रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. अष्टविनायक
Written By वेबदुनिया|

मोरगावचा मयूरेश्र्वर

अष्टविनायकातील सर्वांत पहिला गणपती म्हणून मोरगावचा मयूरेश्वर ओळखला जातो. येथील मंदिर काळ्या दगडापासून तयार करण्यात आले असन ते बहमनी काळात बांधले गेले. गावाच्या मध्यभागी असलेल्या या देवळाला चारही बाजूंनी मनोरे आहेत. मुघल काळात देवळावर आक्रमण होऊ नये म्हणून या देवळाला मशिदीसारखा आकार दिला आहे. देवळाच्या बाजूने 50 फुट उंचीची ‍संरक्षण भिंत आहे. 
 

असे मानले जाते की, पूर्वी सिंधू नावाच्या असूराने पृथ्वीतलावर उत्पात माजवला होता, त्याचा नाश करण्यासाठी देवांनी अखेर गणपतीची आराधना केली, तेव्हा गणपतीने मयूरावर आरूढ होऊन येथे सिंधू असूराचा वध केला.

त्यामुळे गणपतीला येथे मयूरेश्र्वर असे नाव पडले. या गावात मोरांची संख्या जास्त असल्यामुळे त्याला मोरगाव असे म्हणतात.

या मंदिरात मयूरेश्र्वराबरोबर रिद्धी व सिध्दी यांच्याही मूर्ती आहेत. असे म्हणतात की ब्रम्हदेवाने दोन वेळा या मयूरेश्र्वराची मूर्ती बनवली आहे. पहिली मूर्ती बनवल्यावर ‍ती सिंधूसूराने तोडली. म्हणून ब्रम्हदेवाने पुन्हा एक मूर्ती घडवली.

सध्याची मयूरेश्र्वराची मूर्ती खरी नसून त्यामागे खरी मूर्ती असल्याचे मानले जाते. ती मूर्ती लहान वाळू व लोखंडाचे अंश व हिर्‍यांपासून बनलेली आहे. या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या समोर एक नंदीची मूर्ती आहे.

असे सांगितले जाते की शंकराच्या मंदिरासाठी नंदीची मूर्ती एका रथातून नेली जात होती, मात्र येथे आल्यावर त्या रथाचे चाक तुटले. त्यामुळे या नंदीला येथेच ठेवण्यात आले.

जाण्याचा मार्ग:
हे मंदिर पुण्यापासून अंदाजे 64 किलोमीटरवर असून कर्‍हा नदीजवळ आहे. पुणे लोणी चौफुला करत आपण मोरगावला जाऊ शकतो. पावसाळ्यात येथे मोर बघायला मिळतात.