शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 29 डिसेंबर 2020 (10:37 IST)

श्री दत्तजन्माख्यान

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
श्रीदत्तत्रेयाय नमः ॥ जयजयावो गजवदना ॥ मंगलारंभीम तुझीच प्रार्थना ॥
वंदितां हो तुझिया चरणा ॥ ग्रंथ पावो सिद्धीसी ॥१॥
जयजयावो सरस्वती ॥ आदिमाया तूंचि शक्ति ॥
बैसनि माझे जिव्हेवरुती ॥ ग्रंथ सिद्धी नेइंजे ॥२॥
जयजयावो गुरुनाथा ॥ कृपाकर ठेवूनि माझिया माथां ॥
सिद्धीस न्यावें या ग्रंथा ॥ हाचि वर मज द्यावा ॥३॥
तुमचें होतां कृपाबळ ॥ ग्रंथ सिद्धीसि जाय सकळ ॥
हें वेदवाक्य जाश्वनीळ ॥ पुराणांतरीं बोलतसे ॥४॥
ॐ नमोजी श्रीदत्त ॥ गुणातीता अपरिमिता ॥
मूळमायाविरहिता ॥ जगतारका जगद्गुरु ॥५॥
पूर्णब्रह्म सनातना ॥ निष्कलंका निरंजना ॥
हे शून्यातीतनिर्गुणा ॥ गुणनिर्गुणातीत तूं ॥६॥
जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो परात्परगहना ॥
जयजयावो मधुसूदना ॥ कृपागहना जगद्गुरू ॥७॥
जयजयावो दिगंबरा ॥ जयजयावो करुणाकरा ॥
जयजयावो दयासागरा ॥ करुणार्णवा दीनबंधु ॥८॥
जयजयावो भक्तपालका ॥ जयजयावो जगव्यापका ॥
जयजयावो जगन्नायका ॥ कृपा करीं दीनावरी ॥९॥
जयजयावो अवधूता ॥ जयजयावो विश्वकर्ता ॥
जयजयावो कृपावंता ॥ अव्यक्तव्यक्ता सुखमूर्ति ॥१०॥
ऐसा महाराज गुरुदत्त ॥ त्यांचे माहात्म्य ऐसें वर्णीत ॥
चित्त देवोनि सावचित्त ॥ ऐका सकळ श्रोते हो ॥११॥
पूर्वीं नारदें तप अपार केलें ॥ तयासी श्रीविष्णु प्रसन्न जाहले ॥
वर द्यावयासी आले ॥ मग तेणें केला प्रणिपात ॥१२॥
करोनि साष्टांग नमस्कार ॥ उभा राहिला जोडोनि कर ॥
जयजय विष्णु करुणाकर ॥ अपेक्षित वर देइंजे ॥१३॥
अवघे रजोगुण तमोगुण ॥ हे द्वयविरहित करून ॥
मुख्य सत्त्वरूप जाण ॥ तें दाखवीं मजलागीं ॥१४॥
ऐसें बोलतां नारदमुनी ॥ सांगता जाहला कैवल्यदानी ॥
ऐक सखया चित्त देऊनी ॥ सत्त्वरूपाचा विचार ॥१५॥
त्रिभुवनींचें सत्त्वरूप जें ॥ तें मीच आहें बा जाणिजे ॥
परी तम मजसी पाहिजे ॥ म्हणोनि सत्त्व कमी हो ॥१६॥
ऐसें बोलतां मोक्षदानी ॥ नारदमुनि जोडोनि पाणी ॥
विचारिता जाहला तये क्षणीं ॥ तम कासया सांग पां ॥१७॥
मग श्रीविष्णु बोलत ॥ जरी मी सत्त्वरूपीं राहात ॥
