाल्यापासून त्याच्यात शेकडो किंवा हजारो बदल झाले, पण त्यापैकी काहीच म्यूटेशनचं व्हेरियंट बनलं. पण सध्या हे सगले व्हेरियंट आपल्या बातमीचा विषय नाहीत. त्यापैकी फक्त काही व्हेरियंटच वेगाने पसरत चालले आहेत.
"जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार सध्या जगभरात कोरोनाचे शेकडो व्हेरियंट आहेत. पण त्यातील तीनच व्हेरियंट धोकादायक मानले जात आहेत. युके, आफ्रिका आणि ब्राझील व्हेरियंटचा त्यामध्ये समावेश आहे. त्याशिवाय आणखी 7 व्हेरियंटचीही ओळख पटवण्यात आली आहे. त्यामध्येच 'महाराष्ट्र व्हेरियंट'चाही समावेश आहे," अशी माहिती डॉ. मदाला किरण यांनी दिली. डॉ. मदाला हे निझामाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहेत.
 
कोरोना व्हायरसच्या युके व्हेरियंटमध्ये आतापर्यंत 23 म्युटेशन झालेले आहेत, तर महाराष्ट्र व्हेरियंटमध्ये 15 म्युटेशन झाले आहेत.
 
भारतात कोणकोणते व्हेरियंट अस्तित्वात?
सध्या भारतात विविध प्रकारच्या व्हेरियंट्सचा प्रसार होत असल्याचं पाहायला मिळतं. भारतातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्यामागे हे व्हेरियंट्स कारणीभूत आहेत. पण यातील काही व्हेरियंट्स कमी प्रमाणात अस्तित्वात आहेत.
 
महाराष्टात 'डबल-म्यूटंट' नावाचा व्हेरियंट अस्तित्वात आहे. राज्यातील 50 ते 60 टक्के रुग्णांमध्ये हाच व्हेरियंट आढळून येतो. हा 'डबल-म्यूटंट' काही प्रमाणात गंभीर मानला जात आहे. युकेमधील व्हेरियंट सध्या पंजाबमध्ये उपस्थित आहे.
 
"सध्या महाराष्ट्र व्हेरियंटच आंध्र प्रदेश, तेलंगण आणि कर्नाटकात पसरत आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील 20 टक्के रुग्णांमध्ये हाच व्हेरियंट आढळून येत आहे. त्यामुळे इतर व्हेरियंट नाहीसे होऊन सर्वांना फक्त याच व्हेरियंटचा संसर्ग सर्वांना होईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते," अशी माहिती CCMB संस्थेचे माजी संचालक राकेश मिश्रा यांनी दिली.
 
हजारो म्युटेशन येतात आणि जातात. पण ते इतके पसरत नाहीत. मात्र आपण त्यांचं निरीक्षण योग्य प्रकारे न केल्यास त्यांच्यामुळे रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ शकते, असं मिश्रा म्हणतात.
 
N440K 1 हजार पटींनी जास्त संसर्गजन्य आहे का?
या प्रश्नाचं उत्तर देताना राकेश मिश्रा सांगतात, "ही फक्त अफवा आहे. N440K ला आता इतकं महत्त्व उरलेलं नाही. काही महिन्यांपूर्वी ते अस्तित्वात आला आणि नाहीसाही झाला. सध्या दक्षिण भारतातील 5 टक्के रुग्णांमध्येही हा व्हेरियंट आढळून येत नाही. त्यामुळे तो 1 हजार पटींनी जास्त संसर्गजन्य आहे, असं म्हणणं चुकीचं आहे," असं मिश्रा म्हणाले.
 
त्याशिवाय कोरोना मृत्यूदर आणि या व्हेरियंटचाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत महाराष्टातील डबल म्यूटंट आणि युके व्हेरियंट यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहेत. परंतु, कोणत्याही विषाणूचा वेग लॅबमध्ये किंवा मानवी शरीरात किती आहे, हे सांगणं शक्य नसल्याचंही मिश्रा यांनी स्पष्ट केलं.
ते सांगतात, "विषाणू प्रयोगशाळेतील पेशींमध्ये झटपट वाढू शकतो. पण अशाच प्रकारे तो मानवी शरीरात वाढण्याची शक्यता नसते. कारण प्रयोगशाळेत त्याला रोखणारं कुणीच नसतं. पण मानवी शरिरातील रोगप्रतिकारशक्ती या व्हायरसला रोखण्याचा प्रयत्न सातत्याने करत असते."
 
मात्र, आंध्र प्रदेश व्हेरियंटबाबत चर्चा होऊ लागल्यामुळे राजकीय खळबळही माजली. आंध्र प्रदेश सरकारने समोर येऊन त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
 
"N440K व्हेरियंटमुळे घाबरून जाण्याची गरज नाही. हा व्हेरियंट गेल्या वर्षी जून-जुलै महिन्यात आढळून आला होता. फेब्रुवारी महिन्यापर्यंत त्याचा प्रसार होत होता. पण मार्च महिन्यात तो नाहीसा झाला आहे. काही राज्यांमध्ये तो आहे, पण त्याचा प्रसार अत्यंत कमी आहे," अशी माहिती आंध्र प्रदेशच्या कोव्हिड कमांड कंट्रोल सेंटरचे अध्यक्ष के. एस. जवाहर रेड्डी यांनी दिली.
 
