बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. ऑनलाईन दिवाळी अंक
Written By वेबदुनिया|

प्रचितगडावरची 'स्वारी'

- किरण जोशी

WD
दहावीची परीक्षा संपली आणि एकदाचे दहा वर्षांचे टेंशन गेले म्हणत (घरच्यांनी) सुटकेचा निःश्वास टाकला. आम्ही मात्र, परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन जितके केले नाही तेवढे सुटीतल्या ट्रेकिंगचे नियोजन करत होतो. सांगलीत प्रसिद्ध गणपती मंदिराच्या नजीकच आमचा पुराणिक वाडा.. आता वाडा म्हटल्यावर आपसुखच तुमच्या डोळ्यासमोर भलामोठा दरवाजा, शेणाने सारवलेल्या प्रचंड खोल्या, पडवीत हालणारा झोपाळा.. टिपीकल वाड्याचे चित्र तरळले असेल. पण, आमचा हा वाडा असा टिपीकल नव्हता खरा. पण, एकमेकांची नाळ जुळलेली कुटुंब या ठिकाणी गुण्यागोविंदाने राहत. वडिलधारी माणसं, दादा-ताई म्हणाव्यात अशा कॉलेजिअन्सचा (धगुरड्यांचा) ग्रुप आणि आम्हा छोट्यांची गॅग.. असे आम्ही आपापल्या नादात मग्शुल असायचो. आम्हा पोरांचं बालपण गणपती मंदिरातील प्रसन्न आणि झाडाझुडपांनी बहरलेल्या आल्हाददायक वातारणात गेलं.

धगुरड्यांचा ग्रुप सातत्याने भटकत असायचा. त्यांना ट्रेकिंगची फार हौस. आठ-पंधरा दिवस जंगलात भटकंती करून काळवंडून परतलेल्या त्या ग्रुपची येताच 'कॅसेट' सुरू व्हायची. जंगलात कसे थ्रिलींग अनुभव येतात. वाघ, सापासारखे जंगली प्राणी 'लाइव्ह' पाहायला मिळतात याचे वर्णन ऐकताना आताच उठावं आणि जंगलात जावं असं वाटायचं.. (पण, तेव्हा रात्रीच्या वेळी.... ला जाण्यासाठीही बाबांची सोबत लागत असे) पण, त्यांच्यामुळेच आम्हाला इतरत्र भटकण्यापेक्षा ट्रेकिंगला जाण्याचा नाद जडला.
असो..

दहावीची परीक्षा संपली आणि ट्रेकिंगला जाण्याचं आमचं खूळ जागं झालं. खरंतर मोन्या (सुनील पुराणिक) शिली (शैलजा भोसले) तुपी (तृप्ती जोशी) संत्या (संतोष पुराणिक) संत्या नंबर-2 (संतोष जोशी) कोल्हापूरचा संज्या (संजय) शिल्पा आदी मोठ्यांनी आम्हाला गृहीतच धरलं नव्हतं आणि उगीचच आमची उठाठेव सुरू होती. त्यांनी वासोट्याला जाण्याच निश्चित केलं होतं पण, त्यानंतर प्लॅन बदलला आणि 'प्रचितगड' येथे जाण्याचं निश्चित झालं. इतिहास आवडीचा विषय असल्याने आम्हालाही ही कल्पना पसंत पडली. पुस्तकात गडकोट किल्ल्यांची चित्रे आणि शिवाजी महाराजांनी गाजवलेला काळ वाचताना स्फुरण चढायचं. प्रचितगडाचं नाव कुठ ऐकलं नव्हत पण, किल्ल्यावर भटकंती करायची म्हटल्यावरच (नंतर फाटणार आहे याची कल्पना नव्हती म्हणून) आम्ही आनंदीत झालो.

