सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 9 मे 2021 (10:15 IST)

कोरोना : भारतातली संसर्गाची दुसरी लाट ओसरतेय का?

श्रृती मेनन
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं. मात्र, अनेक भागांमध्ये दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येतोय.
 
संसर्ग कसा वाढत गेला?
भारतात कोव्हिड-19 चा संसर्ग मार्च महिन्याच्या मध्यापासून वाढत गेला आणि बघता बघता तो वेगाने पसरला. 30 एप्रिलपर्यंत कोव्हिड संसर्गात विक्रमी वाढ झालेली दिसली. देशात दिवसाला चार लाखांपर्यंत रुग्णांची नोंद होऊ लागली.
 
पुढे यात काहीशी घट झाली आणि 3 मे रोजी दिवसाला 3 लाख 60 हजार रुग्ण आढळले. त्यामुळे भारतात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेने उच्चांक गाठून आता ही लाट ओसरायला सुरुवात झाली, असं मानलं जाऊ लागलं.
मात्र गेल्या काही दिवसात रुग्णसंख्या पुन्हा वाढली. आठवड्यांची आकडेवारी बघितली तर सोमवारी आकडेवारीत घट होत असल्याचं दिसतं.
 
बुधवार, 5 मे रोजी देशात 4.12 लाख रुग्णांची नोंद झाली. सात दिवसांच्या संसर्ग दराची सरासरी बघितल्यास त्यातही वाढ दिसतेय.
 
चाचण्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ?
कोरोना विषाणू किती पसरला आहे याचा योग्य अंदाज बांधायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या करणं गरजेचं असतं.
 
देशात दररोज 2 कोटी चाचण्या होत आहेत. मात्र, या महिन्याच्या सुरुवातीला ही संख्या 15 लाखांपर्यंत घसरली.
मात्र, बुधवार, 5 मे रोजी यात पुन्हा सुधारणा झाली आणि त्या दिवशी पुन्हा एकदा 2 कोटी चाचण्या घेण्यात आल्या.
 
चाचण्या तात्पुरत्या कमी केल्यामुळेच मे महिन्याच्या सुरुवातीला रुग्णसंख्येत घट दिसली.
 
जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) सल्लागार आणि अर्थतज्ज्ञ डॉ. रिजो जॉन म्हणतात, "गेल्या वर्षीच्या पीकमध्येदेखील सप्टेंबर महिन्यात जवळपास हाच पॅटर्न दिसला होता."
 
"भारतात रोज जवळपास 1 लाख रुग्ण आढळू लागल्यावर चाचण्या कमी करण्यात आल्या होत्या."
 
5 मे 2021 पर्यंतची आकेडवारी
केंद्रीय प्रशासनाने देशातल्या काही राज्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत असल्याचं सांगितलं त्यावेळी महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा आणि राजधानी दिल्लीत चाचण्याचं प्रमाणही घसरलं होतं.
 
एप्रिल महिन्यात राजधानी दिल्लीत दररोज जवळपास 1 लाख चाचण्या व्हायच्या. त्यावेळी जवळपास 16 हजार रुग्ण आढळायचे.
 
मात्र, एप्रिलच्या शेवटी-शेवटी रुग्णसंख्या 55 टक्क्यांनी वाढली तेव्हा चाचण्या 20 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या. यावरून प्रत्यक्ष संसर्ग किती मोठ्या प्रमाणात पसरला असेल, याचा अंदाज येतो.
 
अशाच प्रकारचा ट्रेंड गुजरात आणि तेलंगणा राज्यांमध्येही दिसला.
 
चाचण्यांच्या क्षमतेवर प्रचंड दबाव असल्याचं स्पष्ट जाणवतं, असं डॉ. जॉन सांगतात. ते म्हणतात, आरोग्य केंद्रांवर मोठी गर्दी असल्याने अनेकांची चाचणीच होत नाही.
 
भारतात चाचण्यांचा दर 1000 लोकांमध्ये 1.3 इतका आहे, तर अमेरिकेत हा दर 3 आणि ब्रिटनमध्ये 15 आहे.
 
टेस्ट पॉझिटिव्हिटीचं प्रमाण
सलग दोन आठवडे पॉझिटिव्ह टेस्ट रेटमध्ये 5 टक्क्यांची घट दिसत नाही तोवर निर्बंधात सूट देऊ नये, असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.
 
अशोका विद्यापीठात भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक आणि मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करणारे गौतम मेनन म्हणतात, "देशात टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट अजूनही खूप जास्त आहे. आज तो जवळपास 20% आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरतेय, यावर विश्वास ठेवण्यात अर्थ नाही, असं मला वाटतं."
 
कोणत्या चाचण्या होत आहेत?
भारतात आरटी-पीसीआर आणि अँटीजेन अशा दोन प्रकारच्या चाचण्या होत आहेत. यापैकी आरटी-पीसीआर चाचणीला 'गोल्ड स्टँडर्ड' म्हटलं जातं.
 
मात्र, कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरियंट या चाचणीला हुलकावणी देतो आणि त्यामुळे कोरोनाची लागण होऊनही आणि रुग्णाला लक्षणं दिसत असूनही चाचणीचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह येत असल्याचंही आढळलं आहे.
दुसरीकडे काही राज्यांमध्ये आरोग्य प्रशासन अँटीजेन चाचण्यांवर भर देताना दिसतात. अँटीजेन चाचणीचा रिपोर्ट अवघ्या काही मिनिटात येतो. मात्र, ही चाचणी फारशी विश्वासार्ह नाही.
 
दिल्लीत एप्रिल महिन्यात जवळपास 35% अँटिजेन चाचण्या घेण्यात आल्या.
 
दरम्यान, देशात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी रॅपिड अँटिजेन चाचण्याही करायला हव्या, असा सल्ला इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चने (ICMR) दिला आहे.
 
'प्रयोगशाळांवरचा भार कमी करण्यासाठी' प्रवाशांसाठी बंधनकारक असणाऱ्या आरटी-पीसीआर चाचणीतही सूट देण्यात आली आहे.