तरी माझेनि हस्तें दैत्य ॥ मरणार नाहीं सहसाही ॥१८॥
हें जाणोनियां मानसीं ॥ किंचित् सत्त्व विधिहरांसी ॥
देऊनियां तमोगुणासी ॥ रजोगुणासी जवळ केलें ॥१९॥
ऐसा विचार आहे नारदा ॥ जरी तुज पाहिजे सत्त्वगुणसंपदा ॥
तरी एक आहे ब्रह्मवृंदा ॥ सांगतों सकळ परियेसीं ॥२०॥
जरी ब्रह्माविष्णुत्रिनेत्र ॥ तिघे होतील एकत्र ॥
तरीच सत्त्वरूप स्वतंत्र ॥ दृष्टीं पडेल जाण पां ॥२१॥
ऐसें ऐकूनि उत्तर ॥ बोलतां जाहला मुनिवर ॥
त्रिपुरांतक विधि चक्रधर ॥ करितों एकत्र जाण पां ॥२२॥
ऐसें बोलोनि ते वेळीं ॥ नारद आले भूमंडळीं ॥
तटस्थ जाहली सुरमंडळी ॥ हा संवाद ऐकोनियां ॥२३॥
भुमंडळीं नारदमुनी ॥ विचार करी अंतःकरणीं ॥
ब्रह्मा विष्णु शूळपाणी ॥ एकत्र कैसे होती ते ॥२४॥
ऐसा विचार करीत ॥ त्रिभूवनीं नित्य हिंडत ॥
तंव एके दिवशीं अवचित ॥ अत्रिसदना पातला ॥२५॥
ऋषि नव्हता आश्रमांत ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥
अनुसूयेनें देखोनि त्वरित ॥ आसन दिधले बैसावया ॥२६॥
आसनीं बैसवूनि नारदमुनी ॥ आपण कांडणा बैसे अंगणीं ॥
इतुकियांत अत्रिमुनी ॥ अकस्मात पातला ॥२७॥
स्त्रियेप्रती बोले उत्तर ॥ उदक देई वो सत्वर ॥
ऐसें ऐकतांचि ते सुंदर ॥ उठती झाली ते काळीं ॥२८॥
मुसळ गेलें हातें वरुतें ॥ तें तसेंच सोडिलें तेथें ॥
आणोनि दिधली पतीतें ॥ उदकझारी तेधवां ॥२९॥
ऐसें देखोनि ब्रह्मसुत ॥ मनांत तेव्हां आश्चर्य करीत ॥
धन्य धन्य माउली सत्य ॥ अनुसूया सती हो ॥३०॥
मनीं विचारीं नारदमुनी ॥ अनुसूया पतिव्रतेमाजीं शिरोमणी ॥
हिचे दर्शनेंकरूनी ॥ दोष जातील निर्धारें ॥३१॥
मग तेथोनि नारद निघाला ॥ मनांत विचार एक योजिला ॥
आतां जाऊनि वैकुंठाला ॥ लक्ष्मीपाशीं सागावें ॥३२॥
तेणें होईल कार्यसिद्धी ॥ हें जाणोनियां आत्मशुद्धी ॥
तेथूनि निघाला त्रिशुद्वी ॥ पवनवेगें करुनियां ॥३३॥
वैकुंठासी जाऊनि सत्वर ॥ लक्ष्मीपाशी समाचार ॥
सांगता झाला मुनीश्वर ॥ अनुसूयेचा तेधवां ॥३४॥
नारद सांगे लक्ष्मीलागोनी ॥ अनुसुया सती अत्रिपत्नी ॥
त्रिभुवनांत पाहतां शोधोनी ॥ तिची सरी न येचि पां ॥३५॥
पतिव्रतांमाजीं शिरोमणी ॥ स्वरूपें जैसी लावण्यखाणी ॥
तिचें चातुर्य पाहतां नयनीं ॥ परमानंद वाटतसे ॥३६॥