खरं तर मोठ्यांच्या चर्चेत आम्हाला सहभागी करून घेतलं जात असे पण, आम्हाला जमेत धरलं जात नाहीय हे लक्षात आल्यावर आम्ही 'दंगा' सुरू केला. खरंतर जंगलात जाण्याची 'रिस्क' असल्याने आणि घरच्यांचा विरोध असल्याने ते आम्हाला टाळत होते. पण, रडून-फुगून घरच्यांची संमती घेतल्यावर त्यांनी (नाईलाजाने) आम्हाला स्वीकारले. माझ्यासह सॅंडी (संदीप) केद्या (केदार) सुरज्या (सुरज सारडा) पशा (प्रसाद) आदींनी ट्रेकिंगला जाण्याची तयारी सुरू केली.

अखेर जाण्याचा दिवस उजाडला... मिरजेतून नायरीला थेट गाडी असल्याने जागा मिळवण्यासाठी आम्ही 10 किलोमीटरवरचं मिरज गाठलं. टीशर्ट-बरमुडा, पायात बूट, टोपी, हातात काठी आणि पाठीवर मोठ्या सॅग लादलेल्या अवस्थेत आमची मिरजेतील 'एंट्री' लक्षवेधी ठरली. शिवाजी महाराजांच्या जमान्यातील आम्ही मावळे कुठंतरी लढाई जिंकण्यासाठी जात असल्याचे उगाचच वाटू लागलं. सकाळी 11 वाजता नायरी गाडी आली आणि कोंबड्या भरल्यासारखी गाडी प्रवाशांनी भरू लागली. प्रवाशी आत चढल्यावर आमची शस्त्र गळाली. खिडक्यांतून काठ्या, गाठोडी, स्टोव्ह आत टाकून जागा 'रिझर्व' केली. आत गेल्यावर जागा मिळाली नाहीच. परंतु, आमच्या वस्तू शोधण्याची वेळ आली. काही तास उभारल्यानंतर (बूड टेकण्याइतकी) जागा मिळाली.

दुपार लोटली आणि आम्ही कोकणात दाखल झालो. उन्हं उतरली, सायंकाळचं गार वारं सुखावू लागलं. पण, अंग अवघडलं असल्याने कधी एकदा खाली उतरतोय असं झालं होतं. संगमेश्वरात गरगमगरम चहा आणि भजी खाल्ल्यावर जिवात जीव आला. दिवेलागणीची वेळ झाली तरी प्रचितगड काय साधा डोंगर दिसेना. गाडी जशजशी पुढं जाईल तशी गर्दी कमी होत होती. आम्हाला हलकी डुलकी लागली होती. शेवटचा थांबा नायरी होता पण, आम्हाला शृंगारपूरला जायचं असल्याने 20 ते 30 किलोमीटर अलीकडे शृंगारपूर फाट्यावर ड्रायव्हरने ब्रेक मारला तसे आम्ही खडबडून जागे झालो. रात्रीचे आठ-साडेआठ वाजले होते आणि त्या 'एसटी'त प्रवाशी म्हणून फक्त आमचा ग्रुप होता. आमची उतरण्याची लगबग सुरू झाली तेवढ्यात कंडक्टर आला आणि म्हणाला ' तुम्हाला शृंगारपूरला जायचे असेल तर आता नायरीला चला आणि सकाळी उठून परत याच गाडीतून या. कारण, या फाट्यावरून शृंगारपूरला जाण्यासाठी घाटातूनच 13 किलोमीटरची पायवाट आहे आणि येथे दोन नरभक्षक वाघ आहेत. वाघ.. म्हटल्यावर भीतीने थरकाप उडाला. बाहेर अंधार आणि किर्र झाडी पाहिल्यावर मी तर गाडी न सोडण्याचे ठरवले. मोठ्या मुलांची चर्चा सुरू झाली आणि त्यांनी गाडी सोडण्याचा निर्णय घेतला. आत रहाण्यास नकार दिला तर शिव्या खाण्याबरोबरच 'भित्रा' म्हणून घ्यावं लागलं असत, म्हणून मीही निमुटपणे खाली उतरलो.

