शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (16:32 IST)

पॉझिटीव्ह न्यूज : दोन लाख पिंपरी-चिंचवडकरांची कोरोनावर यशस्वी मात

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के
पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असली तर कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण देखील वाढत आहे. आजपर्यंत शहरातील 2 लाख 26 हजार 72 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 2 लाख 633 नागरिकांनी कोरोनाला यशस्वीपणे हरविले. कोरोनामुक्तांचे प्रमाण 90 टक्के असून ही मोठी दिलासादायक बाब मानली जात आहे.
 
दरम्यान, पुणे विभागात पिंपरी-चिंचवडचा सर्वाधिक म्हणजेच 90 टक्के रिकव्हरी रेट असून ही बाब पॉझिटिव्ह असल्याचे महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च 2020 रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मार्च, एप्रिल, अर्धा मे महिना परिस्थितीवर महापालिका नियंत्रण ठेवू शकली. रुग्ण संख्या आटोक्यात राहिली. परंतु, मे महिन्याच्या मध्यानंतर शहरातील रुग्ण संख्या झपाट्याने वाढू लागली.
 
त्यानंतर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर मध्ये रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली. त्यानंतर ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये रुग्णसंख्येचा आलेख उतरणीस आला होता. जानेवारी 2021 मध्येही रुग्णसंख्येचे प्रमाण कमी होते. दिवसाला 60 पर्यंत नवीन रुग्ण सापडत होते.
 
अचानक 10 फेब्रुवारी 2021 नंतर पुन्हा शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. दिवसाला अडीच ते तीन हजाराच्या पटीत नवीन रुग्णांची भर पडायला लागली. मृत्यूचे प्रमाणही वाढले. दिवसाला 90 हुन अधिक जणांचा मृत्यू होऊ लागला.
 
वाढती रुग्णसंख्या आणि वाढत्या मृत्यूमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, मागील पाच दिवसांपासून काहीशी रुग्णसंख्या स्थिरावली असून मृत्यूमध्येही थोडी घट झाली आहे.
वाढत्या रुग्णसंख्येबरोबर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाणही जास्त आहे. आजपर्यंत शहरातील 2 लाख 26 हजार 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील तब्बल 2 लाख 633 जणांनी कोरोनाचा यशस्वीपणे मुकाबला केला.
 
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. त्यामुळे नक्कीच कोरोनाला हरवू आणि आपण जिंकू असा विश्वास शहरवासीयांकडून व्यक्त केला जात आहे.
 
दरम्यान, 16 जानेवारी पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण देखील सुरू झाले आहे. आजपर्यंत 4 लाख 21 हजार 687 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.
 
महापालिका हद्दीत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्के- आयुक्त राजेश पाटील
 
याबाबत बोलताना महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील म्हणाले, ”आजपर्यंत 2 लाख 633 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण महापालिका परिसरात चांगले आहे. रिकव्हरी रेट 90 टक्के आहे. पुणे विभागात पिंपरी-चिंचवडचा सर्वाधिक रिकव्हरी रेट आहे. मागील काही दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर ही खूप पॉझिटिव्ह बातमी आहे की दोन लाख जणांनी कोरोनावर मात केली आणि 90 टक्के रिकव्हरी रेट आहे.
 
यापुढेही नागरिकांनी काळजी घ्यावी. होम आयसोलेशनमध्येही नियमांचे पालन करावे. कॉल सेंटरकडून सर्वांना फोन केला जातो. नागरिकांनी काळजी आणि कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास रोग फैलावण्यास प्रतिबंध होईल. नागरिकांनी कोरोनाची लक्षणे दिसताच तपासणी, संसर्ग झाल्यास तत्काळ रुग्णालयात दाखल व्हावे. यामुळे मृत्यूदर देखील कमी राहील आणि कोरोनाची लढाई आपण नक्कीच जिंकू” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.