सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

पर्यावरण सुसंगत गणेशोत्सव

WD
अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 1993 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रात गणेश मूर्तींसाठी वापरलेले निर्माल्य गोळा करण्याचे अभियान सुरू केले. राज्यभर या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाची दखल राज्य सरकारलाही घ्यावी लागली आणि आता जवळजवळ सर्वच महानगर पालिका, नगरपालिकांमध्ये अंनिस आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे अभियान राबविले जात आहे. असे असले तरीही आजही केवळ 1/3 निर्माल्य गोळा होते. उर्वरित निर्माल्य गोळा करण्यासाठी अंनिसचे प्रयत्न आजही सुरू आहेत.

राज्यात अंधश्रद्धा निर्मूलनासोबतच पर्यावरण रक्षण व संवर्धनातही गेल्या 15 वर्षांपासून अंनिसचे कार्य सुरू आहे. गणेशोत्सवाच्या काळात गणपतीला वाहिलेली फुले व निर्माल्य नदीत न टाकता ती एका ठिकाणी गोळा करून त्याचे चांगल्या प्रतीचे खत तयार करता येऊ शकेल. त्याचा शेतीसाठी वापर करता येईल असा अंनिसचा प्रयत्न आहे. या माध्यमातून नदीच्या पाण्यातील प्रदूषण रोखण्यासाठीचाही प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमास आता सर्वच ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे.

राज्यात 1 कोटी 80 लाख कुटुंबे आहेत. त्यापैकी सुमारे 1 कोटी कुटुंबात गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. या सर्व मूर्ती साधारणता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) बनविलेल्या असतात. प्रत्येक मूर्तीचे सरासरी वजन 2 किलो असल्याचे गृहीत धरले तर सुमारे 2 कोटी किलो पीओपी विसर्जनानंतर गाळात दगडासारखे घट्ट होते. त्यामुळे विहिरी, तळी, ओढे आणि पाट यातील जिवंत झरे बंद होतात. हे कमी की काय म्हणून या मूर्ती रंगविण्यासाठी या रंगांमध्ये मर्क्युरी आणि लीड घटकांचा समावेश असलेल्या रंगांचा वापर केलेला असतो. त्यामुळे जलप्रदुषण रोखण्यासाठी 1998 पासून अंनिसने उत्तरपूजा केलेल्या व धार्मिक अर्थाने देवत्व संपलेल्या गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित न करता केवळ तीन वेळा बुडवून दान करा अभियान राबविले. त्या मूर्तींची नंतर व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची योजना राबवून 'मूर्ती दान करा' अभियान राबविले. या अभियानासही चांगला प्रतिसाद मिळाला.

या अभियानास सर्वोच्च न्यायालयाचेही योगदान मिळाले असून 2005 साली न्यायालयाच्या मॉनिटरींग कमिटीने सर्व राज्यातील प्रदूषण नियंत्रण मंडळांना प्रदूषण नियंत्रणासाठी योग्य काळजी घेतली जात नसल्याचे लक्षात आणून दिले. त्याची दखल घेऊन आता या मंडळांच्या आदेशानुसार जवळपास सर्वच महानगरपालिका विसर्जनासाठी पर्यायी हौदाची सोय करू लागल्या आहेत. एकट्या पुण्यात अशा 90 हौदांची व्यवस्था केली जात असते.

मात्र, अंनिसने या प्रश्नाची योग्य सोडवणूक होण्यासाठी मातीची किंवा लगद्याची मूर्ती तयार केली जावी आणि ती नैसर्गिक रंगांनी रंगविलेली असावी, अशी याचिका औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे. धर्मशास्त्रातही मूर्ती पार्थिवाची म्हणजे पृथ्वीपासून बनलेली म्हणजेच मातीची असावी असे सांगितले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळानेही त्यास पाठिंबा दर्शविला असून येत्या 3-4 महिन्यात त्याबाबतचा निर्णय मिळणे अपेक्षित आहे. सध्या अंनिस आणि केंद्राच्या हरित सेना प्रकल्पातील शाळांच्या 4 लाख विद्यार्थ्यांनी इको फ्रेंडली मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. या माध्यमातून किमान 1 लाख गणेश मूर्ती स्थापनेचा आमचा प्रयत्न राहणार आहे.

गणेशोत्सव अधिक पर्यावरण सुसंगत होण्यासाठी थर्माकोल, गुलाल वापरण्यावरही नियंत्रण असावे असा अंनिसचा आग्रह आहे. दुर्दैवाने जनतेच्या आणि पर्यावरणाच्या भल्यासाठी अंनिसने सांगितलेल्या या गोष्टी तथाकथित धर्म संघटनांना मान्य नाही. आपल्या भावी पिढीला स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण देण्यासाठी आणि गणेशोत्सव अधिकाधिक पर्यावरण सुसंगत करण्यासाठी आपण सारे मिळून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
(शब्दांकन- विकास शिरपूरकर)