लाल मातीचा धुरळा उडवीत गाडी निघून गेली. गाडीचे मागील दिवे मंद होईपर्यंत मी गाडीकडे पाहत होतो. तोपर्यंत 'ऊ.. ऊ.... ' असा भुताटकीसारखा आवाज ऐकू येऊ लागला. आता मात्र भीतीने गाळण उडाली. काही समजायच्या आत अंधारातून एक काळी सावली आमच्याकडे येत असल्याचा भास होऊ लागला. तेव्हा मोठी मुले पुढे सरसावली. मुली किंचाळल्या. 'कुणी घाबरू नका, जोराचा आवाज सुरू करा.. ' अशा सूचना सुन्याने दिल्या. तेव्हा आवाज फुटत नसतानाही आम्ही ओरडण्याचा प्रवत्न करू लागलो. ती सावली जवळ आली तेव्हा समजले की, कडाक्याच्या थंडीने गारठलेला आणि आमच्याइतकाच भयभीत झालेला एक वृद्ध गोधडी लपेटलेल्या अवस्थेत आमच्याकडे येत होता. त्यालाही शृंगारपूरला जायचे होते पण, वाघाच्या भीतीने त्याची गाळण उडलेली होती. त्याला नीट बोलताही येत नव्हते.

आमच्या सोबतीने त्याला हायसे वाटले. त्याला नेमकी वाट माहीत असल्याने आमचीही भीती काहीशी कमी झाली. पण, वाघाची भीती कायम होती. कारण तेव्हा नरभक्षक वाघांकडून दररोज किमान एक तरी बळी जात होता. आम्ही 'कालवा' करीत आणि एकमेकांना पाठ चिटकवीत चालू लागलो. सुदैवाने त्यादिवशी (पौर्णिमा असावी) चंद्रप्रकाश असल्याने वाट दिसत होती. एक बाजूस दरी आणि छोटी पायवाट.. आम्ही रस्ता कापू लागलो. एका वळणावर प्राणी जोरजोरात ओरडतानाचे आवाज ऐकू येऊ लागले. थंडी आणि भीतीने अंगावर काटा उभा राहिला होता म्हणून आम्ही एकत्र येऊन शेकोटी पेटवली. एकाचजागी जास्त वेळ थांबणे धोक्याचे आहे, असे त्या वृद्धाने सांगित्यावर आम्ही पुन्हा चालू लागलो. मनात नाही, नाही ते विचार घोळू लागले पण, 'घाबरायचे नाही.. यालाच थ्रिल म्हणतात', अशी आपल्याच मनाची समजूत घालून धिटाईचा आव आणत पुढे चालत होतो.

दीड ते दोन तास चालल्यानंतर अचानक बल्बचा प्रकाश दिसू लागल्याने प्रत्येकाच्या चेह-यावरील भय कमी होऊन समाधानाची लकेर उमटली. 'मगर दिल्ली अभी भी दूर थी'. आम्ही शृंगारपूरात पोहोचलो होतो पण, गावाच्या वेशीबाहेरच्या मारुती मंदिरातील दिवा चमकत होता. आणि याच मंदिरानजीक वाघांचे हल्ले अधिक होत असल्याचे समजताच आमचा 'स्पीड' वाढला. पुढे पंधरा ते वीस मिनिटाच्या फरकावर शृंगारपूर आले. कुठल्यातरी डोंग-राच्या पायथ्याला अर्थात उतरंडीला हे गाव वसले असल्याचे अंधुक प्रकाशात जाणवत होतं. फणस, आंबे आणि सागाची झाडं.. घरांच्या बाजूंनी दगड रचलेली.. अशा टिपीकल कोकणातील गावांत एक रात्र काढण्याची माझी हौस याठिकाणी भागणार म्हटल्यावर मी आनंदीत झालो.

रामचंद्रराव (नाव घेताच त्यांची आठवणं उभी राहिली) यांच्या घरी आम्ही गेलो. अगदी घरचे सदस्य असल्यासारखे त्यांनी आमचे स्वागत केले. गरम पाण्याचे पिंप त्यांनी आमच्यासाठी भरून ठेवले होते. आता या जंगलात पोटाचे हाल होणार अशी खूणगाठ मी एवढ्यावेळ चालताना मनात बांधून ठेवली होती. पण, रामचंद्रराव यांची आई व बायकोने आमच्यासाठी गरम-गरम भात शिजवला होता. आमटीचा खमंग घमघमाट सुटताच कधी एकदा भातावर ताव मारतोय असे झाले. कोकणी पत्रावळ्यांमध्ये भात आणि आमटीचा स्वाद आजही जिभेवर तरळतो. रात्री गप्पाटप्पा मारत आणि एकमेकांची खेचत झोप कधी लागली तेच कळले नाही.

