शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 सप्टेंबर 2021 (20:43 IST)

पुराणातील गणेश

विघ्नहर्त्याचे प्रकटीकरण, त्यांच्या लीला, स्तुती व भक्तीचे वर्णन जवळपास सर्व पुराणांमध्ये आढळते. उपलब्ध वर्णनांचे सार काढून एका लेखात सामावणे अशक्य कोटीतील काम आहे. वाचकांसाठी पुराणांच्या नावांसहित संक्षिप्त वर्णन खाली देत आहोत.
 
पद्य पुराण : यामध्ये पार्वतीच्या मळापासून भगवान गणेशाचे गजमुखाच्या रूपातील प्रकटीकरणाचे वर्णन आहे. पवित्र गंगा मातेने त्यांना पुत्र मानल्याचा उल्लेख आहे. अर्थात म्हणूनच गणेशास गांगेय नावानेही संबोधण्यात येते. सोबतच त्याच्या लीलेचेही वर्णन आहे. 
 
शिवपुराण : विघ्नहर्त्याची श्र्वेत कल्पात उत्पत्तीची कथा, गणेशाचे भगवान शंकराच्या गणांसोबतच्या अद्भूत युद्धाचे वर्णन आढळते. ‍शंकराच्या त्रिशुलाने लंबोदराचे डोके उडवल्यानंतरचा वृत्तांत, यानंतर व्यथित झालेली पार्वती, शंकराने गजमुखास पुन्हा जिवंत करेपर्यंतचा वृत्तांत यात आहे. याशिवाय गणेशाच्या बाललीला, गणपती विवाह, नाराज झालेला कार्तिकेय या प्रसंगाचे वर्णन आढळते.
 
महाभारत : महाभारताची कल्पना संपूर्णपणे डोक्यात स्पष्ट झाल्यानंतर व्यासमुनी विचारात पडले. कारण एवढ्या विस्तृत ग्रंथाची रचना झाली पण त्याचे लेखन करणार कोण? असा प्रश्न त्यांना पडला. भगवान गणेशाने प्रसन्न होऊन त्यांचा लेखनिक होण्याचे मान्य केले. मात्र, 'सांगताना एकही क्षण थांबू नये या ह्या अटीवरच. व्यासांचे ग्रंथ लेखनाचे आमंत्रण विघ्नहर्त्याने स्वीकारण्यापर्यंतचा वृत्तांत यात आहे. यानंतर गणेशाचे संपूर्ण ग्रंथ लिहून पूर्ण करण्यापर्यंतचा वृतांत त्यात आहे.
 
बृह्यवैवर्त्त पुराण : या पुराणात भगवान गणेशाच्या प्रकटी करणाअगोदरचा रोमहर्षक वृत्तांत आढळतो. पुत्रप्राप्तीसाठीच्या पुण्यक व्रताचे त्यात विस्ताराने वर्णन आहे. भगवान शंकराने पार्वतीस पुत्रप्राप्तीसाठी हा मंत्र सांगितला होता. पार्वतीने पुत्र प्राप्तीच्या इच्छेसाठी केलेले पुण्यक व्रत, पूर्णाहूती अगोदर ब्राह्मणाचा दक्षिणेसाठी आग्रह, पार्वतीची अशक्य कोटीतील दक्षिणा देण्याची तयारी, असे प्रसंग यात आहेत. पूर्णाहूती नंतर ब्राम्हणाने दक्षिणेच्या रूपात साक्षात भगवान शंकराची घातलेली मागणी, पार्वतीने अशक्य कोटीतील दक्षिणा देणे, आणि व्रताच्या प्रभावामुळे विघ्नहर्त्याची निर्मिती हे प्रसंग रोमहर्षक आहेत.
 
याप्रमाणेच लिंग पुराण, भविष्य पुराण यासारख्या अनेक पुराणात वर्णन सापडते. साक्षात विघ्नहर्त्याच्या नावानेच श्री गणेश पुराणही उपलब्ध आहे.