बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|

अवघ्या देशाने केला शहिदांना सलाम

ND
ND
मुंबईत गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त आज देशभर शहिदांना सलाम करण्यात आला. संसदेपासून क्रिकेटच्या मैदानापर्यंत सर्वांनी शहिदांची आठवण जागवली.

लोकसभेत गुरूवारी मुंबई हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराधांसाठी दोन मिनिटाचे मौन पाळण्यात आले. संसदेत रक्तदान शिबिरही झाले. त्यात अनेक राजकीय नेत्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवरही रक्तदानासाठी मोठी रांग लागली होती.

कानपूरमध्ये सुरू असलेल्या श्रीलंकेविरूद्धच्या दुसर्‍या क्रिकेट कसोटीतही भारतीय संघाने दोन मिनिटांचे मौन पाळून शहिदांना आदरांजली अर्पित केली. यावेळी ग्रीन पार्क स्टेडियमवर शहिदांच्या स्मृती जागविणारे बॅनर्सही दिसत होते.

उत्तर प्रदेश क्रिकेट संघाने गुरूवारी पन्नास अनाथ मुलांना हा सामना मोफत पाहण्याची संधी दिली. तत्पूर्वी या मुलांनी सकाळी नऊ वाजता हातात मेणबत्ती घेऊन संचलन केले.

वाळू शिल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या ओरिसाच्या सुदर्शन पटनायकने भुवनेश्वमध्ये वाळूच्या माध्यमाने शिल्प तयार करून मुंबई हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली अर्पित केली. मुंबईच्या ताज हॉटेलची सात फूट उंच प्रतिकृती त्याने तयार केली असून दहशतवादाला रोखा असा संदेश त्यावर दिला आहे.