विरेंद्र सेहवागचा २१९ धावांचा विक्रम
विरेंद्र सेहवागचा वनडे क्रिकेटमध्ये २१९ धावांचा विक्रम २०११ मधील क्रिडा क्षेत्रातील प्रमुख घटना होय. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हे दुसरे वनडे द्विशतक होय. याअगोदर सचिन तेंडुलकरने २०१० मध्ये हा विक्रम केला होता. हे दोन्ही विक्रम मध्यप्रदेशात झाले असून पहिला ग्वाल्हेरला तर दुसरा इंदूरला झालेला आहे. ८ डिसेंबरला वेस्ट इंडिजविरूद्धच्या वनडे सामन्यात सेहवागने २०८ चेंडूत २१९ धावा करताना २५ चौके ७ षट्कारांची आतिषबाजी केली. होळकर स्टेडियममध्ये उपस्थित दर्शक या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले. सेहवागने विंडीज गोलंदाजीची पीसे काढताना मनसोक्त फटकेबाजी केली. प्रेक्षकांच्या नजरेचे त्याने अक्षरश: पारणे फेडले. दर्शकांना त्याने अगोदरच्या फटक्याचा रिप्ले बघण्याचीही उसंत मिळू दिली नाही. एकाहून-एक सरस फटके खेळत त्याने संपूर्ण वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. मैदानात उपस्थित दर्शक त्या वातावरणात दंग होऊन गेले होते. आपण खरोखरचा सामना बघतोय कि स्वप्नात आहोत, हेच त्यांना कळत नव्हते. धडाकेबाज फटकेबाजी हे सेहवागच्या फलंदाजीचे वैशिष्ट्यच आहे. मैदानात उतरल्यावर प्रत्येक चेंडूवर धावा करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. समोरचा गोलंदाज किती श्रेष्ठ आहे आणि त्याचा चेंडू किती उत्तम आहे, याचे त्याला काही देणेघेणे नसते. चांगल्यात चांगल्या चेंडूवर तो फटकेबाजी करतो. त्याच्या फटकेबाजीस सुरूवात झाली की प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आणि गोलंदाजांनी फक्त बघत राहायचे असते. त्याच्या तडाख्यासमोर व्युहरचना नेस्तानाभूत होते. गोलंदाजांना नेमका कोठे चेंडू टाकावा हे समजत नाही. त्या दिवशी डॅरेन सॅमी आणि त्याच्या सहकार्यांचेही असेच झाले. सेहवाग हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात खतरनाक फलंदाज असून एकहाती सामना बदलण्याची क्षमता त्याच्यात आहे. तो खेळपट्टीवर असेपर्यंत नेहमी सामना हा भारताच्या हातात असतो. टेस्ट क्रिकेटमध्ये दोनदा त्रिशतक झळकवणारा हा पहिला भारतीय फलंदाज होय. पहिले त्रिशतक त्याने पाकविरूद्ध तडकावले. मुल्तान येथे २८ एप्रिल २००४ मध्ये त्याने ३०९ धावा केल्या होत्या. तेव्हापासून 'मुल्तानचा सुल्तान' म्हणून त्यास संबोधण्यात येते. यानंतर २६ मार्च २००८ रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध चेन्नईत ३१९ धावांची तडाखेबंद खेळी त्याने केली होती. फक्त ब्रायन लारा, ख्रिस गेल, डॉन ब्रॅडमन आणि सेहवाग हेच फलंदाज सर्वाधिक वेळ ३०० आकडा पार करू शकलेले आहेत. ब्राव्हो सेहवाग!