शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

वसुबारस: सण साजरा करण्याचे नियम व विधी

आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस, वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे,आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.
 
असा साजरा करावा हा सण
 
ह्या दिवशी संध्याकाळी गाय आणि वासरू ह्यांची पूजा करावी.
गायीच्या पायावर पाणी टाकावे.
गायीला हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून फुलांची माळ घालावी.
वासराची अश्या रीतीने पूजा करावी.
निरांजनाने ओवाळून घ्यावे.
गायीच्या अंगाला स्पर्श करावे.
गाय- वासराला गोडाचा नैवेद्य दाखवावा.
नंतर गायीला प्रदक्षिणा घालावी.
जवळपास गाय उपलब्ध नसल्यास घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय- वासराचे चित्र रेखावे व पूजा करावी. 
 
या दिवसाचे काही नियम
 
स्त्रिया या दिवशी दिवसभर उपास करतात.
ह्या दिवशी गहू, मूग खात नाही.
स्त्रिया बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपास सोडतात.
या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत.
या दिवशी तव्यावर बनवलेले पदार्थही खात नाहीत.
 
गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण साजरा केला जातो. स्त्रिया आपल्या मुला-बाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख-समृद्धीसाठी ही पूजा करतात.