रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

दिवाळीत गो-पूजेचे महत्त्व

भारतीय संस्कृतीत देवांनी सर्व विश्व व्यापले आहे असे मानले जाते. परमात्मा हा सर्वच ठिकाणी असतो. जीवनाच्या
विकसनशील परंपरेत हे फक्त मानवतेपर्यंत मर्यादीत न राहता 'सर्वभूतहिते' हा त्याचा मुख्य आदर्श आहे. प्राणीमात्रावर फक्त दया न करता प्रेम करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. आपण देवांवर दया करत नाही तर देवावर प्रेम करतो व त्यांची पूजा करतो. म्हणूनच प्राण्यांमध्ये जर देव वसत असतील तर त्यांच्यावरही दया न करता त्यांचे पूजन केले पाहिजे. त्यांवर प्रेम केले पाहिजे. म्हणूनच भारतीय संस्कृतीच्या दृष्टीने मानवाच्या अंत:करणात प्राणीमात्रांसाठी आदर असला पाहिजे. भारतीय संस्कृती मानवाला पूर्ण सृष्टीवर प्रेम करावयास शिकविते. पृथ्वीतलावर गायीचे महत्त्व खूप जास्त आहे. 

'गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतीभि: सत्यवादिभि:।
अलुब्धै: दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते मही:।।'

'गाय, ब्राह्मण, वेद, सती, सत्यवादी, निर्लोभी व दानशूर यांना पृथ्वीने धारण केले आहे. ऋषींनी गायीवर प्रेम करण्यास सांगितले, त्यावेळी कदाचित हिंदू हा शब्द प्रचलितही नसेल. म्हणून गाईला केवळ हिंदू धर्माचे प्रतीक मानणे चुकीचे ठरेल. मानवेतर सृष्टीवरही प्रेम करणे हेच गो-पूजेतून सांगितले जाते. मोहम्मद पैंगंबर यांनीही कुराणातून गाईच्या निर्दोषत्वाचे व प्रसन्नतेचे वर्णन करून गो-पूजा करावी असे सांगितले आहे.

गाय मानवाला आपले सर्वस्व देते. गाईचे दूध पिऊनच मानव धष्टपुष्ट बनतो. गाय शेतात काम करून शेती पिकवते. त‍िच्या शेणाने उपयुक्त असे खत मिळते. गोमुत्र अनेक रोगांसाठी रामबाण औषध ठरते. जिने असे अनंत उपकार मानवावर केले आहेत तिच्या प्रती जर आपण कृतज्ञ राहिलो नाही तर हा मानवतेवर कलंक ठरेल.
WD
भारतीयांच्या दृष्टीने गाय विभूती मानतात. यामुळे आपली संस्कृती गोहत्येचा विरोध करते. आपले शास्त्र सांगते की गाईमध्ये तेहतीस कोटी देवता वास करतात. 'सर्वोपनिषदो गावो' या दृष्टीने गाईला उपनिषद मानले जाते. यामुळे माझ्यासमोर उपनिषदाचे विचार राहोत, माझे जीवन उज्ज्वल करो, माझे जीवनमार्ग प्रकाशमय करो. माझ्यामागे उपनिषदाचेच विचार राहोत, माझ्या जीवन व्रताचे रक्षण करो, माझ्या हृदयात उपनिषदाचेच विचार राहोत. मी पूर्णपणे उपनिषदाचा विचार करो. अर्थातच माझे पूर्ण ज‍ीवन व त्यातील व्यवहार कुशलतेने होवो.

श्रीकृष्णांनी उपनिषदातील विचारच गीतेत मांडले आहेत.

'सर्वपनिषदो गावो दोर्‍धा गोपालनन्दन:।

पार्थो वत्स: सुधीर्भोवता दुग्ध गीताऽमृतम् महत्।।'

गीता माझ्या जीवनात दिशा देणारा ग्रंथ असावा.


गो या शब्दाचे संस्कृतात अनेक अर्थ आहेत.
'बिना गोरसं को रसो भोजनेषु? (दूध)
बिना गोरसं को रसो भूपतीष? (गाहू)
बिना गोरसं को रसो कामिनीषु? (दृष्टी)
बिना गोरसं को रसो हि द्विजेषु? (वाणी)

याचाच अर्थ गो-रसाशिवाय (दूध, दही, तूप) जेवणात काय अर्थ आहे? गो-रसविहीन (शक्तीहीन) राजाचे काय महत्त्व आहे? गो-रस (सुदृष्टी, चांगले डोळे) श‍िवाय स्त्रीच्या सौंदर्याला काय महत्त्व आहे? आणि गो-रसाशिवाय (वाणी) बोलण्यात काय अर्थ आहे. या सगळ्या अर्थांवरून गो-पूजा आपल्या जीवनात अशीच महत्त्वाची असते हे लक्षात ठेवावे.