बॉम्बस्फोटांनी दिल्ली हादरली; 26 ठार
जयपूर, हैदराबाद आणि अहमदाबाद हादरवल्यानंतर आता दहशतवाद्यांनी राजधानी दिल्लीला लक्ष्य केले आहे. आज दिल्लीत सुरक्षाव्यवस्थेच्या चिंधड्या उडवत दहशतवाद्यांनी महत्त्वाच्या भागात चार ठिकाणी पाच स्फोट घडवून थेट राजसत्तेलाच आव्हान दिले. या स्फोटात 26 जणांचा मृत्यू झाला असून 125 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राजधानीतील कॅनॉट प्लेस भागात तीन, करोल बाग व ग्रेटर कैलाश एम ब्लॉक येथे प्रत्येकी एक बॉम्बस्फोट झाला. करोलबागमध्ये एका रिक्षात स्फोट झाला. उर्वरित जागी कमी तीव्रतेचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. स्फोटांनंतर या भागात जमावबंदी करण्यात आली असून पोलिसांनी या भागाला घेरले आहे. अजूनही काही ठिकाणी स्फोट होण्याची भीती आहे. स्फोटातील जखमींना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या ट्रॉमा सेंटरमध्ये तसेच राममनोहर लोहिया व इतर रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
संध्याकाळी सहाच्या सुमारास कॅनॉट प्लेस भागात तीन स्फोट झाले. यात चाळीस जण जखमी झाले. त्यांना तातडीने लोहिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यातील दोन जणांचा नेतानाच मृत्यू झाला. 'एम्स'च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दीड डझनांहून अधिकांवर उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची स्थिती गंभीर आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असून बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांना पोलिसांनी घेरले आहे. दिल्ली सुरवातीपासूनच दहशतवाद्यांचे लक्ष्य होती. गुप्तचर यंत्रणांनी बॉम्बस्फोटांची भीती यापूर्वीच व्यक्त केली होती. हे स्फोट अत्यंत योजनापूर्वक सिद्धीस नेले आहेत. शहरातील बहूतांश लोक ऑफिसमधून निघून घरी जात असताना हे स्फोट घडले. मोठ्या प्रमाणात नुकसान घडविण्याचा अतिरेक्यांचा इरादाही यातून स्पष्ट होतो.इंडियन मुजाहिदीनने घेतली जबाबदारी- दरम्यान, या बॉम्बस्फोटांची जबाबदारी इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेने घेतली आहे. हा मेल मुंबईहून आला असून दहशतवाद्यांनी आता आपले लक्ष्य मुंबई असल्याचे म्हटले आहे.
कचर्याच्या पेटीत बॉम्ब- अहमदाबादप्रमाणेच दिल्लीतही बॉम्बस्फोटांसाठी टायमरचा वापर करण्यात आला. सर्व बॉम्ब कचर्याच्या कुंडीत ठेवण्यात आले होते. गप्फार मार्केटमधील स्फोटांसाठी सिलींडर वापरण्यात आले. हा स्फोट एवढा शक्तीशाली होता, की जवळच्या इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील घराच्या काचा फुटल्या. मुंबईत हाय अलर्ट- दरम्यान या बॉम्बस्फोटानंतर मुंबईसह देशाच्या इतर महत्त्वाच्या शहरांत अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पंतप्रधानांनी हे स्फोट घडवून आणणार्यांचा निषेध केला असून सर्वसामान्य जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली टार्गेट होतीच- जयपूर, हैदराबाद व अहमदाबाद नंतर आमचे लक्ष्य राजधानी दिल्ली आणि मुंबई आहे हे दहशतवाद्यांनी यापूर्वीच जाहीर केले असताना त्याकडे गृह मंत्रालयाने साफ दुर्लक्ष केल्याने गृहमंत्रालयाच्या कामाच्या पध्दतीवर नाराजी व्यक्त केली जात आहे. दिल्लीत आपत्कालीन बैठक- बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर देशभर हायअलर्ट जारी करण्यात आला असून दिल्ली सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे. अमेरिकेसह पाकीस्ताननेही या स्फोटांचा निषेध केला आहे. शिवराज, सोनियांची रुग्णालयांत भेट- कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी राममनोहर लोहीया रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेटचा वापर- बॉम्बमध्ये अमोनियम नायट्रेट या रसायनांचा वापर करण्यात आला होता. या शिवाय बॉलबेअरिंग व लोखंडी खिळ्यांचाही वापर करण्यात आला होता.नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन- दहशतवादी कारवायांना हाणून पाडण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आणि बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.