हा सकळ वृत्तांत ऐकतां ॥ लक्ष्मी जाहली विस्मितचित्ता ॥
म्हणे मृत्युलोकीं पतिव्रता ॥ ऐसी सत्त्वरक्षक आहे कीं ॥३७॥
तरी आतां श्रीविष्णूसी पाठवूनी ॥ तिचें सत्त्व घेईन हिरोनी ॥
ऐसे ऐकतां नारदमुनी ॥ परम संतोष पावला ॥३८॥
मग तेथूनि नारद निघाला ॥ मनोवेगें कैलासासी गेला ॥
पार्वतीसी वृत्तांत सांगितला ॥ लक्ष्मीसारिखा तेधवां ॥३९॥
वृत्तांत ऐकूनि पार्वती ॥ विस्मित जाहली परम चित्तीं ॥
म्हणे नारद सांगती कीर्ती ॥ काय आश्चर्य मानवाचें ॥४०॥
नारद म्हणे वो मृडानी ॥ अनुसूयेचे तुलनेलागुनी ॥
तुंही न पुरसी गजास्यजननी ॥ ऐसें मज वाटतसे ॥४१॥
उमा ऐकूनि ते अवसरीं ॥ परम क्रोधावली अंतरी ॥
आदिमाया निर्धारीं ॥ काय बोले ब्रह्मसुतासी ॥४२॥
आतां धाडून कैलासपती ॥ सत्त्वहरण करीन निश्चितीं ॥
ऐसें बोलतां पार्वती ॥ नारदासी आनंद ॥४३॥
मग नारद निघाला तेथुनी ॥ गेला सत्यलोकलागुनी ॥
सर्व वृत्तांत पूर्ववत सांगोनी ॥ सावित्री तेव्हां क्षोभविली ॥४४॥
सावित्री क्षोभली हें देखतां ॥ आनंद वाटे ब्रह्मसुता ॥
म्हणे आपुलें कार्य आतां ॥ सत्वरचि होईल ॥४५॥
ऐसें विचारुनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥
तंव ते समयीं त्रैमूर्ती ॥ आपुलाले स्थाना पातले ॥४६॥
तंव स्त्रिया वृत्तांत सांगती ॥ मृत्युलोकीं मानव वस्ती ॥
त्यांत एक अनुसूया सती ॥ आहे पहा ऋषिपत्नी ॥४७॥
पतिव्रतांमाजी शिरोमणी । स्वरूपें असे लावण्यखाणी ॥
नारदमुनि सांगोनी ॥ गेला आतां निर्धारें ॥४८॥
तरी जाऊनि अत्रिआश्रमासी ॥ तिचें सत्त्व हरावें निश्चयेंसी ॥
ऐसें ऐकोनि हृषीकेशी ॥ ब्रह्मा त्रिनयन अवश्य म्हणे ॥४९॥
विधि रुद्र शार्ङ्ग गणी ॥ त्रैमूर्ति एकत्र मिळोनी ॥
अत्रिमुनीच्या सदनीं ॥ येऊनि उभे राहिले ॥५०॥
द्विजरूप धरूनि जाण ॥ उभे राहिल अंगणीं येऊन ॥
हें अनुसूयेनें देखोन ॥ आसन दिधलें बैसावया ॥५१॥
आसनीं बैसतां सत्वर ॥ म्हणती क्षुधा लागली फार ॥
नग्न होऊनि निर्धार ॥ इच्छाभोजन देईजे ॥५२॥
ऐसें ऐकोनि ते सती ॥ विस्मय करी बहुत चित्तीं ॥
काय बोले तयांप्रती ॥ ऐका सादर श्रोते हो ॥५३॥
अवश्य म्हणोनी ते अवसरीं ॥ गृहांत गेली हो सुंदरी ॥
पतीलागीं निवेदन करी ॥ नमस्कारूनि तेधवां ॥५४॥
