मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By नितिन फलटणकर|

मुंबई हल्ल्याचा 'प्रसार' आणि माध्यमं

- नितीन फलटणकर

WD
WD
मुंबई हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या हल्ल्याची विदारकता जगभराने अनुभवली आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून देशावर होणारा लाइव्ह हल्ला सारे पाहत होते. हा हल्ला मुंबईत झाला असला तरी टेलिव्हिजनवर दाखवण्यात येणार्‍या फुटेजमुळे जणू हा हल्ला आपल्या आसपासच होत असल्याचा भास प्रत्येकालाच होत होता.

एका वर्षानंतरही परिस्थिती कायम आहे. या हल्ल्याच्या निमित्ताने सरकारी यंत्रणेतील फटी माध्यमांनी दाखविल्या. पण त्याचवेळी माध्यमांनी या हल्ल्यात निभावलेली भूमिकाही चर्चेत आली आहे. माध्यमांना देशात अवास्तव महत्त्व आणि अधिकार मिळाल्याचे आरोपही या दरम्यान झाले.

मुंबईवर हल्ला झाला तो दिवस आजही माझ्या आठवणीत आहे. रात्रीची वेळ असेल पिसी शट डाऊन करून जाण्याच्या तयारीत मी होतो, इतक्यात माध्यमांनी ब्रेकींग दाखवण्यास सुरुवात केली. मुंबईमध्ये 'गँगवॉर', 'ताजजवळ शुट आऊट'.
WD
WD


सुरुवातीला हा हल्ला गँगवॉर असेल असे साऱ्यांनाच वाटले होते. काही चॅनल्सनी तर दाऊद आणि राजन टोळीच्या काही गुंडांचा परस्पर उल्लेखही करण्यास सुरुवात केली होती. परंतु काही क्षणातच हा दहशतवादी हल्ला असल्याचे स्पष्ट झाले.

इंदूरमधून आमच्या टीमने मुंबई हल्ल्यांचे सेकंदा-सेकंदाचे कव्हरेज दिले. टीम हल्ल्यांच्या बातम्यांनी हवालदिल झाली होती, पण मिडिया हा कोणत्या वेळी किती प्रभावी ठरू शकतो हे आम्हाला या वेळी स्पष्ट जाणवत होते. माध्यमांमध्ये जणू चढाओढच लागली होती. एक चॅनल मृतांचा आकडा 60 दाखवत होते, दुसरे शंभर तर तिसरे आणखी काही.

WD
WD
हल्ल्याची माहिती मिळेपर्यंत चॅनल्स पाहणार्‍यांना माध्यमांच्या तत्परतेचा अभिमान वाटला असेल, परंतु कालांतराने माध्यमांनी दाखवण्यास सुरुवात केलेल्या फुटेजने सारेच अवाक झाले.

देशात झालेल्या हल्ल्यांचे 'लाइव्ह' फुटेज, आमचा प्रतिनिधी घटनास्थळी जाऊन आपल्यासाठी कव्हरेज करत आहे, आम्ही सर्वप्रथम आपल्याला ही माहिती दिली. पोलिस बळ किती आहे, आता एनएसजी येणार, लष्कराने ताज आणि नरिमन हाऊसला वेढा दिला या बातम्या चॅनल्सवर फिरू लागल्या. माध्यमांच्या या ब्रेकींगच्या नादात आत लपलेल्या दहशतवाद्यांना किती फायदा झाला हे स्पष्ट आहे.

पुढे ही बाब कुणाच्या तरी लक्षात आली नि सरकारनेच लाईव्ह प्रक्षेपणावर प्रतिबंध घातला. तरीही काही चॅनेलवाले ब्रेकिंग न्यूज मिळविण्याच्या नादात पुढे पुढे करतच होते. ब्रेकींगचे भूत त्यांच्या मानगुटावर इतके वरचढ झाले होते, की आपण काय करतोय, दहशतवाद्यांना साथ देतोय याची साधी जाणीवही त्यांना झाली नाही. माध्यमांच्या भीतीने पोलिसांनीही त्यांना विरोध केला नाही. उगाच लफडं नको म्हणून अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी माध्यमांना ताज आणि नरिमनचे चित्रीकरण करण्यापासून मज्जाव केला नाही.

एनएसजी प्रमुख दत्ता आणि भारतीय लष्कराने ताज परिसराचा ताबा घेतल्यानंतर आधी मिडियाला या भागातून दूर केले. माध्यमांना कव्हरेज न दाखवण्याची विनंती करण्यात आली. यानंतरच आतमधील दहशतवाद्यांना जणू टिप्स मिळणे बंद झाले आणि त्यांचा खात्मा करण्यात एनएसजी कमांडोना यश आले.

वास्तविक पाहता माध्यमांना या सार्‍या प्रकरणापासून दूर ठेवले असते तर करकरे आणि साळसकर यांसारखे जिगरबाज अधिकारी बचावले असते असेही या काळात बोलले गेले. करकरे आणि साळसकर आता कोठे जाणार, त्यांच्याकडे शस्त्रे कोणती, सोबत कोण आहे, याची इत्थंभूत माहिती चॅनल्सवाले दाखवत होते. याचाच फटका त्यांना बसला.

बातमी आणि तिच्या परिणामापेक्षा आज एखादी बातमी आपण किती जलद गतीने उघड करू शकतो याचा छंदच माध्यमांना लागला आहे. त्यामुळे आपली सुरक्षा यंत्रणा धोक्यात सापडते आहे. मुंबई हल्ल्यातून हेच स्पष्ट झाले. प्रसार माध्यमांनी या काळात केलेल्या कामगिरीचे कौतुक करावे का त्यांना याचा जाब विचारावा हे एक कोडेच आहे. या काळात माध्यमांची भूमिका एखाद्या कसलेल्या व्यापार्‍यासारखी होती.
WD
WD


अमेरिकेतील 9/11 चा हल्ला झाल्यानंतरचे एकतरी फुटेज आपल्याला आठवते का? वर्ल्ड ट्रेड सेंटर पडल्यानंतर तेथील माध्यमांनी केवळ विमानांच्या टकरी वगळता इतर कोणतेही कव्हरेज न दाखवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना ब्रेकिग न्यूजपेक्षा देशावर झालेल्या हल्ल्यावेळी सामान्यांच्या भावना महत्त्वाच्या वाटल्या होत्या.

भारतीय माध्यमांनी मात्र या उलट काम मुंबई हल्ल्यादरम्यान केले. माध्यमांनी आपल्या तत्त्वांमध्ये बदल केले आहेत, का याचे व्यावसायिकरण झाल्याने त्यांची तत्त्वे लवचिक झालीत हा यक्षप्रश्न आहे.