शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Updated : सोमवार, 24 ऑगस्ट 2020 (19:45 IST)

Gauri Pujan 2020: ज्येष्ठगौरी आवाहन शुभ मुहूर्त आणि पूजन विधी

गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाल्यावर सर्व वाट बघत असतात गौरींच्या आगमनाची. भाद्रपद महिन्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा सण म्हणजे गौरी पूजन. अनेक ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन देखील म्हटलं जातं.
 
शुभ मुहूर्त
 
यंदा 25 ऑगस्टला गौरी/महालक्ष्मींचं आगमन होणार आहे. 26 तारखेला गौरी पूजन तर 26 ऑगस्टला गौरींना निरोप दिला जाईल. 
 
ज्येष्ठागौरी आवाहन : 25 ऑगस्ट 2020
ज्येष्ठागौरी आवाहन शुभ मुहूर्त : मंगळवारी दुपारी 1 वाजून 58 मिनीटांनंतर 
विसर्जनाचा मुहूर्त: दुपारी गुरुवार, 12 वाजून 36 मिनिटांनंतर
 
गौरी आवाहन
आपापल्या पद्धत आणि परंपरेप्रमाणे घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत रांगोळीने लक्ष्मीच्या पायांचे ठसे काढावे. जिच्या हातात गौरी असतील त्या बाईचे पाय दुधाने व पाण्याने धुवावे आणि त्यांवर कुंकवाचे स्वस्तिक काढावे. आता येताना लक्ष्मीच्या पायांचे ठसे उमटवत उमटवत गौरींचे मुखवटे आणावे. गौरी आगमन करत असताना ताट चमच्याने किंवा घंटेने वाजत गाजत गौरीचे स्वागत करावे. गौरीची स्थापना करण्यापूर्वी त्यांना घरातील समृद्धी, दुध-दुभत्याची जागा इ. गोष्टी दाखवाव्या. तेथे त्यांचे आशीर्वाद मिळून ऐश्वर्य नांदो अशी प्रार्थना करावी. या प्रथेला गौरी आवाहन करणे असे संबोधतात.
 
गौरीपूजन
दुसऱ्या दिवशी म्हणजेच ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते. सकाळी गौरींची पूजा-आरती करून केलेल्या फुलोरा आणि फराळाचा नैवेद्य दाखवतात. यादिवशी महानैवेद्य दाखवावा. महानैवेद्यात आपल्या परंपरेनुसार पुरणपोळी, ज्वारीच्या पिठाची आंबील, अंबाडीची भाजी, सोळा भाज्यांची एकत्र भाजी, दिवेफळ, शेंगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ घालून केलेली ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे वगैरे पदार्थांचा समावेश असतो. सवाष्णीला जेवायला बोलावून तिचा मान-पान करावा. विडा खाऊ घालावा. नंतर संध्याकाळी आरती करावी. सायंकाळी महिलांचा हळदीकुंकवाचा थाट करावा.
 
विसर्जन
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर महालक्ष्मींचे विसर्जन करतात. त्या दिवशी सकाळी पोवत्याच्या किंवा सुताच्या गाठी पाडतात. त्या सुतात हळदीकुंकू, सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी पाडव्या. यांमध्ये हळदीकुंकू, रेशमी सूत, झेंडूची पाने, काशीफळाचे फूल हे महत्त्वाच्या वस्तू असतात. नंतर गौरींची पूजा आणि आरती करावी. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवावा.
 
गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घ्यावा. धातूच्या किंवा कायम स्वरूपाच्या मूर्ती असल्यास निरोप घेतान त्यांचे मुखवटे हालवावे. गौरींचे पाण्यात विसर्जन केल्यावर तेथील थोडी वाळू घरी आणून ती सर्व घरभर व परसावावी. त्याने घरात समृद्धी नांदते.