ऋषि अंतरीं विलोकोनी ॥ पाहे जंव आत्मज्ञानी ॥
तंव चतुर्मुख रुद्र पन्नगशयनीं ॥ छळणालागीं पातले ॥५५॥
हें जाणोनिया मानसीं ॥ तीर्थगंडी देई कांतेसी ॥
गंगा प्रोक्षूनि तिघांसी ॥ भोजन देई जाण पां ॥५६॥
तीर्थगंडी घेऊनि सत्वरी ॥ बाहेर आली ते सुंदरी ॥
गंगोदक प्रोक्षण करी ॥ त्रैमूर्तीवरी तेधवां ॥५७॥
गंगोदकाचा स्पर्श होतां ॥ बाळें जाहलीं हो तत्वतां ॥
हें देखोनि पतिव्रता ॥ काय करी ते वेळ ॥५८॥
कंचुकीसहित परिधान ॥ फेडूनि ठेवी न लगतां क्षण ॥
नग्न होवोनियां जाण ॥ बाळांजवळी बैसतसे ॥५९॥
बाळें घेऊनि मांडीवरी ॥ स्तनीं लावी तेव्हां सुंदरी ॥
पान्हा फुटला ते अवसरीं ॥ देखोनि सती आनंदे ॥६०॥
तिन्ही बाळें शांत करुन ॥ पाळण्यांत निजवी नेऊन ॥
जन्मकथा सांगोन ॥ हालवीतसे निजछंदें ॥६१॥
ऐसे कित्येक संवत्सर लोटले ॥ तंव नारद अकस्मात पातले ॥
अत्रिमुनीनें आसन दिधलें ॥ बैसावया नारदासी ॥६२॥
तंव नारद विलोकोनि पहात ॥ ब्रह्मा चतुर्भुज कैलासनाथ ॥
हे तिन्ही बाळ खेळत ॥ मठामाजी कौतुकें ॥६३॥
ऐसें दखोनि ब्रह्मसुत ॥ मुनीं जाहला हर्षभरित ॥
आतां जाऊनि वैकुंठांत ॥ लक्ष्मी पाशीं सांगावें ॥६४॥
ऐसें विचारोनि चित्तीं ॥ नारद निघाला पवनगती ॥
जाऊनियां वैकुंठाप्रती ॥ लक्ष्मीसी पुसतसे ॥६५॥
म्हणं वो आदिमाये वाहिले ॥ श्रीविष्णु कोठें गेले ॥
ऐसे ऐकून लक्ष्मी बोले ॥ सुतसुतासी तेधवां ॥६६॥
ऐक सखया विरिंचिसुता ॥ मी नेणें विष्णूची वार्ता ॥
ऐसें सिंधुजा सांगतां ॥ सृष्टिकरसुत बोलतसे ॥६७॥
कर्ममुपीसी अतिपावन ॥ अत्रिवाश्राम आह जाण ॥
तो ठायीं जनार्दन ॥ विधिहरांसह वसतसे ॥६८॥
ऐसें सांगोन कमळजेप्रती ॥ नारद गेला कैलासपथीं ॥
गिरिजेस सांगोन निश्चितीं ॥ सत्यलोकासी ॥ जातसे ॥६९॥
नारद आला हें पाहोन ॥ सावित्री पुसे वर्तमान ॥
म्हणे नारदा ऐक वचन ॥ चित्त दऊनि निर्धारें ॥७०॥
नारद म्हणे सावित्रीसी ॥ काय हो मजलागीं पुससी ॥
येरी म्हणे चतुर्वक्त्र पंचवक्त्र हृषीकेशी ॥ कोठें गेले सांग पां ॥७१॥
विधिसुत म्हणे ते अवसरीं ॥ सावित्री सांगतों तें अवधारीं ॥
चतुर्भुज चतुर्वक्त्र द्विपंचकरी ॥ मृत्युलोकीं वसताती ॥७२॥
ऐसें बोलतां ब्रह्मपुत्र ॥ तिघी मिळाल्या एकत्र ॥
जोडोनियां पाणिपात्र ॥ नारदासी विचारिती ॥७३॥