सकाळी अंथरुणे ओली झाली (.. काहीतरीच काय, दव पडले होते) होती आणि गारठ्याने सर्वांनाच जाग आली. डोळे उघडताच नजर केली ती आकाशाला गवसणी घालणं-या 'प्रचीतगडा'वर धुक्यामधून अधून मधून हा गड आम्हाला खुणावत होता. गडाचे उंच टोक दिसायचे तेव्हा ही उंची पाहून आम्ही तोंडात बोटे घालती पण, धुक्याची झालर हलकीच विरळ होऊन हा गड मान उंचवायचा. गडाची तटबंदी, कडाकपा-यांतून कोसळणारे पाण्याचे छोटे धबधबे-हिरवळ अन काळ्या कपारींचा सुंदर मिलाप लक्ष वेधून घेत होता. सकाळी उठल्यावर रामचंद्ररावांनी गरमागरम चहा आणून दिला. नाक तुटलेल्या त्या कपातील चहाचा पिताना मात्र चहा संपूच नये असे वाटत होते.

नजीकच मोठ्या दगडगोट्यांमधून खळखळ वहाणा-या पाण्याचा आवाज येत होता. या दगडगोट्यांमधील 'नॅचरल कमोड' (दोन-दोन दगडे) निवडून आम्ही प्रातर्विधी ओटोपले. थंडी वाजत असली तरी वाहणा-या थंड पाण्यात आम्ही मनमुराद डुंबत अंघोळी आटोपल्या. गडावर चढण्याची इतकी घाई लागली की, नाश्त्याचे पोहे कधी पोटात गेले ते कळलेच नाही. 'जय शिवाजी.. जय भवानी... ' अशा घोषणा देत एकदाचे 'ट्रेकिंग' सुरू झाले.
सुरुवातीलाच चढण सुरू झाली पण, आजूबाजूला दाट झाडी होती. या झाडीतून पायवाट गेलेली होती. अधुनमधुन गोंधळात टाकणारे फाटे फुटायचे. कोणी भरकटले तर पंचाईत होणार होती म्हणून हा धोका टाळण्यासाठी रामचंद्रराव यांनी सुरुवातीस सर्वांना 'जंगली' भाषा शिकवली. 'जंगली' म्हणजे धोका असल्यास विशिष्ट प्रकारची आरोळी द्यायची. अशा चार ते पाच प्रकारच्या आरोळ्या त्यांनी शिकवल्याच नाहीत तर चांगली तालीम करून घेलती. सुमारे दोन तास चालल्यानंतर डोंगराचा सपाट भाग लागला. येथे दुतर्फा उंचउंच वाळलेले गवत होते. येथून चालत असताना आम्ही दंगा-मस्ती करत होतो. पण, रामचंद्ररावांनी आम्हाला सावध केले. या ठिकाणी पदोपदी धोका होता. कारण या भागात रानडुकरांची संख्या जास्त असल्याने त्यांना पकडण्यासाठी शिका-यांनी चाप (पिंजरा) लावले होते. हा चाप धारधार असल्याने यामध्ये अडकल्यास जीव जातो. शिवाय काही चापांमध्ये दारू भरून ठेवण्यात आल्याने स्फोटही होतो. ही माहिती ऐकतात आम्ही सतर्क झालो आणि प्रत्येक पाऊल जपून टाकू लागलो. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ठिकठिकाणी लावलेले चाप आम्हाला दिसून आले.

