सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

कलेचा अधिपती कलावंतांच्या घरी

किरण जोशी

WD
गणपती बाप्पा मोरया... च्या गजरात आपणास थिरकायला लावणार्‍या नाट्‍य-चित्रपट सृष्टीतील कलाकार मंडळींच्या उत्साहाला गणरायाच्या आगमनाने उधाण आले आहे. 'बिझी शेड्युल' मधून वेळ काढून ही मंडळी गणपतीचे स्वागत करत आहेत. काही आरास सजविण्यात गुंतले आहेत, कुणी पारंपरिक पध्दतीने उत्सव साजरा करणार आहेत, मुले जवळ नसल्याने त्यांना 'मिस' केले जात आहे तर कुणाच्या घरी यंदा पहिल्यांदाच गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येत असल्याने उत्साह अन् उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. काही कलेतूनच गणेशवंदना करणार आहेत. गणपती उत्सवाबाबत प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या भावना आहेत. या भावना जाणून घेण्याच्या प्रयत्न 'वेबदुनिया' ने केला आणि कलाकारांनी आपल्या उत्कट भावना व्यक्त केल्या. त्या त्यांच्याच शब्दात...

मोहन जोशी -
दरवर्षी जोशी कुटुंब एकत्र जमून गणेशोत्सव साजरा करते. गणेशोत्सवावेळी दोन्ही मुले घरीच असायची त्यामुळे अधिक उत्साह असायचा. यंदा मात्र, दोघेही परदेशी असल्याने त्यांना 'मिस' करीत आहोत. पण तरीही आम्ही पती-पत्नी तेवढ्याच उत्साहात उत्सव साजरा करणार आहोत. उत्सवाच्या निमित्ताने सर्व कुटुंब एकत्र येत असते. त्यामुळे एकच धमाल येते. मी ही शुटींग, दौरे आटोपते घेऊन दोन दिवसांची सुटी घेतो. आरास सजावट, इतर तयारी मुले करतात पण, माझाही त्यात सहभाग असतो. आमच्याकडे दीड दिवसांच्या गणपतीची परंपरा आहे. दोन दिवस घरी असल्याने नातेवाईक, शेजारी भेटीगाठीसाठी येतात. गप्पाटप्पा होतात. गणपतीच्या प्रतिष्ठापनेनंतर शेजारचे मुस्लिम कुटूंबही दरवर्षी न चुकता दर्शनासाठी येते. सध्याही माझे दौरे सुरू आहेत. पण, मंगळवारी सायंकाळपर्यत मी घरी पोहचणार आहे. अगदी विधीपूर्वक पारंपरिक पध्दतीने गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहे.

ऐश्वर्या नारकर -
सर्वसामान्य मराठी कुटुंबाप्रमाणेच माझ्या घरीही श्रध्देने गणपती उत्सव साजरा केला जातो. उत्सवाची ओढ मलाही लागलेली असते. आम्ही नारकर कुटूंब एकत्र जमून हा उत्सव साजरा करत असल्याने मजा येते. घरचा गणपती दहा दिवसांचा असतो. हे दहा दिवस मी घरातच असते. पंचखाद्य, उकडीचे मोदक तसेच दहा दिवसांत वेगवसगळे पदार्थ मी स्वत बनवते. डोंबिवलीत माझ्या आईकडेही गणपतीची पारंपरिक पध्दतीने प्रतिष्ठापना केली जाते. तेथेही मी जाते. उत्सवकाळात लालबागचा राजा गणपतीच्या दर्शनासाठी आम्ही न चुकता जातो. देखावे पहाण्याचेही प्लॅनिंग असते.

अंकुश चौधरी-
माझ्यासाठी गणपती उत्सव आकर्षण असते. पण, याचवेळी नाटक, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी दौरे सुरू असल्याने हा उत्सव घरगुती स्वरूपात साजरा करण्याची बहुधा कमीच संधी मिळते. मावशी व आजीकडे गणपती बसवला जातो. मी दादर आणि काळाचौकी या दोन्ही ठिकाणीही जातो. शक्यतो पहिल्या दिवशी उपस्थि‍त रहाण्याची माझा प्रयत्न असतो. उत्सवकाळात सिध्दीविनाकाचे दर्शन न चुकता घेतो. दौर्‍यात उत्सवावर आधारीत कार्यक्रम होतात. त्यामुळे धमाल येते. पुण्यातील प्रसिध्द दगडूशेठ हलवाईच्या महोत्सवात सलग पाच वर्षे 'महाराष्ट्राची लोकधारा' हा कार्यक्रम सादर केला. असेच कार्यक्रम यावर्षीदेखील करीत आहे.

प्रदीप पटवर्धन -
माझ्या घरी गणपती बसवला जात नाही. परंपरेप्रमाणे चुलत भावाच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. उत्सवात लालबागचा राजा आणि सिध्दीविनायकाला नेमाने जातो. भावाच्या घरी पहिल्या दिवशी जाऊन गजाननाचे दर्शन घेऊन येतो. गणपतीमुळेच माझी कलाकार म्हणून ओळख झाली. त्यामुळे मी गणपतीला विशेष मानतो. मराठी नाट्य - चित्रपट सृष्टीची स्थिती मुळातच हलाखीची आहे. निर्माते वर्षानुवर्षे नुकसान सोसत आहेत. निर्माता जगला तरच आम्ही कलाकार जगणार आहोत. उत्सवकाळात नाटक, कार्यक्रमांना जोरदार मागणी असते. त्यामुळे कलेतूनच गणपतीची आराधना करणे मी कर्तव्य समजतो.

श्रेयस तळपदे -
गणपती उत्सव म्हटले की, मराठी मन जेवढे आनंदीत असते तेवढाच आनंद मला असतो. घरचा गणपती गिरगावला असायचा मात्र, यंदा माझ्या घरी गणपतीची बसवला जात असल्याने मी कमालीचा उत्साहीत आहे. गावात गणपती असताना आम्ही भावंड मिळून तयारी करायचो. आता कामाचा व्याप वाढला असला तरी माझ्या घरी गणपती येत असल्याने मी सुट्टी घेतली आहे. मी स्वत आरास सजावट करणार आहे. अलीकडच्या काळात गणसशोत्सवाचे रूप बदल‍त चालले आहे. मॉडर्न पध्दतींचा अवलंब होऊ लागला आहे. मात्र, आम्ही शास्त्रशुध्द पध्दतीने पुजा-विधींसह गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करणार आहोत. पाच दिवस उत्सव साजरा करणार आहोत.

अलका कुबल -
माझ्या घरी अगदी पारंपरिक पध्दतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. ठाण्याला गोरेगावला आठल्ये कुटुंबात आम्ही सर्वजण एकत्र जमून उत्सव साजरा करतो. घरचा गणपती दीड दिवसांचा असतो. मी दोन दिवस सुटटी घेते. स्वतः पदार्थ तयार करून नेवैद्य दाखविते. आम्ही सर्व कलाकार एकमेकांचे चांगले मित्र आहोत पण, प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने महिनोंमहिने भेट होऊ शकत नाही. उत्सवाच्या निमित्ताने आम्ही एकत्र येतो, भेटीगाठी होतात. नवे ऋणानुबंध जोडले जातात. उत्सव साजरा करण्याठी मी माहेरीही जाते.