शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (17:56 IST)

News Flash: महाराष्ट्रात भाडेकरांकडून 3 महिन्यांपर्यंत घरभाडे घेऊ शकणार नाही घरमालक

भारतामध्ये सध्या लॉक डाऊनचा दुसरा टप्पा लागू करण्यात आला आहे. लॉक डाऊनमुळे अख्खा देश ठप्प झाला असून हाताला रोजगार नसल्याने अनेकांना आर्थिक चिंतेने ग्रासले आहे. अशातच आज महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाने राज्यातील भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार  घरभाडे वसुली  किमान तीन महिने पुढे ढकलावी, घरभाडे भरले नाही म्हणून कुणालाही घराबाहेर काढू नये अशा सूचना राज्यातील घरमालकांना देण्यात आल्या आहेत.

अशी आहे गृहनिर्माण विभागाची सूचना
सध्या जगभरात पसरलेल्या covid-१९ साथीच्या रोगाच्या पार्श्वभुमीवर संपूर्ण देशात २३ मार्च, २०२० पासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले असून सदरचे लॉकडाऊन सद्य:स्थितीत दि.०३ मे, २०२० पर्यंत जारी राहणार आहे. या लॉकडाऊनमुळे सर्व बाजारपेठा, व्यावसायिक संस्था, कारखाने व एकूणच सर्व आर्थिक/व्यवसायिक गतिविधी बंद आहे. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झालेला असून अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद झालेले आहे. या अभूतपूर्व परिस्थितीमुळे सर्वसामान्य जनतेला covid-१९ साथीच्या रोगाच्या समस्येबरोबरच अत्यंत कठिण अशा आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे.

राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लक्षणीय असून वर नमूद आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरुना ते राहत असलेल्ल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे, ही वस्तुस्थिती आहे.

वर नमूद बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये घर भाडे वसुली किमान तीन महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रकमांची अदायगी न झाल्याने किंवा भाडे थकल्याने कोणत्याही भाडेकरुंना भाड्याच्या घरांमधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सूचना राज्यातील सर्व घर मालकांना देण्यात येत आहे.