शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

विधायक गणेशोत्सव

श्रावण संपत आला की गणपतीचे वेध लागायला लागतात. गणपती, गौरी (महालक्ष्मी) हा कोकणातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात दिवाळी इतकाच किंबहुना त्याहीपेक्षा महत्त्वाचा सण मानला गेला आहे. टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं लोण दिवसेंदिवस पसरतच चाललंय, राजकारण्याने तर ह्या उत्सवाचं भांडवल केलंय.

आजतर गणपतीला 'ग्लोबल' महत्त्व आलं आहे, कोणत्याही कामाचा, गोष्टीचा, लेखाचा 'श्रीगणेशा'च करावा लागतो. कोणत्याही पूजेतही गणपतीला अग्रपूजेचा मान आहे. गणेश ही बुद्धीची देवता तर आहेच पण वाद्यांची जाणकार आहे. संगीत नृत्य ह्या सारख्या 14 विद्या अन चौसष्ठ कलातही तो आद्य आहे.

सर्वांत विविधता कोणत्या देवात असेल तर ती गणपतीत आहे. त्याचे आकारही किती विविध प्रकारे चित्रित करता येतात. त्याची स्वयंभू रूपेही निसर्गातच बघायला मिळतात. तो कोणत्याही आकारात, प्रकारात दिसतो म्हणूनच तो आपला वाटतो, जवळचा वाटतो.सर्वांचा तो लाडका आहे. लहान मुलांनाही गणपतीबाप्पा फार फार आवडतो.

पण या उत्सवाला आता पर्यावरणाचं अधिष्ठान देण्याची गरज आहे. पर्यावरणाचा विचार करता धातूची मूर्ती प्रतिष्ठित करणं योग्य. मातीची मूर्ती असल्यास ती विसर्जन न करता योग्य काळजी घेऊन पुनर्स्थापित करता येते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मोठमोठ्या व अवाढव्य असतात. त्या वजनाला हलक्या असल्या तरी त्या पूर्णपणे विरघळल्या जात नाहीत. त्यामुळे त्यांच्या मोठमोठ्या उंच व विसर्जनामुळे होणारे प्रदूषण याचाच मुद्दा महत्त्वाचा ठरत आहे.

 
WD
शाडूची नैसर्गिक रंगाने रंगवलेली लहान मूर्ती चालेल. त्याच्या मखर सजावटीतही थर्माकोल, प्लॅस्टिक इत्यादीचा वापर करण्याऐवजी फुले, पाने, फळे यासारख्या नैसर्गिक गोष्टी वापरण्यावर भर द्यावा. गणपतीलाही दूर्वा, जास्वंद या सारख्या नैसर्गिक गोष्टीच आवडतात. त्यामुळे निसर्गाच्या या देवाची पूजा जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टीनेच करा.

नदीत विसर्जन न करता, मुर्तीदान, कुंड, विहीर किंवा बादलीत विसर्जन करा व तो पाणी झाडांना घाला निर्माल्य पाण्यात न सोडता पालिकेच्या निर्माल्य कलशात विसर्जित करा.

सार्वजनिक गणपतीच्या संदर्भात अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे उत्तरेकडे गणेशमूर्ती, दुर्गापूजेच्या मूर्ती या मोठ्या असल्या तरी त्या बांबूचे फोक, गवत, सुतळी, शेण, माती या सारख्या नैसर्गिक विघटनशील पदार्थांपासून तयार होतात. त्यामुळे तुलेनेत प्रदूषण कमी होते.

डि.जे, लाऊडस्पीकर, लाइटिंग, डेकोरेशन या सारख्या गोष्टींवर पैसा वाया घालवण्याऐवजी साठणार्‍या पैशातून समाजासाठी पीडीत गरजू यासाठी मदत करण्याचा वसा सर्व लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी घ्यावा. रांगोळी, वक्तृत्व, नाट्य, नृत्य, गायन यासारख्या विविध कलागुणांना वाव देणार्‍या स्पर्धा आयोजित कराव्या. त्यातूनही समाजप्रबोधन सारख्या गोष्टींना उत्तेजन द्यावे.

एखादी पद्धत पिढीजात आहे म्हणून पाळण्यापेक्षा त्या मागचे शास्त्र, त्याचा कार्यकारणभाव अन त्यातून ही चुकीच्या असणार्‍या परंपरांना सोडून नव्या चांगल्या प्रथा रुजवण्यात पुढाकार घ्यावा. प्रत्येक सण उत्सव हा कर्तव्य न राहता एक आनंददायी अनुभव, वैचारिक प्रगतीकडे वाटचाल करणारा ठरावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावयास हवे.