रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दासनवमी
Written By वेबदुनिया|

श्री समर्थांचा महायोगी

सौ. कमल जोशी

महायोगी कोण हे वैराग्यपर अभंगावरून स्पष्ट करायचे आहे तेव्हा वैराग्य म्हणजे काय हे प्रथम पाहावे लागेल. इच्छा सोडून नि:स्पृहपणे जीवन जगणे म्हणजे वैराग्य. मी किंवा माझी ही वृत्तीच उठू न देणे म्हणजे वैराग्य. हे वैराग्नरदेहालाच विवेकाने प्राप्त होते. मानवाला मिळालेला नरदेह कशाकरिता मिळाला ह्याचे त्याला भानच नसते. प्रापंचिक माणूस विषयासुखात रमतो व निळालेल्या नरदेहाचे ध्येय काय हे विसरतो. ईश्वरप्राप्ती हे मानवाचे मुख्य ध्येय आहे. मिळालेल्या देहावर तो प्रेम करतो. श्री समर्थ म्हणतात 'देहालागी कष्ट केले। परी ते अवघे व्यर्थ गेले। देह देवाचे कारणीं। होता देव होती ऋणी।' प्राणी जे जे कष्ट करतो ते सर्व केवळ प्रपंचाकरिता आणि देह सजविण्याकरिता करतो. त्यामुळे त्याचे सर्व कष्ट वाया जातात. पुढे अंत:काळ येणारच, तो अंत:काळ येता येता तेथे नये चुकविता। अकस्मात जावे लागे। काही पुण्य आचरावे। नाही तर आयुष्याचा नाश ठरलेलाच म्हणून मानवाने विवेक करावा. विवेकी वर्तावे। मागे मूळ साभंळावे। ते मूळ सांभाळण्यास देवाची आठवण ठेवावी. याच्याशी सख्यत्व सांभाळावे. देवाच्या सख्यत्वासाठी। पडाव्या जिवलगाच्या तुटी। वेळ आली तरी प्राणही द्यावा. शेवटी, अशा त्यागमय जीवनालाच वैराग्य असे म्हणतात. वैराग्य खरे भाग्य होय. वैराग्यातच परमार्थाचे वर्म आहे. जो अनुभवसिद्ध आहे, आसक्तीरहित आहे, विवेकाने ज्याने वैराग्य अंगी बाणले आहे व सर्वस्वाचा त्याग केला आहे त्याला महायोगी म्हणावा. ' एक वैराग्य त्यागितां। अंगी बाणे लोलंकता। रामीरामदास म्हणे सर्व नीतींनें करणें। 396 व्या अंभगात श्री समर्थांनी सुंदर रूपक केले आहे. ते म्हणतात 'वेळ चालिला कोमल। त्यासी माया आलें फळ। आदिअंती एक बीज। जाले सहजी सहज।।

परब्रह्मरूपी कोमल वेल वर जात आहे. त्या वेलीला मायारुपी फळ लागले आहे. त्या फळामध्ये वेलीचे बीज आहे. त्या बीजापासूनच तर वेल रुजली आहे. ते बीज आदिअंती एकच नाही का? पण हा महायोगी मायारूपी फळाचे बीजच नरदेहाच्या साहाय्याने जाळून टाकतो. ह्या योग्यांना 'कान्ता, पुत्र, धन वैभव, स्वजन' काही आवडत नाही. केवळ रामाचे दासय्त्व तेवढे आवडते. त्याचाच त्यांना आनंद. तो आनंद ते स्वत: लुटतात व मुक्त हस्ताने लोकांना वाटतात. अशाप्रकारे ते मायेचा सर्वसंग परित्याग करतात. असे हे महायोगी. त्यांच्या ठिकाणी अज्ञानाचा लेशही नसतो. ते अद्वैतबोधात नांदत असतात व सर्व विश्व आत्मवत पाहातात. त्यांनी विकारांवर ‍जय मिळविलेला असतो. त्यांना प्रापंचिक उपाधी बाधतच नाही. 'प्रापंचिक नाही जयाते उपाधी।' असे निरुपाधिकपणे ते ह्या दृश्य जगताकडे पाहातत. तेच त्यांचे खरे भाग्य म्हणूनच ते खरे महायोग होत.
जय जय रघुवीर समर्थ।