पुर्वीपासोनि वृत्तांत ॥ नारद कैसा सांग त्वरित ।
येरू म्हणे ऐका त्वरित ॥ चित्त देऊनि पूर्वींचा ॥७४॥
अत्रिमुनीचे आश्रमासी ॥ तुम्हीं पाठविलें छळणासी ॥
ऐसें सांगती नारदासी ॥ काय बोलिल्या तेधवां ॥७५॥
अत्रिआश्रम कर्मभूमीसी ॥ कोठें आहे सांग आम्हांसी ॥
आम्ही जाऊं तया ठायासी ॥ घेऊनि येऊ भ्रतार ॥७६॥
ऐसें ऐकतां ब्रह्मसुत ॥ तिघींपती काय बोलता ॥
माझिया मागें यावें त्वरित ॥ दाखवीन तुम्हांसी ॥७७॥
दुरूनि दाखवीन आश्रमासी ॥ मी न यें हो तया ठायासी ॥
ऐसें बोलोन तिघींसी । विधिसुन घेऊनि निघाला ॥७८॥
पुढें जातसे नारदमुनी । मागें येताती तिघीजणी ॥
आश्रमासमीप येऊनि ॥ उभा राहिला ब्रह्मसुत ॥७९॥
उमा सावित्रींसह लक्ष्मीसी ॥ पहा म्हणे आश्रमासे ॥
येरी म्हणती नारदासी ॥ चाल आतां मठांत ॥८०॥
नारद म्हणे मी न यें आश्रमांत ॥ तुम्हींच जावें यथार्थ ॥
ऐसें ऐकोनियां त्वरित ॥ आश्रमांत प्रवेशल्या ॥८१॥
तंव ते पतिव्रता महासती । जिची त्रिभुवनांत जाहली कीर्ती ॥
ती मांडीवरी घेऊनि त्रैमूर्ती ॥ खेळवीतसे आनंदें ॥८२॥
हें देख नि उमा रमा सावित्री ॥ नमस्कार घालिती धरित्री ॥
धन्य धन्य ऋषी अत्री ॥ धन्य अनुसूया सती हो ॥८३॥
मग उठोनिया सत्वर ॥ उभ्या राहिल्या जोडोनि कर ॥
अनुसूयेनें देखोनि साचार ॥ पुसती जाहली तयांतें ॥८४॥
कोण तुम्ही सांगा त्वरित ॥ काय अपेक्षित असेल चित्त ॥
तें सांगावें निश्चित ॥ देईन जाण तुम्हांतें ॥८५॥
हें ऐकोनियां निश्चितीं ॥ सावित्री लक्ष्मी पार्वती ॥
बोलत्या झाल्या अनुसूयेप्रती ॥ पति आम्हांतें देईजे ॥८६॥
येरी म्हणे तुमचे पती ॥ कोठें आहेत सांगा निश्चितीं ॥
ऐसें ऐकोनि पार्वती ॥ सावित्री लक्ष्मी काय बोले ॥८७॥
शिव ब्रह्मा वैकुंठपती ॥ माते हे जाणिजे आमुचे पती ॥
तुझे घरीं बाळें निश्चितीं ॥ होऊनि क्रीडाती स्वच्छंदें ॥८८॥
ऐसें अनुसूयेनें ऐकुनी ॥ गृहांत गेली उठोनी ॥
पतीलागीं नमस्कारूनी ॥ सर्व वृत्तांत सांगितला ॥८९॥
ऐकोनि तेव्हां ऋषि बोलत ॥ तीर्थगंडी नेई त्वरित ॥
गंगा प्रोक्षून पूर्ववत ॥ करूनि देई जाण पां ॥९०॥
ऐसें ऐकूनि ते अवसरी ॥ तीर्थगंडी घेतली सत्वरीं ॥
बाहेर येऊनि झडकरी ॥ काय बोलली तिघींतें ॥९१॥
तुमचे पति निश्चित ॥ खेळताती आंगणात ॥
