गणेशोत्सवाची रूढी (ऋग्वेदी)
भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणपतीची मृत्तिकेची प्रतिमा पूजावी. या देवतेला दूर्वा व मोदक फार प्रिय असल्यामुळे ते समर्पण करावे. शक्य त्यानुसार नवविद्या भक्तीच्या प्रकारांनी त्याला संतुष्ट करावे. गणपतीचे विसर्जन दीड, पाच, सात, दहा किंवा एकवीस दिवसांनी करावे. विसर्जन होईपर्यंत उत्सव चालू ठेवावा. उत्तरपूजेनंतर प्रतिमा जलात विसर्जन करावी. असा हा वार्षिक गणपतिपूजेचा शास्त्रोक्त विधी आहे. गणेशचतुर्थी पाळण्याची पद्धती प्रामुख्याने विंध्याद्रीच्या दक्षिणेस आहे. दक्षिण देशातून जे लोक उत्तरेकडील प्रदेशात गेले, त्यांच्यातही हा उत्सव चालू आहे.
महाराष्ट्रातील काही भागात या दिवशी कागदावर किंवा चंदनाने तात्पुरते काढलेले गणपतीचे चित्रच पूजले जाते. अन्यधर्मीयांच्या जाचामुळे देशत्याग करून रानोमाळ पळून जाण्याचा प्रसंग आल्यामुळे आपले धार्मिक विधी रक्षण करून ठेवण्यासाठी या प्रकाराचा पूर्वजांनी अवलंब केला असावा. तोच कुलाचार अद्याप कोकणातील काही भागात दृष्टीस पडतो. कित्येक या चित्रांशिवाय मृत्तिकेच्या प्रतिमेचीही स्थापना करतात. तृतीयेच्या दिवशी शंकर व गौरीची चित्रे पुजण्याची चाल काही ठिकाणी आहे. कोकण, महाराष्ट्र व मुंबई या ठिकाणी सप्तमीपासून नवमीपर्यंत मोठ्या थाटाने ज्येष्ठा गौरीचा उत्सव साजार होत असून गौरीगणपतीचे एकाच दिवशी विसर्जन करण्यात येते.
बंगालमध्ये गणपतीचा उत्सव रूढ नाही, परंतु दुसर्या दोन शिवगणांची पूजा करण्यात येते. फाल्गुन शुद्ध चतुर्दशीस घंटाकर्ण नावाच्या गणाची पूजा होते. हा गण अप्रतिम सुंदर असल्यामुळे त्याच्या पूजनाने सौंदर्य प्राप्त होते अशी तेथील लोकांची समजूत आहे. या गणाचा द्योतक म्हणून एका पाण्याने भरलेल्या घटाची पूजा केली जाते. याच महिन्यात घेंटू नांवाच्या दुसर्याम एका गणाची पूजा करून त्वग्रोगापासून आपले रक्षण करण्याबद्दल त्याची प्रार्थना केली जाते. द्रविड देशांत रामेश्वरापर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. तो साजरा करण्याची पद्धती स्थलपरत्वे भिन्न आहे. कानडी लोक गणेशचतुर्थीस बेनकन हब्ब आणि तेलगू पिल्लेयर चवती असे म्हणतात. पिल्लेयर हे त्या लोकांनी गणपतीस दिलेले नाव आहे. तेथील लोकांचा असा समज आहे की ब्राह्मणाचे आराध्यदैवत शंकर, क्षत्रियांचे विष्णू, वैश्याचे ब्रह्म आणि शूद्राचे गणपती होय. गणपतीची पूजा चतुर्थ वर्णांतील लोक देखील आस्थेने करीत असतात. यावरून तेथील लोकांचा हा समज झाला असावा. मुंबई, पुणे वगैरे प्रसिद्ध ठिकाणी चित्रांचे सार्वजनिक देखावे या प्रसंगी दाखविले जातात.
गुजराथेत गणेशचतुर्थीचा उत्सव पाळण्यात येत नाही. या दिवशी गूळ व तूप घालून तयार केलेल्या बाजरीच्या पिठाच्या गोळ्या घरात जागोजागी ठेवतात. त्या उंदीर खाऊन टाकतात. गणपतीच्या दिवशी त्याच्या वाहनास याप्रमाणे मान देण्याची रूढी का पडली हे नकळे. काठेवाडांत घरोघरी गणपतीची मूर्ती असते. वैशाख शु।।4 स तूप व शेंदुराने मूर्तीचे पूजन करून नैवेद्य दाखवितात. महाराष्ट्राप्रमाणे नवीन मूर्ती आणून तिची पूजा करण्याचा किंवा हा दिवस सणांप्रमाणे पाळण्याचा प्रघात उत्तरेकडे आढळत नाही.
(आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास पुस्तकातून साभार)