ही गडाची पहिली पायरी, वरती दुसरी पायरी असे काहीसे रामचंद्रराव सांगत होते. मात्र, तेव्हा आम्हाला याबद्दल काहीच इंटरेस्ट नव्हता. पुढे घंटाभर चालल्यावर झाडे विरळ होत गेली आणि पुन्हा कठीण जढण आली. दोन्ही बाजूला वाळलेल्या काट्याकुट्यांचा आधार होता. पण, तोही पुढेपुढे कमी होत गेले. चढण वाढत गेली तसे पाय घसरू लागले अचानक आमच्यासमोर असे चित्र उभे राहिले की काळजात एकदम धस्स झाले. दोन्ही बाजूला खोल दरी आणि त्यामधून एक वळण घेत पायवाट पुढे गेली होती. तेव्हा आम्ही 25 टक्केच गड चढलो हे नंतर कळले. आमच्या समोर केवळ दगड आणि कपा-यांतून गेलेली ती पायवाट पाहिल्यावर तर मी पळ काढायचेच निश्चित केले होते. पण, सुमारे तीन ते चार तासांचे आणि तेही दाट जंगलातून आम्ही येथपर्यंत आलो होतो त्यामुळे मागे वळण्याची कल्पनाही मुर्खपणाची होती. पण, पुढे जाणेही शक्य नव्हते. आमची तोंडे बघितल्यावर रामचंद्ररावांना आम्ही घाबरल्याचे जाणवले. 'एवढे वळण झाले की झाले' पुढे घाबरण्याचे काही नाही' असे सांगत त्यांनी धीर देण्याचा प्रवत्न केला. मी तर खाली बसकण मारून एका दगडाला मिठी मारली होती. पायाला कंप फुटला होता. आमच्या चेह-यावरील भाव पाहून मोठ्यांनी 'म्हणून तुम्हाला येऊ नका म्हणत होतो.. ' अशी झाडमपट्टी सुरू केली. आता झक मारत पुढे जावे लागणार याची जाणीव झाली. दगडाच्या आधारेच उठतो तोवरच खोल दरी आ.. करून आमचा घास घेण्यासाठी आसुसली असल्याचा भास झाला. (खरंतर यावेळीच ट्रेकिंगची खाज भागली होती पण, पुढे खूप काही वाढून ठेवले होते)

सुरुवातीला मोन्या आणि रामचंद्रराव पुढे सरसावले. केवळ पाऊण ते एक फुटाची पायवाट, एका बाजूला दगडी कपार आणि दुस-या बाजूला दरी (डोळ्यासमोर चित्र उभे राहिले आणि हे लिहितानाही हात थरथरत आहेत) अशा काळजात धस्स करणा-या पायवाटेवरून भाजीमंडईतून फिरत असल्यासारखे रामचंद्रराव बिनधास्त चालत परतले. आम्ही पुढे जाणार तोवर जोरदार वारे सुरू झाले आणि दरीतून घूं... घूं.. आवाज सुरू झाला. तोंडातून राम.. राम.. राम.. राम.. असे पुटपुटत आम्ही पुढे सरसावलो. 25-30 पावले चालल्यावर आता मागे वळून पाहण्याचीही सोय नव्हती. एक वळसा घालून अशा ठिकाणी येऊन पोहोचलो की, ज्याची आम्ही कल्पनाही केली नव्हती. आता तर चक्कीत चांगलाच जाळ झाला होता. फॉल्स पॉंईंट वरून आपण दरीत कोसणारे धबधबे बघताना आपण बेधुंद होऊन जातो. आता मला सांगा या धबधब्याचे वरचे टोक आणि खालचे टोक याच्याबरोबर मध्ये तुम्हाला नेऊन सोडले तर काय मजा येईल ना. कल्पना केल्यावरच फाटली ना... हो अशीच अवस्था आमची झाली. कारण, कोरड्या पडलेल्या धबधब्यांच्या मधोमध आम्ही येऊन पोहोचलो. आता पुढे जाण्यासाठी येथून वर चढाई करावी लागणार होती. आमच्याकडे दोर वगैरे काहीच नव्हते. आता मात्र, आम्ही संतापलो. मागे दरी आणि वरची चढाई बघून मोठ्यांचीही फॅ.. फॅ.. झाल्याचे जाणवत होते. सारेच फसलो होतो. पावसाळ्यात हा मार्ग बंद असतो. आणि त्यावेळच्या उन्हाळ्यात या मार्गावरून जाणारे आम्ही पहिलेच ट्रेकर्स होतो असे सांगताना रामचंद्ररावही गोंधळल्याचे जाणवत होते. तसे कारणही होते. त्या चढाईवरची नेहमीची दरड कोसळल्याने ही चढण धोकादायक बनली होती. त्या दगडांना हलका हात लागला तरी वरून माती आणि दगडगोटे घरंगळत खाली येऊन थेट दरीत कोसळत होते. आता आली का पंचाईत. (हीच दुसरी पायरी होती)