ते घेऊनियां त्वरित ॥ जावे आपुले स्वस्थाना ॥९२॥
हें ऐकोनि मृडानी ॥ सावित्री लक्ष्मी तिघीजणी ॥
बोलत्या जाहल्या सतीलागोनी ॥ वोळख आम्हासी पुरेना ॥९३॥
तरी माते तूंचि जाण ॥ पूर्ववत देई वो करून ॥
ऐसें तीस नमस्कारून ॥ प्रार्थित्या झाल्या तेधवां ॥९४॥
निरभिमानी जाहल्या चित्तीं ॥ हें देखोनि अनुसूयासती ॥
काय बोले तिघींप्रती ॥ देतें निश्चितीं पति तुम्हां ॥९५॥
मग तिनें गंगोदक प्रोक्षून ॥ विधि नीलकंठ नीलवर्ण ॥
त्रैमूर्ति पूर्ववत करून ॥ दाखविल्या सर्वांतें ॥९६॥
तंव ऋषी जाहला बोलता ॥ आम्हांलागीं टाकूनि जातां ॥
देवाधिदेवा हो काया आतां ॥ त्रैमूर्तींसी बोलतसे ॥९७॥
अत्रि अनुसूया ऐसें बोलती ॥ हें ऐकोनि त्रैमूर्ती ॥
बोलते झाले ऋषीप्रती ॥ आम्हांसि येथूनि न जाववे ॥९८॥
तंव अकस्मात नारद पातला ॥ श्रीविष्णूसी नमस्कार केला ॥
म्हणे आतां त्रैमूर्तीं एक जाहलां ॥ दाखवा कोठें सत्त्वरूप ॥९९॥
माझें पूर्वपुण्य फळा आलें ॥ त्रिगुणात्मक ऐक्य जाहलें ॥
हें ऐकोनि देव बोलिले ॥ नारदासी तेधवां ॥१००॥
तुम्हीं पूर्वीं प्रयत्न केला अमूप ॥ युगयुगादि तप ॥
तरी पाहें बां आजि सत्त्वस्वरूप ॥ डोळेभरी नारदा ॥१०१॥
तो दिवस परमपावन ॥ ऐका त्याचें नामाभिधान ॥
सांगतसें सविस्तर पूर्ण ॥ चित्त देवोनि ऐकावें ॥१०२॥
मासांमाजीं मार्गेश्वर ॥ उत्तम महिना प्रियकर ॥
तिर्थीमाजीं तिथी थोर ॥ चतुर्दशी शुद्ध पैं ॥१०३॥
वार बुधवार कृतिका नक्षत्र ॥ ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ॥
तिघे मिळोनि एकत्र ॥ शुद्ध सत्त्व निवडिलें ॥१०४॥
त्रैमूर्तीचें सत्त्व मिळोन ॥ मुर्तिं केली असे निर्माण ॥
ठेविते झाले नामभिधान ॥ दत्तात्रेय अवधूत ॥१०५॥
हा सोहळा देखोनि अनुसूया सती ॥ हर्षभरित जाहली चित्तीं ॥
म्हणे परब्रह्म सत्त्वमूर्ती ॥ दृष्टीं पडला आज हो ॥१०६॥
धन्य धन्य भाग्य आजिचें ॥ निधान देखिलें त्रिभुवनींचें ॥
फळ पावलें पूर्वपुण्याचें ॥ जन्मोजन्मींचें येधवां ॥१०७॥
तंव इंद्रादिक सुरवर ॥ येते जाहले सत्वर ॥
करुणि साष्टांग नमस्कार ॥ उभे राहिले बद्धांजली ॥१०८॥
पूजा करूनि षोडशोपचार ॥ उभे राहिले जोडोनि कर ॥
नारद तुंबर गंधर्व किन्नर ॥ गायन करिती एकसरें ॥१०९॥