"हा व्हेरियंट इतका धोकादायक असता तर जागतिक आरोग्य संघटनेने त्याची माहिती सर्वांना दिलीच असती. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) हा व्हेरियंट धोकादायक असल्याचं जाहीर केलं असतं. त्यामुळे आपल्याला त्याबाबत चिंताग्रस्त होण्याची गरज नाही," असं रेड्डी म्हणाले.
 
ग्लोबल इन्फुएन्झा सर्व्हिलन्स आणि रिस्पॉन्सिव्ह सिस्टीम इन्फॉर्मेशन यांची नोंद विविध संस्थांकडून ठेवली जात आहे. जगभरातील नामवंत शास्त्रज्ञांनीही N440K व्हेरियंट धोकादायक नसल्याचं याआधीच स्पष्ट केलं आहे.
 
डॉ. मदाला किरण सांगतात, "N440K व्हेरियंट कुर्नूलमधून देशभरात पसरत होता. पण ते गेल्यावर्षी. यावर्षी नाही."
 
महाराष्ट्र व्हेरियंट किती धोकादायक?
सध्या तेलंगण आणि आंध्रप्रदेश या दोन्ही तेलुगू राज्यांमध्ये कोरोनाचा महाराष्ट्र व्हेरियंट झपाट्याने पसरत आहे. त्याला 'डबल म्युटंट' नावाने ओळखलं जातं. यामध्ये L452R/E484Q अशा प्रकारचा म्यूटंट आढळून येतो. याची संसर्गक्षमता जास्त आहे.
महाराष्ट्राचे दोन्ही म्यूटंट शरीरातील ACE2 रिसेप्टरसोबत मजबूत साखळी तयार करत आहेत. त्यामुळेच या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनते, असं डॉ. किरण सांगतात.
 
दुसरीकडे विशाखापट्टणममधील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.
 
आंध्र मेडीकल कॉलेजचे प्राचार्य आणि उत्तर आंध्र प्रदेशात कोव्हिड साथ नियंत्रणासाठीचे नोडल ऑफिसर असलेले डॉ. सुधाकर सांगतात, "कोरोना व्हायरसचा इनक्यूबेशन काळ खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळतं. आधी तो 7 दिवस होता. पण सध्याच्या काळात तो फक्त 3 दिवस इतका झाला आहे. तरूणांवरही याचा प्रभाव जाणवतो. मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांचं प्रमाण 15 टक्क्यांवर गेलं आहे. त्यामुळेच याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पुढील दोन महिने हीच परिस्थिती दिसण्याची शक्यता आहे."
 
पण विशाखापट्टणममध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती महाराष्ट्र व्हेरियंटमुळे आहे की इतर कोणत्या कारणामुळे याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. GISAID ची माहिती पाहिल्यास महाराष्ट्र व्हेरियंटसह A2A नामक दुसरा एक व्हेरियंटसुद्धा विशाखापट्टणममध्ये अस्तित्वात आहे.
 
डॉ. किरण सांगतात, "आम्ही विशाखापट्टणममध्ये विषाणूचे 36 नमुने तपासले. त्यामध्ये 33 टक्के नमुन्यांमध्ये महाराष्ट्र व्हेरियंट आढळून आले. N440K हा व्हेरियंट 5 टक्के नमुन्यांमध्ये होता. तर A2A व्हेरियंट 62 टक्के नमुन्यांमध्ये आढळून आला. दक्षिण आफ्रिका, ब्राझील किंवा युके व्हेरियंट विशाखापट्टणममध्ये अस्तित्वात नाहीत."
 
नवे व्हेरियंट आपण रोखू शकतो का?
कोरोनाचे नवे व्हेरियंट्स येत असल्याने आपल्यासमोर नव्या समस्या निर्माण होत आहेत. पण व्हायरस म्युटेट होणारच नसेल आणि नवे व्हेरियंट पुढे येणारच नसतील तर? तसं झाल्यास आपल्यासमोर समस्याच निर्माण होणार नाहीत. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?
कोणतंही औषध किंवा लस विषाणूला म्युटेट होण्यापासून रोखू शकत नाही. आपण फक्त त्यांचा प्रसार होण्यापासून थांबवू शकतो, असं राकेश मिश्रा यांनी सांगितलं.
 
ते कसं शक्य आहे?
विषाणू एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आपल्या संरचनेत काही प्रमाणात बदल करतो. त्यामुळे विषाणू पहिल्या व्यक्तीच्या शरीरातच असताना तो रोखल्यास त्याच्यातील म्युटेशन थांबवलं जाऊ शकतं. यासाठी मास्क हा सर्वोत्तम उपाय आहे.
 
तुम्ही मास्क वापरल्यास कोणत्याही प्रकारचा व्हेरियंट असला तरी त्याचा प्रसार रोखला जाऊ शकेल, असं मिश्रा म्हणतात.
 
नव्या म्युटंटवर लस प्रभावी ठरेल का?
लस कोरोना व्हायरसच्या सगळ्या म्यूटंटवर तितकीच प्रभावी ठरते किंवा नाही, हे आताच ठामपणे सांगता येणार नाही. सध्यातरी भारतातील सर्वच प्रकारच्या व्हेरियंटवर लस योग्य प्रकारे काम करत असल्याचं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे.
 
अशा स्थितीत नव्या व्हेरियंटचं आगमन झाल्यास ते धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे नव्या व्हेरियंटची निर्मिती होऊ नये, यासाठी आपणच काळजी घेतली पाहिजे. नवा व्हेरियंट तयारच न झाल्यास विषाणूची संसर्गक्षमता कमी होत जाईल. त्यामुळे आपण मास्क वापरणं अत्यंत आवश्यक आहे, असं मिश्रा सांगतात.