हार मानणार तो कोकणी माणूस कसला? रामचंद्रराव यांनी कमरेला गुंडाळलेला आणि मानेचा टॉवेल काढला. आमच्याकडून टॉवेल मागून घेतले आणि एकाला एक गाठी मारत त्यांनी 'दोर' बनविला. 'काय व्हायने नाय हो.. ' असे म्हणत दिलासा देत ते दोर घेऊन दगडांचा आधार घेत भराभर वरती चढले. खाली दगड पडत असल्याने 'सांभाळा.. सांभाळा.. ' अशा सूचना ते सातत्याने देत होते. मध्येच थांबून घाम पुसत त्यांनी उसासा घेतला आणि बघताबघता टोक गाठले. एकावर एक करत आमचे 'शूर' सवंगडी सरसावले खरे पण, त्याठिकाणी केवळ पाय टेकण्याइतकीच जागा होती. येथून डाव्याबाजूस दरी सुरू होत होती. मी आणि सुरज्याने एकमेकांना धीर देत कसेबसे चढण पार केले पण, वर जाताच समोर दरी पाहून डोळेच फिरले. खोल दरी आपली पाठ सोडणार नाही याची मनाशी खूणगाठ बांधल्याने भीती काहीशी मोडली होती. एक फुटाच्या पायवाटेवरून चालत असताना डाव्या बाजूस न बघता आम्ही पुढे सरकत होतो.

आमच्या ग्रुपमध्ये फूट पडली होती. पुढे गेलेले काहीजण एका भल्यामोठ्या दगडावरून कशाचाही आधार न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूस दरी होतीच शिवाय तापते ऊन आणि जोराच्या वा-यामुळे समस्या वाढत होत्या. अधून-मधून पायवाटच ढासळल्याने तीन ते चार फुटांवर उडी घेण्याचे धाडस करावे लागत होते. विश्रांती घेण्याची इच्छा असली तरी थांबायला जागाच नव्हती. सुमारे अडीजतास चालल्यानंतर भगवा झेंडा दिसू लागला. गडावर पोहोचल्याच्या जाणीवेने थोडा दिलासा मिळणार तोवर नवे संकट उभे राहिले. गडावर पोहोचण्यासाठी एका डोंगरावरून गडावर एका लोखंडी शिडीवरून जावे लागणार होते. पण, ही केवळ नावाची शिडी होती. एक लोखंडी पाइप दोन्हीकडून मातीत खुपसण्यात आली आहे. आणि कोणताही आधार नसणा-या पाय-यांवर पाऊल टाकताच या पाया-या स्वतः:भोवतीच फिरायच्या. (आता गडावर वेल्डींग कोठून येणार) आता मात्र, खरंच धाडस करायचे होते. आपली काय गय नाही आणि येथून आपण परत जिवंत परत जाऊ शकत नाही, असे वाटू लागले. खालच्या दरीकडे लक्ष न देता आम्ही गडावर कसे पोहोचलो ते देवच जाणे.

वरती गेल्यावर फिरण्या आणि बघण्यासारखे बरेच काही होते मात्र, आता कुणाच्याही अंगात जीव नव्हता. पाण्यासाठी आम्ही विहिरीकडे धावलो तेथील गोड पाण्याने भागलेली तृष्णा आजही समाधान पावते. पण, एकवेळा तेथे मोठे काळे अजगर पाहिले आणि पुन्हा तथे जाण्याची कोणाचीही छाती झाली नाही. गडावर भग्नावस्थेत असलेल्या देवीच्या मंदिराचे आम्ही दर्शन घेतले. काट्याकुट्या गोळा करून स्टोव्हवर खिचडी शिजवली आणि रात्रीचे 'जेवण' करून आम्ही झोपी गेलो.