यथाविधि पुजा करून ॥ स्तुति करी ब्रह्मनंदन ॥
तैसाचि तो सहस्त्रनयन ॥ स्तवन करी प्रीतीनें ॥११०॥
जयजयावो अत्रिनंदना ॥ जयजयावो कृपाघना ॥
जयजयावो मधुसूदना ॥ पूर्ण ब्रह्मा सनातन तूं ॥१११॥
जयजयावो करुणाकरा ॥ जयजयावो दयासागरा ॥
जयजयावो कृपाकरा ॥ त्रिगुणात्मका दयाब्धी ॥११२॥
जयजयावो निर्विकारा ॥ जयजयावो अत्रिकुमरा ॥
तूं परात्पराचा सोयरा ॥ भवतारक भवाब्धी ॥११३॥
जंव तुमची कृपा होत ॥ तंव मुक तो होय पंडित ॥
तयासी काय न्युन पदार्थ ॥ त्रिभुवनींही असेना ॥११४॥
गुरुकृपा होतां पूर्ण ॥ तयासी होय ब्रह्मज्ञान ।
हें पुराणांतरीं वचन ॥ ब्रह्मादिक बोलती ॥११५॥
ऐसी स्तुति जंव करीत ॥ तवं प्रसन्न झाला कृपाघन दत्त ॥
देता जाहला अपेक्षित ॥ वरदान वेधवां ॥११६॥
कोणी करील आराधन ॥ उपासना विधियुक्त पूर्ण ॥
तये ठायीं रात्रंदिन ॥ मी राहीन जाण नारदा ॥११७॥
दत्तात्रेय नामेंकरून ॥ कोणी करितां माझें स्मरण ॥
तत्काळ उभा राहीन ॥ सहस्त्रनयना जाण पां ॥११८॥
जो प्रातःकाळीं नित्यनेम ॥ दत्त दत्त उच्चारी नाम ॥
तयालागीं मी सकाम ॥ भेट देईन निर्धारें ॥११९॥
कोणतेही रूपेंकरून ॥ द्वादशमास भरतां पूर्ण ॥
तयालागीं मी भेटेन ॥ हें वचन सत्य सत्य ॥१२०॥
उपासना विधियुक्त करोनी ॥ गुरुवचनीं विश्वास ठेवोनी ॥
जो रात्रंदिन माझे ध्यानीं ॥ लक्ष लावील नारदा ॥१२१॥
तयालागीं मी एकक्षण ॥ नारद न जाय कोठें टाकोन ॥
प्रातःकाळीं तयालागून ॥ भेट देईन प्रत्यक्ष ॥१२२॥
ऐसें देतां वरदान ॥ आनंदला ब्रह्मनंदन ॥
सुरादिक सहस्त्रनयन ॥ हर्षभरित जाहले ॥१२३॥
करूनियां जयजयकार ॥ सुमनें वर्षती सुरवर ॥
विमानारूढ शचीवर ॥ जाता झाला स्वस्थाना ॥१२४॥
ऐसा दत्तात्रेयजन्म पूर्ण ॥ ऐकती पढती रात्रंदिन ॥
तयांसी मी निजांगेकरून ॥ रक्षीन रक्षीन त्रिवाचा ॥१२५॥
हा ग्रंथ गृहामाजी असावा ॥ नित्यनेमें संप्रेमें पूजावा ॥
देवपूजेमाजीं ठेवावा ॥ आदरेंकरूनि समस्तीं ॥१२६॥
त्याची फळश्रुती हेचि पूर्ण ॥ ऐश्वर्य चढे रात्रंदिन ॥
यश कीर्ति सदा कल्याण ॥ प्राप्त हे य तयांसी ॥१२७॥
स्वामीकृपेचा हा ग्रंथ ॥ वरी दाशरथीचा आशीर्वाद ॥
त्याचे चरणीं मस्तक ठेवीत ॥ मनोमधव निजप्रेमें ॥१२८॥
 
इति श्रीदत्तजन्माख्यानं संपूर्णम् ॥ शुभं भवतु ॥