मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. लोकसभा निवडणूक 2014
  4. »
  5. लोकसभा निवडणूक बातम्या
Written By wd|
Last Modified: मुंबई , शनिवार, 17 मे 2014 (12:18 IST)

शिवसेना सोडलेले पराभूत!

सोळाव्या लोकसभा निवडणुकीचे निकाल भाजपबरोबर शिवसेनेसाठी अनेकार्थानी वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत. शिवसेनेत मोठे झालेले आणि कालांतराने शिवसेनेतून बाहेर पडलेले बहुतेक सर्व नेते वा त्यांच्या वारसदारांना शिवसेनेच्या उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागला आहे. या विजयामुळे शिवसैनिकांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
 
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर झालेली ही पहिली निवडणूक शिवसेनेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचा कस या निवडणुकीत लागला होता. त्यातच शिवसेनेतून कधीकाळी बाहेर पडलेले वा हकालपट्टी झालेले अनेक दिग्गज नेते शिवसेनेविरोधात शड्डू ठोकून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.
 
नाशिकङ्कध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेसमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र, सेनेच्या हेमंत गोडसे यांनी भुजबळ यांना लाखांपेक्षाही अधिक मताधिक्य घेऊन धूळ चारली. 
 
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये एकेकाळचे शिवसेना नेते नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे हे रिंगणात होते. त्यांच्याविरोधातील लढत शिवसेनेसाठी प्रतिष्ठेची होती. शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी नीलेश राणे यांचा पराभव करून सेनेची प्रतिष्ठा कायम राखली. ठाणे-बेलापूर पट्टय़ात गणेश नाईक यांचे मोठे साम्राज्य आहे. यावेळी मात्र या साम्राज्याला हादरा देण्यात शिवसेनेला यश मिळाले. नाईक यांचे पुत्र संजीव नाईक यांचा दणदणीत पराभव करत सेनेच्या राजन विचारे यांनी ठाण्याच्या गडावर भगवा फडकवला. राज ठाकरे यांच्या मनसेने शिवसेनेसमोर खरी अडचण निर्माण केली होती. मनसेने फक्त शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उतरवले होते. तसेच नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देऊन महायुतीच्या मतदारांच्या मनातही संभ्रम निर्माण केला होता. मात्र, शिवसैनिकांनी मनसेचा हा डाव हाणून पाडला. राज ठाकरे यांच्या मनसेला राज्यात एकही जागा मिळवता आली नाही.