मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 16 मे 2014 (17:19 IST)

महराष्ट्रात कॉग्रेस-राष्ट्रवादीला झोबीपछाड; शरद पवारांनी पराभव स्विकारला

संपूर्ण देशासह राज्यातील जनतेने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) बाजूने कौल दिल्याचे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारली आहे. भाजपचा विजय झाल्याबद्दल शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचे अभिनंदन केले आहे.

शरद पवार म्हणाले, राज्यातील जनतेचा कौल आम्ही स्वीकारला आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जे संख्याबळ मिळाले आहे ते पाहता देशात पुढील पाच वर्षे राजकीय स्थैर्य असेल. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संख्येत तुलनेने फार मोठी घट झालेली नाही. भाजपला चांगले यश मिळाले आहे. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठीचा कौल राज्यातील जनतेने दिला व त्याचा फायदा शिवसेनेलाही झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने यापुढेही एकजुटीने काम केले पाहिजे व तीच आमची भूमिका राहील.

दरम्यान, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्व निकाल जाहीर झाले आहेत. राज्यातील जनतेने महायुतीला पसंत करून कॉग्रेससह राष्ट्रवादी कॉंग्रेसला धोबीपछाड दिला आहे. महायुतीने 48 पैकी तब्बल 42 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने 23, शिवसेनेने 18 तर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या केवळ चार तर काँग्रेसच्या दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. राज ठाकरे यांच्या मनसेला भोपळाही फोडता आला नाही.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, प्रतिक पाटील, मिलिंद देवरा, माणिकराव गावित, मुकुल वासनिक या कॉंग्रेस दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, रायगडमधून सुनील तटकरे, सुरेश धस, शिवाजीराव मोघे यांचाही दारूण पराभव झाला आहे. तर नांदेडमधून काँग्रेसचे अशोक चव्हाण, हिंगोलीमधून राजीव सातव, सातार्‍यातून राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले, विजयसिंह मोहिते-पाटील, कोल्हापुरातून धनंजय महाडिक आणि बारामतीमधून सुप्रिया सुळे असे अर्धा डझन उमेदवार निवडणून आले आहेत.