दुस-या दिवशी सकाळी गारठ्याने हुडहुडी भरली आणि आम्ही जागे झालो. अंग कण्हत होते. प्रत्येकाच्या मनात गड पाहण्याच्या कुतूहलापेक्षा 'आता खाली उतरायचे' या जाणीवेनेचे भीती संचारली होती. येथून घेऊन जाण्यासाठी एखादे विमान आले तर किती बरे होईल अशा पोरकट कल्पना मनात घोळू लागल्या. मला तर खाली उतरण्यापेक्षा खाली उडीच टाकावी असे वाटायचे. बोलाचालीत सगळ्यांनीच आपली भीती व्यक्त करीत आलेल्या मार्गावरून उतण्यास नकार दिला. रामचंद्ररावांकडे दुस-या मार्गाबाबत विचारले तर ते म्हणाले जाता येईल पण, दोन-तीन दिवस जंगलातून जावे लागेल. आम्ही लगेचच तयारी दाखवली आणि परतीचा प्रवास सुरू झाला. त्या शिडीवरून खाली उतरायचे 'जीवा'वर आले होते. कसेबसे आम्ही खाली आलो आणि डाव्या हाताच्या पायवाटेने जंगलात घुसलो. दाट झाडीतून डोंगर चढायचे आणि उतरायचे. असे करत करत आम्ही घनदाट जंगलात दाखल झालो.

असे टिपीकल जंगल मी कधीच पाहिले नव्हते. जागोजागी जनावरांच्या विष्ठेचा वास येत होता. एके ठिकाणी तर पालापाचोळ्यात पाय गेल्यावर आम्ही कमरेइतक्या खड्यात गेलो. त्यातून हिरवे साप बाहेर पडू लागले. मोठमोठ्याने किंचाळत बाहेर पडतो तोच माकडांची टोळी कोठून दाखल झाली कुणास ठाऊक. या टोळीने आमच्यावर हल्ला चढविला. या रानटी माकडांकडूनही धोका असल्याचे लक्षात येताच आम्ही पळ काढला. दुपारचे दोन वाजले असतील पाणी संपत होते आणि आम्ही कमालीचे थकलो होतो. पाण्याचा कोठेच ठावठिकाणा नव्हता. एकाच बाटलीत पाणी शिल्लक होते आणि त्याचा ताबा मोन्याने घेतला. जो जास्त बॅगा वागवेल त्याला एक टोपण पाणी देण्याचा निर्णय त्याने घेतला.

पायात चालण्याचा त्राण नसताना पाण्यासाठी ओझे घ्यावे लागत. अचानक आम्हाला पाण्याचे एक डबके दिसले आणि खांद्यावरील बॅगा झटकून सर्वचजण त्या पाण्याकडे धावलो. खरेतर ते डबकेही आटले होते आणि उरल्या पाण्यामध्ये जनावरांची विष्ठा तरंगत होती. मात्र, आम्हाला केवळ पाणी दिसत होते. विष्ठा दूर करून आम्ही त्या पाण्यावर ताव मारला. (खरंतर यावेळी आम्हाला पाण्याची किंमत कळली) जाताना करवंदाच्या जाळ्यातील करवंदे, जांभूळ आणि कच्च्या कै-यांवर आम्ही ताव मारत होतो. सायंकाळी आम्ही निवळी या जंगलात मधोमध वसलेल्या गावात (लोकवस्तीत) पोहोचलो पण, येथे गेल्यावरच जे चित्र पाहिले त्यामुळे भीतीने परिसीमाच गाठली. काही वेळापूर्वीच त्याठिकाणी वाघाने हल्ला केला होता. गायीच्या बछड्याला ओढत जंगलात नेल्याच्या खुणा ताज्या होत्या. या झटापटीत वाघाने एका व्यक्तीवरही हल्ला केला होता. विशेष म्हणजे ज्या मार्गावरून त्याने बछड्याला फरफटत नेले होते त्याच मार्गावरून दुस-या दिवशी आम्हाला जायचे होते. रात्रभर गायीचा हंबरडा ऐकून आम्हालाही झोप आली नाही.

