सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

ओंकारातील गणराय

WD
गणपती हा आदिदेव आहे. त्याने प्रत्येक युगात वेगवेगळा अवतार घेतला आहे. त्याच्या शारीरिक रचनेतही खोल अर्थ दडला आहे. शिवमानस पुजेत श्री गणेशास प्रणव (ॐ) मानले गेले आहे. या एकाक्षर ब्रह्मात वरचा भाग म्हणजे गणेशाचे मस्तक, खालचा भाग उदर, अर्धचंद्र लाडू व मागची अर्धवर्तुळाकार रेघ म्हणजे त्याची सोंड असे म्हटले गेले आहे.

चार दिशांचे प्रतीक म्हणजे गणेशाचे चार हात आहेत. हा गणेश लंबोदर आहे, कारण सर्व सृष्टी त्याच्या उदरात आहे. त्याचे मोठे कान म्हणजे त्याची ग्रहणशक्ती आणि छोटे डोळे म्हणजे सूक्ष्म आणि तीक्ष्ण दृष्टीचे तर लांब नाक त्याच्या बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.

प्राचीन काळी सुमेरू पर्वतावर सौभरि ऋषींचा आश्रम होता. त्यांची रूपवान व पतिव्रता मनोमयी नावाची पत्नी त्यांच्याबरोबर रहात होती. एकदा ऋषी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी जंगलात गेले. मनोमयी गृहकामात व्यग्र होती. त्याचवेळी क्रौंच नावाचा कामातूर गंधर्व तिथे आला. मनोमयीच्या अप्रतिम लावण्यावर तो फिदा झाला. कामविव्हल क्रौंचाने मनोमयीचा हात पकडला. त्याच्या पकडीत आलेल्या त्या ऋषी पत्नीने त्याच्याकडे दयेची भीक मागितली. पण त्याला कामेच्छेपुढे काहीच सुचेना. तेवढ्यात सौभरी ऋषी तिथे आले. त्यांनी गंधर्वाला शाप दिला. 'तू माझ्या पत्नीचा हात एखाद्या चोरासारखा येऊन पकडला. त्यामुळे तो उंदिर होऊन जमिनीखाली रहाशील आणि चोरी करूनच तुला तुझे पोट भरावे लागेल'.

क्रौंचाला आपली चुक उमगली. त्याने ऋषींकडे क्षमायाचना केली. आपली चुक मान्य केली. ऋषी म्हणाले, माझा शाप व्यर्थ जाणार नाही. परंतु, द्वापार युगात महर्षी पाराशरांकडे श्री गणेश गजमुख पुत्र या रूपात प्रकट होशील. त्यावेळी तू त्यांचे वाहन बनशील. देवही तुझी पूजा करतील.