गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गौरी आली, सोन्याच्या पावली...सण गौरी गणपतीचा

गणपतीच्या बरोबरच गौरी चा सण ही महाराष्ट्रात मोठया प्रमाणात साजरा होतो. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक आहेत असे मानले जाते.
 
यामागची पौराणिक कथा अशी की फार पूर्वी दानवांच्या हाहाकारामुळे देवांच्या स्त्रियांना आपल्या सौभाग्याची चिंता वाटू लागली. म्हणून सर्व देवांच्या स्त्रियांनी एकत्र जमून महालक्ष्मीची मनोभावे पूजा व प्रार्थना केली. महालक्ष्मी प्रसन्न झाली व त्यांच्यावर आलेले संकट तिने टाळले. या प्रसंगाची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. तीन दिवस साजरा होणार्‍या या सणाच्या मूळ नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जातात. आपल्या परंपरा आणि पद्धतीप्रमाणे गौरींचे वेगवेगळ्या प्रकाराचे रुप असतात. कोकणस्थ लोकांमध्ये खडयाच्या गौरी आणतात. तर देशस्थ लोकांमध्ये उभ्या गौरींची पूजा केली जाते. गौरींचे दोन मुखवटे असतात. एकीला ज्येष्ठा तर दुसरीला कनिष्ठा म्हणतात. 
 
ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. गौरीला विविध प्रकारची फुले आणि पत्री वाहण्यात येतात. गौरीपुढे तांदळाची व गव्हाची ओटी ठेवली जात. देवीसमोर कुंकवाचे करंडे ठेवतात. आपल्या पद्धतीप्रमाणे गौरींपुढे दोन बाळे पण ठेवतात. हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता, दुर्वा, आघाडा, वस्त्र यांनी गौरींची पूजा करतात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, 5 कोशिंबिरी, पुरण, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. अनेक ‍ठिकाणी यादिवशी सवाष्ण आणि ब्राह्मण यांना जेवायला बोलवायचीही पद्धत आहे. या गौरी आपल्याकडे माहेरवाशीण म्हणून त्याचं आगत्य केलं जातं. त्यांच्यासाठी फुलोरा तयार केला जातो. लाडू, करंज्या, साटोर्‍या असे फराळाचे पदार्थ तसेच मिठाई, फळे यांचा नैवेद्य दाखविण्यात येतो. गौरी जेवल्यावर गौरीपुढे गोविंद विडे ठेवतात. 
 
तिसर्‍या दिवशी गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नैवेद्य दाखवून गौरींवर अक्षता टाकून गौरी उतरवतात व त्यांचे विसर्जन करतात.