सकाळी उठल्यावर तेथील व्यक्तीने आम्हीला ताजी माडी आणून दिली. माडी म्हणजे काय हे माहीत नव्हते आणि भुकेने जीव व्याकुळ झाल्याने आम्ही तांब्यावर माडी प्यायलो. त्यानंतर मात्र, माडीच्या धुंदीत आमची पावले झपाझप पडू लागली. थोडे पुढे गेल्यावर झरा दिसला. मनसोक्त डुंबून झाल्यावर गरमागरम खिचडी खाल्ली आणि पुढील प्रवास सुरू झाला. मात्र, हा आनंद काही काळच होता. रामचंद्रराव यांना पुढील रस्ता माहीत नसल्याने त्यांनी निवळीतून 'वाटाडे' सोबतीला घेतले. तीन-चार तास चालल्यानंतर सायंकाळ झाला आणि आम्ही रस्ता भरकटल्याचे लक्षात आले. वाटाडे जोडप्यांनाही काही सुचेना. याचवेळी गवा रेड्यांचा मोठा कळप आमच्याकडेच येत असल्याचे आम्हाला दिसले. गव्यांचे लीद आणि चिखलात रुतलेल्या त्यांच्या पायांचे ठसे
पाहूनच त्यांच्या भव्यतेचा अंदाज येत होता मात्र, तेच गवे कळपाने आमच्यासमोर दिसत होते. येथील गवे पिसाळले आहेत आणि ते माणसांवर हल्ले करतात असे म्हणत वाटाड्यांनी पळ काढला' माझ्या दृष्टीने सर्व काही संपले होते. भीतीने थरकाप उडला होता. रामचंद्रराव यांनी प्रसंगावधान दाखवत आम्हाला नजीकच्या टेकडीवर नेले. सूर्य मावळत होता. प्रत्येकाच्या चेह-यावर थकवा आणि भय स्पष्ट जाणवत होते. एका कोरड्या पडलेल्या नदीच्या काठाला आम्ही विसावलो होतो. गव्यांचे भय कमी झाले पण, तेवढ्यात झुडपांचा आवाज सुरू झाला आणि त्यातून गव्याचे शिंग बाहेर आले. मुली किंचाळल्या. कोल्हापूच्या संज्याने मेलेल्या गव्याच्या सडलेल्या कंकालातून शिंग तोडून आणले होते. याचठिकाणी रात्र काढण्याचा निर्णय झाला आणि खाणेपिणे झाले आणि चारीबाजूंनी आग लावून आम्ही गप्पा मारत बसलो. रात्री प्राण्यांचे आवाज ऐकू येत होते.

दुस-या दिवशी आग विझली होती आणि सर्वजण गाढ झोपेत होतो. नकळत आम्ही धाडस केले होते. खांद्याला बॅगा लादून पुन्हा चालणे सुरू झाले. डोंगरावरून नागमोडी वाटांमधून न जाता शॉर्टकट म्हणून ज्या दिशेला जायचे तेथे घसरगुंडी करत जाणे सुरू केले. आमच्याकडचे खाण्याचे साहित्यही संपत आले होते. पण, हळूहळू दाट झाडी विरळ होत चालली आणि कौलारू घरे नजरेस पडू लागली. तरीही अजून खूप पायपीट करायची होती. दाट जंगलानून वरती टेकाडावर आल्यावर ज्वालामुखीचे दगडातून चालायला लागायचे. नजर जाईल तेथपर्यंत हे दगड दिसायचे त्यामुळे भरकटण्याची भीती असायची. तीन चार तास चालल्यानंतर एका उतारावरून घसरतच खाली उतरलो आणि थेट शृंगारपूरात दाखल झालो.

ट्रेकिंग म्हणून आमची हौस भागलीच पण, या तीन दिवसांनी आम्हाला जगणं शिकवलं. पाण्याचे महत्त्व कळले आणि मुख्य म्हणजे एकीचे महत्त्वंही कळले. शृंगारपूरला अलविदा म्हणताना वर नजर फिरवत 'प्रचितगड' डोळ्यात साठवून घेतला, पुन्हा इकडे न फिरकण्याची शपथ घेत.